सिद्धनाथ मंदिर

अकोला (वासूद), ता. मंगळवेढा, जि. सोलापूर

भगवान शंकराचे रूप असलेल्या आणि काळभैरव स्वरूपात पूजल्या जाणाऱ्या सिद्धनाथाच्या प्राचीन मंदिरामुळे मंगळवेढा तालुक्यातील अकोला (वासुद) हे गाव ओळखले जाते. माण नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या गावातील सिद्धनाथाचे मंदिर चौदाव्या शतकात बांधण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. सिद्धनाथाचे येथील मंदिरसर्वतोभद्रपद्धतीचे आहे. या शिवाय मंदिरासमोरील शिल्पांकित दीपमाळ हे येथील एक आकर्षण मानले जाते. सिद्धनाथ ही ग्रामसंरक्षक देवता आहे. या भागातील अनेक घराण्यांचे ते कुलदैवतही आहे. सिद्धनाथ ही नवसाला पावणारी देवता आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मुस्लिम संतकवी शहामुनी यांनी रचलेल्यासिद्धांतबोधया ग्रंथामध्ये सिद्धनाथाची आख्यायिका आहे. नगर जिल्ह्यातील पेडगाव येथे जन्मलेल्या शहामुनी ऊर्फ शहाहुसेन यांनी पेशवाईच्या काळात .. १७७८ मध्ये या ग्रंथाची रचना केली होती. ‘शिवलीलामृताचे कर्ते थोर ग्रंथकार श्रीधरस्वामी नाझरेकर यांनीही सिद्धनाथाची कथा सांगितली आहे. त्यानुसार, प्राचीन काळी काळासूर नावाच्या एका दैत्याने दक्षिण भागातील ऋषीमुनींचा मोठा छळ चालवला होता. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते शंकराकडे गेले. त्यांची याचना ऐकून शंकराने आपल्या जटा जमिनीवर जोराने आपटल्या. त्यातून एका सिद्ध पुरुषाची निर्मिती केली. त्याचेच नाव सिद्धनाथ. शंकराच्या सांगण्यावरून त्याने पाताळलोकातील पाच कुंडांतील जल प्राशन करून दिव्य शक्ती प्राप्त केली त्या योगे काळासुराचा वध केला

काळभैरव, भैरवनाथ, शिदोबा सिद्धेश्वर या नावांनी संबोधल्या जाणाऱ्या सिद्धनाथाचे अकोला (वासूद) येथील मंदिर यादवकालीन असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मुघल आक्रमकांनी या मंदिराची हानी केली होती. येथून सुमारे ६० किमी अंतरावरील ब्रह्मपुरी हे काही काळ मोगलांच्या सत्तेचे मोठे केंद्र होते. मराठा सत्तेचा पाडाव करण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेब बादशहाने २१ मे १६९५ ते १६ ऑक्टोबर १६९९ या काळात आपल्या सैन्याची विशाल छावणी ब्रह्मपुरी येथे टाकली होती. त्या साडेचार वर्षांच्या काळात या मंदिरास हानी पोचली असावी, असा अंदाज आहे. पुढे एकोणिसाव्या शतकात सरदार श्यामराव लिगाडे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे सांगण्यात येते. श्यामराव लिगाडे हे पेशवेकालीन सरदार घराण्यातील होते. अकोले गावी १८८०च्या सुमारास त्यांचा जन्म झाला. ते पट्टीचे शिकारी होते. या छंदामुळे कोल्हापूरचे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंध जुळले होते. सोलापूरमधील बहुजनांचे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते महत्त्वाचे नेते होते. पंढरपूर येथे त्यांनी स्वखर्चानेमराठी बोर्डिंगकाढले होते. सरदार श्यामराव लिगाडे यांनी आपल्या जन्मगावातील या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर काही वर्षांनी ग्रामस्थांनी वर्गणी काढून पुन्हा मंदिराचे नूतनीकरण केले. त्यातून मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे

या मंदिराचे विहंगावलोकन केल्यास त्याचा आकार विमानासारखा भासतो. हे सर्वतोभद्र पद्धतीचे मंदिर आहे. सर्वतोभद्र म्हणजे सर्व बाजूंनी शुभ. ज्या मंदिरात चारही दिशांनी प्रवेश करता येतो ज्या मंदिरामध्ये गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग असतो, त्या मंदिरास सर्वसाधारणतः सर्वतोभद्र असे म्हणतात. ‘विष्णुधर्मोत्तर पुराणा या प्रकारच्या मंदिरांना विशेष महत्त्व दिलेले आहे

अकोला (वासुद) येथील मध्यवर्ती ठिकाणी सिद्धनाथ मंदिर आहे. या मंदिराभोवती किल्ल्यासारखी सुमारे २० फूट उंचीची दगडी तटबंदी आहे. तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारासमोर बाहेरील बाजूला एका उंच चौथऱ्यावर प्राचीन दगडी दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभावर वर चढण्यासाठी विशिष्ट अशी दगडांची रचना आहे. तटबंदीत असलेल्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कक्षासने आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारपट्ट्यांवर कलाकुसर आहे. खालील भागात किर्तीमुख ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. दगडी बांधकाम असलेल्या या प्रवेशद्वाराच्या अग्रभागी बाशींगी कठडा, त्यावर सुंदर कलाकुसर आणि त्यावरील भागात आमलक कळस आहे. या प्रवेशद्वाराला रंगकाम केल्यामुळे ते सुंदर भासते

तटबंदीमधील प्रवेशद्वारातून आत आल्यावर या मंदिराचे आकर्षण असलेली दीपमाळ नजरेत भरते. वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर विविध शिल्पांनी अंकीत असलेल्या या दीपमाळेला चौदा थर आहेत. या प्रत्येक थरांमध्ये असलेले हस्त हे विविध प्राण्यांच्या आकाराचे आहेत. ४० फूट उंचीच्या या दीपमाळेवर सुमारे १०५ शिल्पे कोरण्यात आली आहेत. साधारणतः सर्व दीपमाळा चौथऱ्यावर उभ्या असतात. परंतु या दीपमाळेची रचना पाहता ती चार स्तंभांवर उभी असल्याची भासते. पहिल्या थरात जमिनीपासून चार अष्टकोनी स्तंभ उभे आहेत त्यांच्या आतील भागात असलेल्या अष्टकोनी दगडी बांधकामातील देवकोष्टकांमध्ये चार दिशांना विविध देवतांच्या मूर्ती आहेत. या पहिल्या थराच्या वर दीपमाळेच्या बाजूने कलाकुसर केलेली गजराज शिल्पे आहेत. त्यावरील थरांमध्ये विविध प्राण्यांच्या शिल्पांचा दीपमाळेतील हस्त म्हणून वापर केलेला आहे. अतिशय नाजूक कोरीव काम असलेली अशा प्रकारची दीपमाळ ही अभावानेच पाहायला मिळते. विशेष म्हणजे शेकडो वर्षांपासून उन, पावसाचा मारा सहन करूनही तिच्यावरील शिल्पसौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही

दीपमाळेच्या समोरील बाजूस सिद्धनाथ मंदिराचे प्रवेशद्वार आहे. जमिनीपासून उंच जगतीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. सभामंडप दोन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. प्रवेशद्वाराजवळ असलेले तीन स्तंभ दोन महिरपी कमानींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपातील सर्व नक्षीदार स्तंभ एकमेकांशी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात एका देवकोष्टकात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे

सभामंडपाच्या डावीकडे असलेल्या लहान गर्भगृहात मारुतीची मूर्ती, तर उजवीकडील मुख्य गाभाऱ्यात वज्रपिठावर सिद्धनाथ बाबा आणि जोगेश्वरी देवी यांच्या मूर्ती आहेत. सिद्धनाथाच्या डोक्यावर फेटा आहे चेहऱ्यावरील भारदार मिशी, डोळे आणि कपाळावरील गंध चांदीचे आहेत. मूर्तीच्या दोन्ही हातांमधील बोटांत अंगठ्या आहेत. जोगेश्वरी देवीच्या डोक्यावर मुकुट, डोळे नथ चांदीची आहे. या दोन्ही मूर्ती भरजरी वस्त्रे ल्यालेल्या आहेत. गर्भगृहातील स्तंभ भिंती पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत आणि त्यावर सुंदर कलाकुसर आहे. सिद्धनाथ जोगेश्वरी या मूर्तींच्या मागे फणाधारी सापाचे शिल्प कोरलेले आहे त्यावरील बाजूस किर्तीमुख आहे. मंदिराच्या प्रांगणात अनेक लहान लहान मंदिरे आहेत. त्यामध्ये श्रीदत्त, हनुमान, श्रीराम, सीता, शिवपिंडी, श्रीकृष्ण, विठ्ठल, रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरात रामनवमी, सीमोल्लंघन सोहळा, नवरात्र हे उत्सव साजरे केले जातात. चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा असते. यात्रेनिमित्त मंदिरासोबतच परिसराची सजावट करण्यात येते. ‘बम बम भोलेच्या गजरात केले जाणारे कावडी नृत्य हे या यात्रेचे आकर्षण असते.

उपयुक्त माहिती

  • सांगोला येथून किमी, तर सोलापूर पासून ९४ किमी अंतरावर
  • सांगोला मंगळवेढा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home