सोमेश्वर महादेव मंदिर

गंगापूर रोड, ता. जि. नाशिक


देवादिकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर असले, तरी तशीच ख्याती असलेले दुसरे मंदिर आहे ते म्हणजे सोमेश्वर महादेव मंदिर! गोदावरीच्या काठावर गंगापूर रोडवर असणारे हे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. हे स्वयंभू मंदिर असून, मंदिराखालूनच गुप्त गंगा वाहत असल्याचे सांगितले जाते.

सोमेश्वर मंदिराचा उल्लेख पद्मपुराणात आढळतो. त्यानुसार एकदा स्वर्गलोकात देवसभा सुरू होती. त्यात ब्रह्मदेव निंदानालस्ती करीत होते. क्रोध अनावर झाल्याने महादेवाने रागाच्या भरात ब्रह्मदेवाचे पाचवे मुख छाटून टाकले. यानंतर सभेत अत्यंत शांतता पसरली. महादेवाने आपला राग शांत करावा, यासाठी देवांनी त्यांच्याकडे विनवणी केली. त्यानंतर महादेवाचा राग शांत झाला, पण आपल्या हातून ब्रह्महत्येचे पातक घडल्यामुळे महादेव खिन्न झाले. तसेच त्यांच्या खड्गावर ब्रह्मदेवाचे ते शिर तसेच होते.

या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावे, असा विचार करून त्यांनी पृथ्वी तीर्थाटनासाठी प्रारंभ केला. यावेळी वाटेत त्यांना ब्रह्मदेवाचे पुत्र नारद भेटले. नारदांनी सांगितले की, ब्रह्महत्येचे पातक दूर करण्यासाठी नाशिकच्या सोमेश्वर येथे देवनारायण शर्मा नावाचा ब्राह्मण राहतो. तेथे तुम्ही जा, तुम्हाला पातक घालविण्याचा मार्ग नक्की सापडेल. हे ऐकून शिवशंकर तत्काळ सोमेश्वराच्या ठिकाणी आले आणि त्या ब्राह्मणाकडे थांबले.

यावेळी रात्री त्या ब्राह्मणाच्या गोठ्यात असलेली गाय आणि वासरू (नंदी) यांच्यात संवाद सुरू होता. वासरू म्हणाले, ‘माझ्या नाकात ब्राह्मणाने उद्या सकाळी वेसण घातली; तर मी त्याला ठार मारेन.’ हे ऐकून गाय म्हणाली, ‘अरे, पण त्यामुळे तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल. तू असे करू नकोस.’ त्यावर वासरू म्हणाले, ‘तू काळजी करू नकोस. ब्रह्महत्येचे पातक दूर करण्याचा उपाय मला माहीत आहे.’ गाय-वासराचा हा संवाद महादेवाने ऐकला. आता आपल्याला या वासरावर लक्ष ठेवावे लागेल, असा विचार करून महादेव झोपी गेले. सकाळ होताच ब्राह्मणाने गोठ्यात येऊन वासराला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी वासराने ब्राह्मणावर हल्ला केला आणि ब्राह्मणाला ठार केले. त्यानंतर वासराने गोदावरी नदीच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. महादेव हे सर्व पाहातच होते. वासरू निघाल्यानंतर महादेवही त्याच्या मागे मागे निघाले. वासरू रामकुंडाच्या ठिकाणी येऊन थांबले आणि त्याने गोदावरी नदीत डुबकी मारली. त्यामुळे वासराचे पाप धुतले गेले. हे पाहून महादेवांनीही नदीत उडी घेतली आणि त्यांचेही पापक्षालन झाले. अशा प्रकारे वासरामुळे महादेवांचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले आणि यामुळे हे वासरू त्यांचे गुरू ठरले. त्यामुळे रामकुंडाच्या समोर कपालेश्वराची स्थापना करण्यात आली आहे, परंतु या ठिकाणी नंदीची स्थापना नाही. शंकराचे हे एकमेव असे मंदिर आहे, जेथे नंदी नाही. त्यानंतर गंगापूर गावाजवळील सोमेश्वर येथे देवादिकांनी ब्राह्मणाच्या घराच्या ठिकाणी महादेवाचे मंदिर स्थापन केले. हेच ते सोमेश्वर मंदिर. येथे शिवलिंग असून, ते स्वयंभू असल्याने त्याची जिल्ह्यात ख्याती आहे. या मंदिराखालूनच गुप्त गंगा वाहत असून, ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रगट झाल्याचे, तसेच तिचा प्रवाह अव्याहत सुरू असल्याचे सांगण्यात येते.

गोदावरीच्या काठी असलेले हे प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर नाशिक शहरापासून जवळच असलेल्या गंगापूर रस्त्यावर आहे. धार्मिक स्थळाबरोबरच नाशिककरांचा पिकनिक स्पॉट म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटांचे या परिसरात चित्रीकरणही होत असते. मंदिरासमोरून गोदावरी पात्रात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे नौकानयनही होत असल्याने सुटीच्या दिवशी अनेक पर्यटक येथे येतात.

मंदिराचा परिसर विस्तीर्ण असून, वृक्षराजींनी बहरलेला आहे. मोठ्या वृक्षांच्या सावलीत सोमेश्वराचे पुरातन मंदिर उभे आहे. शंकराच्या मुख्य मंदिरासोबतच मंदिर प्रांगणात राम-जानकी, श्रीदत्त, लक्ष्मीनारायण, हनुमंत यांचीही मंदिरे आहेत. येथील रामाच्या मंदिरात एकांतात टाळी वाजविल्यास घुंगरांच्या किंवा पैजणांच्या आवाजाच्या रूपात प्रतिध्वनी येतो, असे सांगितले जाते. सोमेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातच ओमकार, डमरू आणि त्रिशूळ ही चिन्हे आहेत. सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची अलोट गर्दी होते. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येथे यात्रा भरते. या मंदिरात सकाळी ६, दुपारी १२ व रात्री ९ वाजता आरती होते. भाविकांना सकाळी पाच ते रात्री ९.३० या वेळेत सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.


उपयुक्त माहिती:

  • नाशिक शहरापासून ८ किमी अंतरावर
  • नाशिकपासून एसटी व महापालिका परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीचे अनेक पर्याय
Back To Home