सदैव उन्मनी अवस्थेत राहणारे सत्पुरूष व स्वामी समर्थांचे शिष्य सद्गुरू सीताराम महाराज मंगळवेढेकर यांच्या समाधी मंदिरामुळे खर्डी हे गाव प्रसिद्ध आहे. सीताराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या गावास ‘प्रति गाणगापूर’ असेही म्हटले जाते. महाराजांचे येथील समाधी मंदिर हे एक सिद्ध स्थान असल्याचे मानले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की भूतबाधा झालेल्या व्यक्तीस येथे आणले असता ती त्यातून मुक्त होते. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात याकरीता येथे येऊन नवसही करतात.
सीताराम महाराज यांच्याविषयी माहिती अशी की बहामनी काळातील थोर संत दामाजीपंत यांच्या मंगळवेढे या गावात, १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या तीन वर्षे आधी, चैत्र शुद्ध ९ शके १७७६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव असे होते. ते सरकारी नोकरी करीत असत. लहानपणीच सीताराम महाराजांचे मातृछत्र हरवले होते. सावत्र मातेच्या छळास कंटाळून त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी गृहत्याग केला. मंगळवेढ्यावरून ते अक्कलकोट येथे आले. याबाबत आख्यायिका अशी की ते अक्कलकोटहून ४–५ मैल अंतरावर असतानाच स्वामी समर्थ यांनी ते येत असल्याचे अंतर्ज्ञानाने जाणले व आपल्या भक्तांना म्हणाले की ‘अरे तो पाहा सीत्या आला. त्याला लवकर आणा.’ यानंतर स्वामींनी सीताराम महाराज यांना आपल्याकडे सुमारे सात वर्षे ठेवून घेतले.
असे सांगितले जाते की एके दिवशी स्वामी समर्थांनी सीताराम महाराजांना जवळ बोलावून घेतले व सांगितले की ‘अभि तुम्हारा हमारा कूच लेन देना बाकी नही। जहांसे आया वहा चले जाव। ये कली का बाजार है। इसमे पागल सीत्या बनके रहना।’ स्वामींच्या आज्ञेनुसार ते मंगळवेढ्यास परतले. येथे अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य होते. या काळात लोक त्यांना वेडा समजत असत. त्यांना अन्न–वस्त्राची फिकीर नसे. स्वामींचे ज्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलेले आहे, असे भक्त सांगतात की ते नेहमी उन्मनी अवस्थेत असत. एखादी व्यक्ती पाचशे वेळा त्यांना भेटून गेली तरी त्यांना त्याच्या नामरूपाची ओळख राहात नसे. ते वृत्तिशून्य योगेश्वर होते व अखंड आनंद–अनुभवात ते मग्न असत. एकदा काही टवाळ लोकांनी त्यांना कीर्तनासाठी उभे केले असता, ते एकच वाक्य बोलले की ‘घरात दिवा अन् दारात धडपडतो’. या वाक्याने सर्वांना त्यांच्या ज्ञानाचा प्रत्यय आला. या काळात त्यांनी अनेकांना आपल्या चमत्कारशक्तीचा प्रत्यय दिला.
सीताराम महाराजांचा गोंदवलेकर महाराज, लक्ष्मणबुवा वाखरीकर, तसेच सांगलीचे संस्थानिक श्रीमंत धुंडीराव (तात्यासाहेब) पटवर्धन यांच्याशी स्नेहसंबंध होता. पटवर्धन राजे महाराजांच्या दर्शनासाठी येत, तेव्हा ते त्यांच्याकरीता आवर्जून डझनभर कफन्या आणत असत. महाराज या कफन्या गरीबांना देत किंवा फाडून त्यांची लक्तरे करीत. कार्तिक वद्य १३, शके १८२५, इ.स. १९०३ रोजी त्यांचे निधन झाले. जेथे त्यांनी देहत्याग केला त्याच ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे.
खर्डी गावाच्या वेशीवर मुख्य रस्त्यालगत असलेल्या महाराजांच्या समाधी मंदिराभोवती आवारभिंत आहे. मंदिराच्या दुमजली प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत व त्यात दत्तात्रेय, बटू वामन, कालिका माता इत्यादी मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात दोन चौथरे व त्यावर गोलाकार व वर निमुळत्या होत गेलेल्या दीपमाळा आहेत. या प्रांगणात मंदिरासमोर नव्याने उभारण्यात आलेला दर्शनमंडप व त्यावरील मजल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह आहे.
पुढे खुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात प्रत्येकी चार गोलाकार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभांवर तुळई व त्यावर छत आहे. छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. वितानावर चक्राकार नक्षी आहे. सभामंडपापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी सीताराम महाराजांचे समाधी स्थान व मागील मखरात महाराजांची ध्यानमुद्रेतील मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर चारही कोनांवर चार लघूशिखरे आहेत. त्यावर प्रत्येकी दोन आमलक व कळस आहेत. छतावर मध्यभागी मुख्य शिखर सुमारे वीस फूट उंचीचे आहे. त्यावर या गोलाकार शिखरावर स्तंभनक्षी आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व कळस आहेत.
समाधी मंदिराच्या समोर सभामंडपाच्या दुसऱ्या बाजूला दगडी बांधकाम असलेले मारूतीचे प्राचीन मंदिर आहे. गर्भगृहात मारूतीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावर सुमारे पंचवीस फूट उंच व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. चार थरांच्या शिखरातील मधल्या दोन थरांत प्रत्येकी बारा देवकोष्टके आहेत. त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. खालील थरात कमळदल रिंगण व वरील थरात स्तंभनक्षी आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व कळस आहेत. मारूती मंदिराला लागून श्रीराम मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता व दास हनुमान यांच्या मूर्ती आहेत.
सीताराम महाराजांचे शिष्य गोसावी महाराज यांचा समाधी मंडप येथे आहे. या मंडपात मध्यभागी गोसावी महाराज समाधीचा चौथरा आहे. चौथऱ्याच्या वरील शिखराकार भागात चारही बाजूंना खिडकीवजा बोळ आहे. त्यात आतील बाजूला लोखंडी चिमटे आहेत. भूतबाधा झालेली व्यक्ती इथे आणल्यावर या बोळातून कमरेपर्यंत आत शिरते व त्याच्या अंगाला आत असलेल्या लोखंडी चिमट्यातील एक चिमटा लागतो. मग त्या व्यक्तीला मंदिराच्या शेजारी असलेल्या तीर्थ डोहात अंघोळ घातल्यास चिमटा गळून पडतो व भूतबाधा उतरते, अशी श्रद्धा आहे.
या मंदिरात दिवसातून दोन वेळा पूजा, आरती, नैवेद्य, हरिपाठ असा नित्यक्रम असतो. महाराजांचा पालखी सोहळा चैत्र शुद्ध द्वितीयेपासून वद्य त्रयोदशीपर्यंत चालतो. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्तिक वद्य त्रयोदशीला श्रींच्या समाधीवर दुपारी बारा वाजता पुष्पवर्षाव केला जातो. त्यानंतर पालखीची मिरवणूक होते. राज्याबरोबर कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आदी भागांतून भाविक येथे हजेरी लावतात. पायी पालखीचे गाणगापूरकडे प्रस्थान होते आणि यात्रेची सांगता होते. या काळात येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वार्षिक पुण्यतिथी सोहळ्यासाठी येथे हजारो भाविक उपस्थित असतात. येथे गुरूपौर्णिमा उत्सव, निर्जला एकादशी, गुरू द्वादशी, त्रिपुरी पौर्णिमा उत्सव, दत्त जयंती, गुरूप्रतिपदा आदी उत्सवही साजरे केले जातात.