सोमेश्वर मंदिर

हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या हत्तुरमधील सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिरांतून शैव व नाथ परंपरेचा सुरेख संगम पाहावयास मिळतो. सोमेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर आहे, तर बनसिद्धेश्वर हे सिद्धयोगींचे समाधिस्थळ आहे. असे सांगितले जाते की सोमेश्वर मंदिरातील शिवपिंडी ही शिवयंत्रावर स्थापलेली आहे. या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. खासकरून निवडणूक काळात या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या वाढते. यामागे अशी श्रद्धा आहे की येथील महादेवास मनोभावे साकडे घातल्यास निवडणुकीत घवघवीत यश लाभते.
काही पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते हत्तूर येथील हेमाडपंती शैलीचे सोमेश्वर मंदिर हे ११ ते १३व्या शतकातील असावे. या मंदिराची स्थानिक आख्यायिका अशी की प्राचीन काळापासून हत्तुर हे एक पवित्र स्थान होते. येथे अनेक ऋषी-मुनी तप करीत असत. याच ठिकाणी काही ऋषींनी तप करून सोमेश्वर महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला होता. या मंदिरानजीक बनसिद्धेश्वराचे लहानसे मंदिर आहे. असे सांगण्यात येते की बनसिद्धेश्वर हे नाथ संप्रदायातील एक सिद्ध पुरूष होते. सिद्धगडावर त्यांचे वास्तव्य असे. त्यानंतर ते हत्तुर परिसरात येऊन स्थायिक झाले. येथे त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली व येथेच समाधी घेतली. त्यांच्या समाधीस्थळी कालांतराने हे मंदिर उभारण्यात आले.
हत्तूर येथील सोमेश्वर मंदिराचे प्रांगण प्रशस्त आहे. दगडी फरसबंदी असलेल्या या प्रांगणात मंदिरासमोर तीन चौथऱे आहेत. यातील मध्यभागी असलेल्या लहान चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती व त्याशेजारी असणाऱ्या दोन मोठ्या चौथऱ्यांवर दोन उंच षटकोनी दीपमाळा आहेत. या दीपमाळांच्या चौथऱ्यांवर खालील बाजूला अनेक दीपकोष्टकांची रचना आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या सोमेश्वर मंदिराच्या तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत सात पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला अधिष्ठानावर दोन लहान मंदिरे आहेत. त्यापैकी एकात गणपती व दुसऱ्यात हनुमान या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्तंभांवर द्वारपालचित्रे रंगविलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या सपाट व दगडी असलेल्या द्वारशाखांवर लहान लहान द्वारपाल शिल्पे आहेत. द्वारचौकटीच्या खाली किर्तीमुख व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला हस्त व त्यावर बाशिंगी कठडा आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला भिंतीमध्ये द्वारपालकक्ष आहेत.
प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात तटबंदीलगत आणखी दोन मोठ्या दीपमाळा आहे. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत भाविकांच्या सुविधेसाठी पत्र्याची मोठी शेड टाकून मंडप केलेला आहे. या मंडपात मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर दोन नंदी व मध्यभागी शिवपिंडी आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या सोमेश्वर मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपातील सर्व स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत चतुर्भूज द्वारपाल मूर्ती आहेत. गर्भगृहात जमिनीलगत असलेल्या वज्रपिठावर सोमेश्वर लिंग आहे. या लिंगावरील मुकुट, डोळे, नाक, तोंड व मिशा चांदीच्या आहेत.
सोमेश्वर मंदिराच्या मागील मोठ्या चौथऱ्यावर नऊ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण अशी भूताळसिध्द महाराजांची मूर्ती आहे. मंदिराच्या डावीकडे असलेल्या लहान मंदिरांत ओगण्णामुत्या महाराज, बनसिध्देश्वर महाराज, पडदानसिध्द महाराज, हुल्लीबंदप्पा वडिया, कन्नमुत्या महाराज, ज्योत्यप्पा महाराज, भीममुत्या महाराज, सामण्णामुत्या महाराज यांच्या मूर्ती आहेत.
श्रावणात पूर्ण महिनाभर सोमेश्वर मंदिरात प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर सोमवारी सोमेश्वर देवास सीना नदीतून पाणी आणून महाभिषेक केला जातो. नवसाला पावणारा सोमेश्वर अशी ख्याती असल्याने अनेक राजकीय पक्ष आपल्या प्रचाराचा शुभारंभ या देवाचे दर्शन घेऊन या गावपासूनच करतात. दरवर्षी मकर संक्रांतीला सोमेश्वर व बन्नसिद्धेश्वर महाराजांची एकत्रित यात्रा भरते.
सोमेश्वर मंदिरात पहाटे साडेपाच ते रात्री साडेआठ या काळात, तर बनेश्वर मंदिरात सकाळी सहा ते दुपारी बारा व सायंकाळी पाच ते आठ या काळात भाविकांना दर्शन घेता येते. सोमेश्वर मंदिरात दररोज सकाळची ६.३० वाजता व सायंकाळी ७.०० वाजता आरती होते. बनेश्वर मंदिरात आरतीची वेळ सायंकाळी साडेसहाची आहे. महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनें’तर्गत या मंदिराला तीर्थस्थळाच ‘ब’ वर्गाचा दर्जा देऊन गौरव केलेला आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात सोमेश्वराचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • सोलापूरपासून १५ किमी अंतरावर
  • सोलापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home