राजगुरूनगरपासून जवळच भीमा नदीच्या काठावर निसर्गसमृद्ध परिसरात चास हे गाव वसले आहे. येथील ग्रामदैवत असलेले सोमेश्वर मंदिर तेथे असलेल्या आगळ्या-वेगळ्या दीपमाळेमुळे प्रसिद्ध आहे. एकाचवेळी २५६ दिवे लावता येतील, अशी रचना असलेली ही डौलदार व उंच दीपमाळ त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री दिवे लावून उजळविली जाते. सर्व मंदिर परिसर या प्रकाशाने उजळून निघतो. यावेळी गावातील विजेचे दिवे बंद करण्यात येतात. हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविक येथे उपस्थित असतात.
चास हे गाव बाजीराव बल्लाळ म्हणजेच थोरले पेशवे यांच्या पत्नी काशीबाई यांचे माहेर. काशीबाईंची सोमेश्वरावर खूप श्रद्धा होती. काशीबाईंचे वडील महादजी कृष्ण चासकर-जोशी यांनी मुलीच्या विनंतीवरून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. ते या भागातील सावकार होते. त्यांच्या पुढाकारानेच १७४९ साली हे मंदिर उभे राहिले, अशी नोंद आहे. त्याआधी येथे प्राचीन मंदिर होते. शिलालेख आणि काही मूर्ती अद्यापही या परिसरात त्याची साक्ष देतात. उत्सव काळात काशीबाई आणि पेशवे सोमेश्वराच्या दर्शनासाठी येत असत, असे सांगितले जाते.
सोमेश्वर मंदिर भीमा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. मंदिराभोवती चोहोबाजूने तटबंदी आहे. भक्कम अशा दिंडी दरवाजातून आत आल्यावर प्रांगणात साकारलेल्या सुंदर उद्यानामुळे मंदिराचे सौंदर्य खुलते. सभामंडप, गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. मंदिरावरील कळस मराठेशाहीच्या वास्तूस्थापत्याचे दर्शन घडवितो. त्यावर देवी-देवतांची सुंदर शिल्पे आहेत. मुख्य मंदिरासमोरील मंडपात नक्षीकाम केलेला नंदी विराजमान आहे. नंदी मंडपाच्या शेजारीच देवासाठी लागणारे चंदन घासण्यासाठी दगडांची अनोख्या पद्धतीची रचना आहे. सभामंडपाच्या कलाकुसर केलेल्या द्वारपट्टीवर गणेशमूर्ती आहे. कोनाड्यांत देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यातील शिवपिंडी ही आकाराने मोठी आहे.
या मंदिरात महाशिवरात्र व त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी होते. (ब्रह्मदेवाच्या वरामुळे उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुर राक्षसाचा शंकराने या दिवशी वध केला म्हणून हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.) त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते. येथील दिव्यांनी उजळलेली दीपमाळ पाहण्यासाठी अनेक संस्थांकडून सहली आणल्या जातात. श्रावण व कार्तिक महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येथे रुद्राभिषेकासह अनेक विधी होतात. या सर्व उत्सवी सोहळ्यात काशीबाईंचे वंशज चासकर कुटुंबीयांचा सहभाग असतो. सोमेश्वर महादेवाच्या दर्शनाने व्याधी दूर होतात, गृहकलह दूर होतो, अशी पेशव्यांचीही श्रद्धा होती.
महाशिवरात्री व कार्तिकी पौर्णिमेला अनेक दानशूर व्यक्तींकडून येथे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी आरती होते. सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत भाविकांना सोमेश्वराचे दर्शन घेता येते.