
आत्मसाधनेद्वारे जो आध्यात्मिक प्रगती साधून आपल्या जाणीवांवर नियंत्रण ठेवतो, शिवाशी एकरूप होतो आणि ज्याला दिव्य शक्ती प्राप्त होतात, त्याला शैव संप्रदायात सिद्ध असे म्हटलेले आहे. संत ज्ञानेश्वरांनी नाथ संप्रदायाला सिद्धपंथ असे म्हटले आहे. या पंथात चौऱ्यांशी सिद्ध सांगितले आहेत. या सिद्धांचा ईश्वर तो सिद्धेश्वर. ‘कल्पसमूह संहिता’ या ग्रंथात ‘सिद्धेश्वर देव असे तेथे सिद्धि असे’ असे म्हटलेले आहे. अशा या सिद्धेश्वराची अनेक मंदिरे महाराष्ट्र तसेच कर्नाटकात आहेत. सिद्धनाथ येथील सिद्धेश्वर मंदिर हे त्यातीलच एक प्राचीन मंदिर होय.
या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कलमडी या गावात हावजीपंत कुलकर्णी हे सिद्धेश्वराचे परमभक्त राहात असत. ते सिद्धनाथ येथे आल्यानंतर त्यांच्यासाठी सिद्धेश्वर देव या ठिकाणी प्रकट झाला. कालांतराने येथे त्याचे मोठे मंदिर बांधण्यात आले. सिद्धेश्वर हा देव अनेक गावांचे ग्रामदैवत आहे. त्यामुळेच या गावालाही सिद्धनाथ हे नाव पडले असावे, असे येथील ग्रामस्थ सांगतात. वीरशैव आणि लिंगायत धर्माच्या प्रभावामुळे या भागात सिद्धेश्वराची अनेक मंदिरे बांधण्यात आली आहेत. या मंदिरात एक शिलालेख आहे, त्यावरून येथील मंदिर इ.स. ८०० मध्ये बांधण्यात आले, असे सांगण्यात येते. हेमाडपंती शैलीत बांधलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सभामंडपात एक नव्हे, तर चक्क तीन नंदीमूर्ती आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सिद्धनाथ गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराभोवती दहा फुटांची दगडी तटबंदी आहे. तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारासमोर एक तुळसी वृंदावन व त्या शेजारी कक्षासने आहेत. प्रवेशद्वाराशेचारी असलेल्या दोन चौथऱ्यांवर दोन स्तंभ आहेत. या स्तंभांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. हे दोन स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील भागात श्रीशंकराची मूर्ती व त्याच्या दोन्ही बाजूंना दोन कमळपुष्प व त्यावर नंदीची शिल्पे आहेत. या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी प्राचीन दगडी स्तंभ आहे. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. तटबंदीच्या आतील भागात मंदिराच्या सर्व बाजूंनी ओवऱ्या आहेत.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. खुल्या रचनेच्या येथील सभामंडपातील सर्व स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. तटबंदीतील प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला एक अखंड तेवणारा नंदादीप आहे. अनेक भाविक नवसपूर्तीनिमित्त यामध्ये तेल टाकतात. या नंदादीपाजवळ एक विरगळ व प्राचिन दगडी नागप्रतिमा आहे. त्यापुढे सभामंडपात एक दगडी चौथरा व त्यावर स्थानिक देवतांचा पाषाण आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजुला प्राचिन दीपमाळा आहेत. त्यापैकी एका दीपमाळेचा सर्व भार तळाशी असलेल्या गजमुखशिल्पांनी तोलून धरल्याचे भासते. मुळ मंदिरासमोर हा सभामंडप नंतरच्या काळात बांधलेला जाणवतो. मुळ प्राचीन मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर सभामंडपातील एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे.
अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर दोन्ही बाजुला नक्षीकाम आहे.
अंतराळात असलेले पाषाणी स्तंभ हे विविध भौमितिक आकाराचे आहेत. यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. या स्तंभांच्या मध्यभागी जमिनीवर तीन नंदी मूर्ती आहेत. येथून पुढे असलेल्या दगडी प्रवेशद्वारातून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी सिद्धनाथाची पिंडी आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही बाजूंनी बाशिंगी कठडा आहे. या कठड्याच्या चार बाजूना नंदीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे शिखर हे कमळफुलात सामावल्याचे भासते, असे वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम येथे आहे. या शिखरावर अनेक देवकोष्टके, त्यामध्ये शिल्पे व त्यावर लहान लहान कळस आहेत.
या मंदिरात दर सोमवारी, तसेच श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावणात येथे ब्राह्मण समाजातर्फे रुद्राभिषेक करण्यात येतो, तर श्रावणातील अखेरच्या सोमवारी लिंगायत समाजातर्फे मंदिरात उत्सव साजरा करण्यात येतो. महाशिवरात्रीलाही येथे मोठा उत्सव असतो. याच प्रमाणे विजयादशमीच्या दिवशी मंदिरातून सिद्धेश्वराची पालखी निघते. ही पालखी प्रथम येथील इनामदार ब्राह्मण व नंतर पाटील यांच्या घरी जाते. कलमाडीच्या हावजीपंत कुलकर्णी यांच्यामुळे देव येथे आला असल्याने या घराण्यातील लोकांनाही येथे विशेष मान असतो. या सोहळ्यास कलमाडी येथील अनेक कुलकर्णी येतात.