पुण्यात राम नदीच्या काठी उभे असलेले श्री सोमेश्वर मंदिर ९०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. या परिसराला सोमेश्वरवाडी, असेही म्हटले जाते. स्वयंभू असलेले येथील शिवलिंग जमिनीच्या खाली आहे. त्यामुळे गाभाऱ्यात जायला पायऱ्या आहेत. तेथे सध्या प्रवेश दिला जात नाही. भाविकांना शिवलिंगाचे दर्शन १० फूट अंतरावरून घेता येते. काळ्या दगडांतले हे मंदिर हेमाडपंथी वास्तुशैलीचा एक सुंदर ठेवा आहे.
साडेतीन एकरांवर पसरलेल्या या मंदिराला तीन मुख्य प्रवेशद्वारे आहेत आणि ती पूर्व, पश्चिम व दक्षिण अशा तीन दिशांना आहेत. मुख्य शिव मंदिराभोवती गणपती, हनुमान व भैरोबा यांची छोटी मंदिरे आहेत. येथे गणपती मंदिराला लागूनच तब्बल ४० फूट उंच दीपमाळ आहे. ही दीपमाळ मंदिराच्या भव्यतेला वेगळीच उंची देते. मंदिरासमोर मोठे आवार आहे आणि तेथेच एका बाजूला तुळशी वृंदावन आहे. गर्भगृहासमोरच्या मंडपात नंदी व गणपती मंदिर यांच्यामधील जागेत मोठा सभामंडप आहे.
मंदिरात उत्तरेकडे यज्ञकुंड आहे. चारही बाजूंनी उभारलेल्या दगडी भिंतीमुळे मंदिराचा भाग संरक्षित झाला आहे. येथेच एका बाजूला मोडी भाषेतील जुनी लिखित पत्रे, चित्रे व काही छायाचित्रे प्रदर्शनासारखी मांडण्यात आली आहेत.
मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्यात उतरण्यासाठी पायऱ्या अर्थात घाट आहे. तेथेच पाणी अडविण्यासाठी लाकडी वा दगडांचा बंधारा उभारण्याची व्यवस्थाही आहे.
हे स्थान चक्रतीर्थ नावाने ओळखले जाते. हा ओढा पुढे जाऊन मुठा नदीला मिळतो. मंदिरात खोल्या आहेत. धार्मिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या, तसेच तेथे काम करणाऱ्या पुजाऱ्यांसाठीचे ते विश्रांतिस्थान आहे. मंदिराच्या आवारात अनेक छोटी शिवलिंगे व मूर्ती आहेत.
पुणे शहरातील पाषाण परिसरात हे मंदिर आहे आणि त्याला शिवकालीन परिसस्पर्श आहे. १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी लाल महालामध्ये वास्तव्याला असताना माँसाहेब जिजाऊंबरोबर या मंदिरात येत असत. हे मंदिर जिजाऊंनीच १६४० ते १६६० यादरम्यान बांधून घेतले होते, असे म्हटले जाते. या परिसराला जिजापूर पेठ, असे म्हटले जायचे. मंदिर परिसरात शिवाजी महाराजांच्या सरदारांपैकी हनुमंते यांची समाधी आहे. त्यांचा मंदिराच्या उभारणीत मोलाचा वाटा होता, अशी जनमान्यता आहे. पुढे १८३० मध्ये नारायणराव नातू यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करीत त्याचे महत्त्व उजेडात आणले. पेशव्यांचे आध्यात्मिक गुरू शिवराम भट चित्राव स्वामी यांना मंदिर परिसरात जमिनीखाली सुवर्णमुद्रांचा खजिना सापडला होता. त्यांनी हा खजिना नानासाहेब पेशवे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यातूनच नानासाहेबांनी या मंदिराचा जीर्णोद्धार, तसेच देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च केल्याचे सांगितले जाते.
मंदिराचा सभामंडप बांधण्यासाठी मुघल सरदार शाहिस्तेखान याने खर्च दिला होता, अशीही नोंद ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळते. ब्रिटिश कालखंडात १८८४ मध्ये लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी मंदिरात संगमरवरी खांब उभारण्यात आले. १९७४ ते १९८४ दरम्यान या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार झाला. पुणे महापालिकेने या मंदिराला दुसऱ्या श्रेणीच्या सांस्कृतिक वारसास्थानाचा दर्जा दिला आहे.
गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरल्याचा दिवस म्हणून ज्येष्ठ शुक्ल दशमीला मंदिरात ‘गंगा दसरा’ उत्सव साजरा केला जातो. त्याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमा, हनुमान जयंती, काळभैरव जयंती हे उत्सवही येथे साजरे होतात. सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत भाविक येथे देवदर्शन घेऊ शकतात.