यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्याचे ग्रामदैवत असलेले रावेर येथील सीतामाता मंदिर हे एकमेव असे मंदिर असल्याचे सांगितले जाते की ज्या मंदिराचे पुराणात उल्लेख आढळतात. त्रेता युगात दंडकारण्य असलेल्या या ठिकाणी श्रीरामांनी गर्भवती सीतेला लक्ष्मणाकरवी सोडले होते. येथे सीतामाता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहत होती व येथेच लव आणि कुश यांचा जन्म झाला, असा पुराणात उल्लेख आहे. भाविकांचे श्रद्धास्थान, मंदिराचे धार्मिक महत्त्व व येणाऱ्या भाविकांची संख्या यावरून राज्य सरकारनेही या मंदिराचा तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देऊन गौरव केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव हा आदिवासीबहुल तालुका आहे. येथील प्रसिद्ध असलेले सीतामाता मंदिर हे फार प्राचीन असल्यामुळे ते जीर्ण झाले होते. २००१ मध्ये शेतकरी नेते शरद जोशी यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने जीर्णोद्धार केल्यानंतर या मंदिराला आताचे स्वरूप आले आहे. दिल्ली येथील श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थेने काही वर्षांपूर्वी देशभरात केलेल्या संशोधनात त्यांना वनवास काळातील श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेली २९४ तीर्थे आढळली होती. त्यामध्ये अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश आहे. त्यातील १४१ क्रमांकावर रावेरी या तीर्थक्षेत्राचा समावेश आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील प्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी रावेरी येथील सीतामातेच्या मंदिर परिसरातील माती व रामायणात उल्लेख असलेल्या तमसा नदीचे (आताची रामगंगा) पाणी पाठविण्यात आले होते. याशिवाय आणखी एक योगायोग म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येच्या राममंदिराचे उद्घाटन झाले त्याच दिवशी रावेरी येथील सीतामाता मंदिरात सीतामातेच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली होती. असे सांगितले जाते की मंदिराजवळून वाहणारी रामगंगा नदी सीतामातेने बोलावल्यामुळे उत्तरवाहिनी होऊन येथे आली आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की श्रीरामांनी रावणाचा पराभव करून सीतामातेला अयोध्येत परत आणल्यानंतर काही लोकांकडून तिच्या पावित्र्याबद्दल शंका घेण्यात आली. आपण पवित्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी सीतामातेने अग्निपरिक्षा दिली. तरीही नागरिकांमध्ये कुजबूज सुरूच होती. त्यामुळे श्रीरामांनी गर्भवती सीतेला लक्ष्मणाच्या रथात बसवून दंडकारण्यात सोडण्यास सांगितले. ज्या ठिकाणी सीतामातेला लक्ष्मणाने सोडले तेथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. येथेच तिने लव व कुश या दोन मुलांना जन्म दिला. वाल्मिकी ऋषींच्या तालमीत लव आणि कुश यांचे बालपण गेले. या काळात वाल्मिकींनी त्यांना विविध विद्या, शास्त्र व शस्त्रांमध्ये पारंगत केले होते.
इकडे श्रीरामांनी अयोध्या येथे अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी सोडलेला यज्ञाचा घोडा लक्ष्मण व शत्रुघ्न यांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्ये आपल्या ताब्यात घेत चालला होता. हा घोडा या परिसरात आला असताना लव आणि कुश यांनी तो रोखून धरला. या वेळी झालेल्या युद्धात त्यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्नचा पराभव केला. श्रीरामांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी हनुमानाला ते दोन बालक पकडून आणण्यासाठी पाठविले. येथे येताच हनुमानाला या बालकांची ओळख पटली व त्याने त्यांच्यासोबत युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या महापराक्रमी हनुमानाला लव व कुश यांनी वेलींच्या साह्याने बांधून ठेवले. आज याच ठिकाणी हनुमानाचेही मंदिर असून त्यात हनुमानाची मूर्ती आजही बांधलेल्या स्थितीत आहे.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, रावेरी गाव आणि येथील परिसर पूर्वी दंडकारण्याचा भाग होता. याच गावात लव आणि कुश यांचा जन्म झाल्यानंतर सीतेने गावातील लोकांकडे पसाभर गहू मागितले; परंतु ते देण्यास लोकांनी नकार दिल्याने सीतेने या गावात गहू पिकणार नाहीत, असा शाप दिला. तेव्हापासून शेकडो वर्षे या गावात गव्हाचे पीक घेतले जात नसे; परंतु असे सांगितले जाते की साधारणतः १९०० साली ग्रामस्थांनी सीतामातेला साकडे घालून, पिकलेला गहू मंदिरात भेट दिल्याशिवाय आम्ही एकही दाणा खाणार नाही, असा संकल्प केला व गहू पिकविण्यास सुरुवात केली. आज १२५ वर्षांनंतरही येथील शेतकऱ्यांकडून पिकलेला गहू प्रथम सीतामातेच्या मंदिरात आणला जातो व त्यानंतरच तो घरच्या कोठारात अथवा विक्रीसाठी बाजारात पाठविला जातो.
हेमाडपंती रचनेचे सीतामातेचे मंदिर हे उंच जोत्यावर असून दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे त्याचे स्वरूप आहे. सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर असल्याचे सांगितले जाते. दर्शनमंडप व सभामंडपात दगडी स्तंभ असून अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला श्रीगणेश व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर दोन्ही बाजूला शिल्पे कोरलेली असून ललाटबिंबावर श्रीगणेशाचे स्थान आहे. गर्भगृहात सीतामातेच्या मूर्तीसमोर शिवपिंडी आहे. असे सांगितले जाते की सीता ही महादेवांची भक्त होती. येथील शिवपिंडीच्या खाली एक विहीर असून शिवपिंडीच्या बाजूलाच एक कुंड आहे त्यामध्ये सतत पाणी असते. या कुंडाला येथील ग्रामस्थ ‘सीतेची न्हाणी’ असे संबोधतात. मंदिराच्या आवारात वाल्मिकी ऋषींचे तपस्यास्थान आहे, तर मंदिरापासून काही अंतरावर नदीकिनाऱ्यावर हनुमान मंदिर आहे. हे देवस्थान हनुमंताचे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते.
सीतामातेच्या मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, सीता नवमी आणि नवरात्र हे उत्सव साजरे केले जातात. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच येथे कमी खर्चामध्ये गरीब कुटुंबातील मुला–मुलींची लग्ने लावली जातात. दरवर्षी येथे हजारो भाविक आदिशक्तीचे दर्शन घेण्यासाठी येतात.