पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात नीरा आणि कऱ्हा नद्यांच्या खोऱ्यात वसलेले करंजे हे गाव येथील प्राचीन सोमेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. साक्षात सोरटी सोमनाथ महादेवांचे वास्तव्य असलेल्या या स्थानी दरवर्षी श्रावण महिन्यात भगवान शिव जिवंत सर्परूपात दर्शन देतात, अशी मान्यता आहे. ‘स्वारी येणे’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दर्शनासह येथे येणाऱ्या सर्पाच्या रंगावरून आणि आकारावरून हवामानाचे अंदाज वर्तविले जातात. १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सतीचे वाण’ या चित्रपटामुळे करंजे येथील या मंदिराचे माहात्म्य महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले होते. या जागृत देवस्थानाला राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देऊन गौरव केला आहे.
करंजे परिसराचा इतिहास हा मानवी संस्कृतीच्या उदयाइतका जुना असल्याचे दिसून येते. मंदिराच्या जवळ असलेल्या सोनगाव येथे १९६५ मध्ये झालेल्या पुरातत्वीय उत्खननातून या भागात ३५०० वर्षांपूर्वी ताम्रपाषाणयुगीन मानवी वस्ती अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या उत्खननात सापडलेली मृदभांडी जोर्वे आणि माळवा संस्कृतीशी नाते सांगणारी आहेत. यावरून या भूमीचे प्राचीनत्व सिद्ध होते.
सध्या अस्तित्वात असलेले सोमेश्वर मंदिर प्रामुख्याने तेराव्या ते चौदाव्या शतकातील आहे. याची बांधणी देवगिरीच्या यादव राजांच्या कालखंडात झालेली आहे. मध्ययुगीन काळात हे मंदिर विविध राजवटींच्या संरक्षणाखाली राहिले आणि सतराव्या शतकात राजमाता जिजाबाईंनी या मंदिराच्या देखभालीत विशेष रस घेतल्याचे उल्लेख आढळतात.
‘सोमेश्वर महात्म्य’ या ग्रंथात आलेल्या कथेनुसार, करंजे गावात महादू गवळी याचे कुटुंब राहत असे. त्याची पत्नी मालू हिला अपत्य नसल्याने सासू व नणंदेकडून तिचा छळ होत असे. असे असले तरी मालू वेळ मिळेल तेव्हा देवपूजेत रमत असे. एके दिवशी दारात आलेल्या साधूने तिला शिवोपासना करण्यास सांगितले. त्यानुसार तिने तब्बल १२ वर्षे उपासना केल्यानंतर महादेवाने स्वप्नदृष्टांत देऊन ‘सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ येथे येऊन माझी पूजा कर’, असे तिला सांगितले. त्यासाठी दररोज मध्यरात्री तिला घेण्यासाठी सौराष्ट्रातून करंजे गावात महादेव विमान पाठवत असत. दररोज ती मध्यरात्री त्या विमानातून जाऊन सोरटी सोमनाथाची पूजा करत असे व पहाटे परतत असे.
मालूचा हा दिनक्रम सुरू असताना एके दिवशी पती महादू गवळी याने तिचा पाठलाग करण्याचे ठरविले. त्यानुसार तिला घेण्यासाठी आलेल्या विमानात तिच्या नकळत बसून तो सौराष्ट्रात गेला. तिच्यासाठी मध्यरात्री सोरटी सोमनाथ मंदिराचे दरवाजे आपसूक उघडले गेल्याचे त्याने पाहिल्यावर आपल्या पत्नीच्या भक्तीची त्याला कल्पना आली. परंतु परतीच्या विमानात त्याला बसता न आल्याने तो तेथेच राहिला. इकडे करंजे गावात महादू गायब झाल्याची चर्चा सुरू झाली व मालूनेच त्याला गायब केले, असा तिच्यावर आळ घेतला गेला. मग महादेवांनी तिला स्वप्नदृष्टांत देऊन ‘तू आता सौराष्ट्रात येण्याची गरज नाही, मी तुझ्या गावातच तुला सर्परूपाने गाईच्या कासेला पिताना दिसेन, त्यावेळी तू माझे दर्शन कर’, असे सांगितले. या गावातील खोमणे आडनावाच्या गुराख्याला गाईच्या अंगावर साप दिसला व त्याने सापावर कुऱ्हाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला. मालूच्या हे लक्षात आल्यावर तिने महादेवाची माफी मागितली. त्यानंतर महादेवांनी ‘मी तुझ्या गावात लिंगरूपात प्रकट होईन’, असा स्वप्नदृष्टांत दिला.
इकडे महादू गवळी परत न आल्याने सर्व गावकऱ्यांनी शिक्षा म्हणून मालूला जाळून मारण्याचे ठरविले. मात्र, आपल्याला महादेवाने जो स्वप्नदृष्टांत दिला आहे ती अखेरची इच्छा म्हणून मान्य करावी, असे तिने गावकऱ्यांना विनविले. तिने सांगितल्यानुसार गावकऱ्यांनी खोदकाम केले असता जमिनीतून पाण्याचे कारंजे उसळून बाहेर आले आणि त्यातून शिवलिंग प्रकट झाले. दरम्यान, हा प्रकार सुरू असताना महादू गवळी गावात आला व त्याने महादेवाकडून मालूसाठी येत असलेले विमान, सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथाचे वर्णन व पत्नीच्या भक्तीचा महिमा गावकऱ्यांना सांगितला. ते ऐकून गावकरी खजील झाले. या घटनेमुळे या गावाला ‘करंजे’ आणि देवाला ‘सोमेश्वर’ असे नाव प्राप्त झाले. आजही मंदिरापासून काही अंतरावर मालूबाईचे स्वतंत्र मंदिर आहे. तिथेच विमान उतरण्याची जागा दाखविली जाते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मालूबाईचे दर्शन घेण्याची प्राचीन प्रथा येथे पाळली जाते. नीरा नदीच्या पात्राजवळ वसलेल्या या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. मंदिरासमोर मोठा वाहनतळ आहे. वाहनतळाला लागून पूजासाहित्य विक्रीची अनेक दुकाने आहेत. येथून मंदिराकडे येण्यासाठी पेव्हरब्लॉकचा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूला चिंचेचे अनेक प्राचीन वृक्ष आहेत. सभोवती असलेल्या अनेक दगडी तटबंदीमुळे मंदिराला एखाद्या भुईकोट किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तटबंदीत असलेल्या दुमजली मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. प्रांगणात मंदिरासमोर सुमारे ४० फूट उंचीची एक दगडी दीपमाळ आहे. बाहेरील तटबंदीला लागून आतील बाजूला ओवऱ्यांची रचना आहे. मंदिराच्या आवारात मोठी बारव आहे. तिर्थाची विहीर म्हणून ती प्रसिद्ध आहे. यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथील पाणी भाविक पवित्र तीर्थ म्हणून प्राशन करतात. ही बारव खरे-खोटे करण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की एखाद्याकडून खरे-खोट्याचा न्याय करण्यासाठी त्याला या बारवेत सोडले जाते व वरच्या बाजूने त्याला प्रश्न विचारले जातात. बारवेत राहून ती व्यक्ती जर खोटे बोलली तर तेथील साप त्या व्यक्तीला आपला गुन्हा कबूल केल्याशिवाय बाहेर पडू देत नाहीत. आजही लोक सत्याची शपथ घेण्यासाठी येथे आवर्जून येतात.
प्रांगणात अनेक जुने वृक्ष आणि चिंचेची मोठी वनराई आहे. येथील तटबंदीमध्ये एक ‘चाफ्याची आळी’ आहे. श्रावणात दर्शनासाठी आलेल्या सापाला सुरक्षितपणे त्या जागेत सोडले जाते. अर्धखुला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराजवळ चौथऱ्यावर तीन नंदी आहेत. या नंदींच्या समोर एका गोलाकार दगडी चौथऱ्यावर शिवपिंडी व शंकराचा पितळी मुखवटा आहे. सभामंडपातील बाह्य बाजूचे सर्व स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानींनी जोडलेले आहेत. त्यापुढे अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळाच्या डावीकडे सती मालूबाई यांची पाषाणातील मूर्ती व त्याशेजारी शिवपिंडी आहे. तर उजवीकडे एका चौथऱ्यावर पार्वती व गणपती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर सुंदर कोरीव काम आहे. येथून काहीसे खोलवर असलेल्या गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर स्वयंभू शिवपिंडी आहे. या शिवपिंडीची शाळुंका चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहे. यामधील लिंग हे काहीसे दोन भागात विभागलेले दिसते. येथील गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाभोवती असलेल्या शिखरावर अनेक देवकोष्टके आहेत.
सोमेश्वर मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे जिवंत नागाचे दर्शन होते आणि या प्रक्रियेला स्थानिक लोक ‘स्वारी येणे’ असे संबोधतात. सोरटी सोमनाथ येथून महादेव स्वतः नागाच्या रूपात येतात, अशी भाविकांची धारणा आहे. हा नाग शिवलिंगावर बसून भाविकांची पूजा स्वीकारतो आणि त्याच्या रंगावरून आणि तो प्रकट होण्याच्या वेळेवरून गावातील जाणकार लोक आगामी हवामानाचा व पिकांचा अंदाज वर्तवितात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात रात्रभर भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते. या वेळी पिंडीला विशेष आरास केली जाते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी निघणाऱ्या पालखीमध्ये खोमणे आडनावाच्या गुराख्याला दर्शनाचा पहिला मान दिला जातो, कारण त्यांच्या पूर्वजालाच प्रथम महादेवाचे दर्शन झाले होते. दरवर्षी शेवटच्या श्रावणी सोमवारी येते मोठी जत्रा असते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.