सोमेश्वर मंदिर

घाटनांदूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड

बीड जिल्ह्याच्या आध्यात्मिक भूमीला मंदिरांचा आणि संतांच्या वास्तव्याचा मोठा वारसा लाभला आहे. याच जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर हे गाव एक मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. याच गावातील ग्रामदैवत सोमेश्वर मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या पंचक्रोशी यात्रेमध्ये सोमेश्वराच्या दर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. घाटनांदूरच्या या प्राचीन मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवपिंडीतूनच बोरणा (सोमगंगा) नदीचा उगम होतो.

भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मामध्ये भगवान शंकराची अनेक रूपे आणि नावे प्रचलित असली तरी, ‘सोमेश्वर’ या नावाला एक विशेष स्थान आहे. संस्कृत भाषेत ‘सोम’ म्हणजे चंद्र आणि ‘ईश्वर’ म्हणजे स्वामी किंवा भगवान; अर्थात ‘चंद्राचा स्वामी’ किंवा ‘ज्याची पूजा चंद्राने केली आहे असा देव’. वेदांमध्ये ‘सोम’ हे अमृत आणि औषधी वनस्पतींचे प्रतीक मानले जाते. ऋग्वेदात सोमरसाला देवांचे पेय मानले गेले आहे, जे अमरत्व प्रदान करते. जेव्हा शिवाला ‘सोमेश्वर’ किंवा ‘सोमनाथ’ असे संबोधले जाते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तो केवळ चंद्राचा रक्षक नाही, तर विश्वातील सर्व पोषणमूल्यांचा, मनाचा आणि औषधी शक्तींचा मूळ स्रोत व संरक्षक आहे.

घाटनांदूर गावाच्या मध्यभागी ग्रामदैवत सोमेश्वराचे मंदिर आहे. या प्राचीन मंदिराभोवती दगडी आवारभिंत आहे. या आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती तर उत्तरांगावर शिवपिंडी कोरलेली आहे. प्रशस्त सभामंडपात दोन्ही बाजूंना ओवऱ्या आहेत. सभामंडपात मध्यभागी नंदीमंडप आहे. या नंदीमंडपात समोरील बाजूस मोठी पितळी घंटा आहे, तर पुढील बाजूस दोन नंदी मूर्ती आहेत. यापैकी एक मूर्ती अखंड पाषाणातील आणि दुसरी पितळेची आहे. या दोन्ही नंदींच्या समोर शिवलिंग विराजमान आहे. सभामंडपातील देवकोष्ठकांमध्ये गणपतीसह विविध प्राचीन मूर्ती आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. येथील वैशिष्ट्य असे की ही पिंडी दोन भागांत विभाजित आहे. पिंडीची शाळुंका व लिंग हे वेगवेगळे आहेत. एप्रिल महिन्यात एक-दोन दिवस सूर्याची किरणे सकाळच्या वेळी सोमेश्वराच्या पिंडीवर पडतात. या मंदिरात दोन तीर्थकुंड आहेत, त्यापैकी एक गर्भगृहातील सोमेश्वराच्या पिंडीलगत आहे. देवाच्या पूजेसाठी या कुंडातील पाणी वापरले जाते. असे मानले जाते की येथूनच परळी तालुक्यातून वाहणाऱ्या बोरणा (सोमगंगा) नदीचा उगम होतो. या कुंडातील पाणी कधीही कोरडे पडत नाही. गर्भगृहाच्या मागील बाजूला दुसरे तीर्थकुंड आहे, ज्याचा वापर स्नानासाठी केला जातो.

येथे वर्षभरात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये कार्तिक व चैत्र पौर्णिमेला होणारे उत्सव हे महत्त्वाचे वार्षिक उत्सव असतात. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री मंदिरातून सोमेश्वराच्या रथाची मिरवणूक निघते. गावाच्या मुख्य मार्गावरून वाजतगाजत निघणाऱ्या या रथ मिरवणुकीत ग्रामस्थांसह शेकडो भाविक सहभागी होतात. मिरवणूक मार्गावर ग्रामस्थांकडून रांगोळ्या काढल्या जातात. रात्रभर सोमेश्वराच्या जयघोषात ही मिरवणूक चालते आणि पहाटे पुन्हा मंदिरात येते. पौर्णिमेच्या दिवशी येथे सोमेश्वराची महापूजा मांडली जाते. ही पूजा वैशिष्ट्यपूर्ण असते, यावेळी सुमारे पन्नास किलो गव्हाची रास शिवपिंडीवर रचतात. त्यात बांबूच्या कामट्या खोचून दोरा बांधला जातो आणि त्यावर नागवेलीची पाने लावून सजावट करतात. यावेळी केळीची मोठी पाने अलंकारांनी सजवून त्यावर शिवपूजा मांडली जाते. शिवपिंडीपुढे उडीद, मूग, तूर, मसूर, तांदूळ, तीळ, भगर अशा कडधान्यांची रांगोळी काढली जाते. असे सांगितले जाते सोमेश्वराची अशी पूजा श्रीक्षेत्र काशी येथे मांडली जाते, त्याच धर्तीवर येथील पूजेचे स्वरूप असते. या उत्सवांच्या वेळी महापूजा, भजन, कीर्तन, प्रसाद, रथउत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. हजारो भाविक यात सहभागी होतात. याव्यतिरिक्त सोमवारी, प्रदोष व शिवरात्रीला भाविकांकडून नवसपूर्तीनिमित्त अशी पूजा केली जाते.

सोमेश्वर उपासनेतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे सोमवती अमावस्या (सोमवारी येणारी अमावस्या). पुराणांनुसार, या दिवशी पांडवांनी देखील पापमुक्तीसाठी ही पूजा केली होती. भाविकांकडून या दिवशी पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा आणि सोमेश्वराच्या पिंडीवर अभिषेक घातले जातात. अशी मान्यता आहे की हे व्रत विशेषतः सौभाग्य आणि संततीप्राप्तीसाठी केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • अंबाजोगाई येथून २० किमी अंतरावर
  • बीड येथून ११४ किमी अंतरावर
  • परळी व अंबाजोगाई येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही
  • संपर्क : विजय देशमुख, अध्यक्ष, मो. ९११२०४४७४७,
  • महेश्वर स्वामी, सचिव, मो. ८५५२८५८५७१

सोमेश्वर मंदिर

घाटनंदूर, ताल. अम्बाजोगाई, जिला. बीड

Back To Home