सिद्धेश्वर मंदिर
संत अमरदास बाबा समाधी मंदिर

रिसोड, ता. रिसोड, जि. वाशिम

रिसोड गावचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वराचे पुरातन मंदिर रिसोड-लोणी मार्गालगत आहे. या मंदिराला ८०० वर्षांचा इतिहास आहे. हेमाडपंती शैलीतील या मंदिरात संत अमरदास महाराज तपस्या करत असत. भाविकांची अशी श्रद्धा आहे की अमरदास महाराजांनी आपल्या तपसामर्थ्याने अनेक भक्तांची संकटे दूर केली व ते आजही भक्तांच्या साह्यास धावतात. अमरदास महाराजांची पुण्यतिथी आणि महाशिवरात्र हे या मंदिरातील सर्वांत मोठे उत्सव होत. या उत्सवांच्या वेळी येथे हजारो भाविकांची गर्दी होते.

शैव संप्रदायामध्ये, आत्मसाधनेद्वारे जो आध्यात्मिक प्रगती साधून आपल्या जाणिवांवर नियंत्रण ठेवतो, शिवाशी एकरूप होतो आणि ज्याला दिव्य शक्ती प्राप्त होतात, त्याला सिद्ध असे म्हटलेले आहे. संत ज्ञानेश्वरांनी नाथ संप्रदायाला सिद्धपंथ असे म्हटले आहे. नाथपंथात चौऱ्याऐंशी सिद्ध सांगितले आहेत. या सिद्धांचा ईश्वर तो सिद्धेश्वर. ‘कल्पसमूह संहिता’ या ग्रंथात ‘सिद्धेश्वर देव असे तेथे सिद्धि असे’ असे म्हटलेले आहे. अशा या सिद्धेश्वराची अनेक मंदिरे महाराष्ट्र तसेच कर्नाटकात आहेत. रिसोड येथील सिद्धेश्वर मंदिर हे त्यातीलच एक होय. येथे शिवलिंग स्वरूपात सिद्धेश्वराची पूजा केली जाते. या मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास अज्ञात आहे. मात्र काही अभ्यासकांच्या मते या मंदिराचा स्थापनाकाळ बाराव्या शतकातील असावा.

मंदिरातील एका स्तंभावर ‘मगरधज ७००’ असे शब्द कोरलेले आहेत. यावरून मंदिराच्या स्थापनाकाळाचे अनुमान बांधण्यात आले आहे. अभ्यासकांच्या मते, शैव संप्रदायातील नाथपंथामध्ये अनेक उपपंथ आहेत. ध्वज हा त्यातील एक उपपंथ आहे. मकरध्वज हे ध्वजपंथातील नाथयोगी होते. छत्तीसगडमधील रतनपूर येथील एका शैव मठाचे ते मठाधीश होते असाही काही अभ्यासकांचा कयास आहे. रतनपूर हे आज एक छोटेसे गाव आहे. मात्र अकराव्या शतकात ती कलचुरी राजवंशाची राजधानी होती. कलचुरी राजा रत्नदेव (प्रथम) याने या शहराची स्थापना केली होती. याच घराण्यातील जाजल्लदेव (प्रथम) या राजाच्या काळात योगी मकरध्वज यांचा मठ रतनपूर येथे होता. जाजल्लदेव यांचा काळ इ.स. १०९५ ते ११२० हा मानला जातो. यावरून मकरध्वज हे या सुमारास होऊन गेले असा अंदाज आहे.

रिसोड येथील मंदिरातील ‘मगरधज ७००’ हा लेख छत्तीसगड, मध्य प्रदेश येथील काही मंदिरांतील स्तंभांवर, मूर्तींच्या पादतलावर, एवढेच नव्हे तर शिवलिंगांवरही आढळलेला आहे. काही ठिकाणी ‘जोगी मगरध्वज ७००’ असे शब्दांकन केलेले आहे. या ७०० आकड्याचे गूढ अद्याप कायम आहे. ती त्यांच्या मठातील शिष्यांची संख्या असावी असे काहींचे अनुमान आहे. योगी मकरध्वज हे जाजल्लदेवाच्या काळात म्हणजे बाराव्या शतकात होऊन गेले. यावरून रिसोडचे सिद्धेश्वर मंदिरही त्याच काळातील असावे, असा कयास बांधण्यात आला आहे. इसवी सनाच्या दहाव्या आणि अकराव्या शतकात या भागावर कल्याणच्या चालुक्यांचे राज्य होते. इ.स. १०४९ मध्ये चालुक्य नृपती आहवमल्ल सोमेश्वर (पहिला) हा गादीवर आला. शिव, विष्णू, कोल्हापूरची महालक्ष्मी, तसेच कार्तिकेय ही चालुक्यांची प्रमुख उपास्य दैवते होती. त्यांच्या काळात अनेक मंदिरांची उभारणी झाली. येथून सुमारे ९० किमी अंतरावरील कोथळी बुद्रुक येथेही सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या स्थानमाहात्म्य कथेनुसार, त्या मंदिराची उभारणी इ.स. १०६० मध्ये म्हणजेच आहवमल्ल सोमेश्वर (पहिला) याच्या कारकिर्दीत करण्यात आली आहे. यावरून हे मंदिर चालुक्य काळातील असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येते.

या मंदिर परिसरातच संत अमरदास महाराज यांचे समाधी मंदिर आहे. वाशिम गॅझेटियरमध्ये त्यांचा उल्लेख अमरनाथ असा केलेला आहे. ते एकोणिसाव्या शतकात मध्य प्रदेशातील बैतूल भागातून येथे आले असे सांगण्यात येते. उपलब्ध माहितीनुसार, बैतूल परिसरातील एका गावात एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ते शिवभक्त होते. एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या पत्नीस स्वप्नदृष्टान्त झाला. तिच्या पोटी येणारा पुत्र शिवभक्त असेल, असे तिला सिद्धेश्वर महादेवाने स्वप्नात सांगितले. त्यानुसार या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी इ.स. १८५३ मध्ये अमरदास महाराज यांचा जन्म झाला. तेथून ते रिसोडला कसे व नेमके कधी आले हे अज्ञात आहे. येथे सिद्धेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य असे. त्यांच्या आशीर्वादाने मनोरथ पूर्ण होतात या श्रद्धेने अनेक भाविक त्यांच्या दर्शनास येत असत. ६ सप्टेंबर १९४५ रोजी त्यांनी समाधी घेतली.

सिद्धेश्वर मंदिर व संत अमरदास समाधी मंदिर हे येथील गंगा माँ उद्यानानजीक प्रशस्त व निसर्गरम्य अशा परिसरात वसले आहे. मंदिर परिसरास भव्य कमानदार प्रवेशद्वार आहे. येथील मार्गातून काही अंतर आत आल्यानंतर आणखी एक मोठे आधुनिक बांधणीचे प्रवेशद्वार आहे. येथून समोरच दिसते ते अमरदास महाराजांचे आधुनिक बांधकामशैलीतील भव्य मंदिर. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपावर उंच देवळी आहे. कमानदार स्तंभ असलेला मुखमंडप आणि सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भागात खालच्या बाजूस छोट्या ओट्यासारख्या संगमरवरी भिंतीवर गजरांग व मंगलकलश कोरलेला आहे. मंदिराच्या दर्शनीभिंतीवर संगमरवरी पाषाणात कोरीव नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहाच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूंस संगमरवरी जालवातायने आहेत. आत महाराजांच्या समाधीस्थानावर त्यांचा चांदीचा मुखवटा प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. या मुखवट्याच्या मस्तकी मोठा मुकुट आहे. गळ्यात शंकरास प्रिय असलेल्या रुद्राक्षांच्या अनेक माळा घातलेल्या आहेत. समाधीस्थानाच्या मागील बाजूस चंदेरी पत्रा जडवलेल्या नक्षीयुक्त अधिष्ठानावर अमरदास महाराजांची कषाय वस्त्रांकित व डोईस मुंडासे बांधलेली मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचे छत्र आहे. मागच्या बाजूस सुंदर नक्षीकाम केलेली चंदेरी प्रभावळ आहे. मंदिराच्या गर्भगृहावर चारही बाजूंनी वर निमुळता होत गेलेला कलश आहे. त्यावर आमलकाच्या जागी पॅगोडासारखा आकार आहे आणि त्यावर मोठा कलश आहे. मंदिरात गर्भगृहालगत एका स्थानी सुशोभित देवळ्यांमध्ये गणपती, सरस्वती, महालक्ष्मी, दुर्गादेवी, संतोषीमाता, शंकर, गजानन महाराज, रेणुकाचार्य, रामदेवबाबा, दत्तात्रेय, श्रीकृष्ण, श्रीराम-सीता, लक्ष्मी-नारायण, विठ्ठल-रुक्मिणी अशा देव-देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत.

संत अमरदास महाराज समाधी मंदिरापासून काही पावलांवर सिद्धेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरासमोर पत्र्याची शेड आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मोठ्या संगमरवरी देव्हाऱ्यामध्ये अमरदास महाराजांचे मोठे छायाचित्र लावलेले आहे. सिद्धेश्वराच्या या प्राचीन मंदिराचे दगडी प्रवेशद्वार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. याचे कारण म्हणजे त्याच्या उजव्या द्वारशाखेवर असलेली सतीशिळा. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, हे मूळ प्रवेशद्वार नाही. दुसऱ्या एका मंदिराच्या अवशेषांना एकत्र करून ते बनवले आहे. त्यामुळे त्यावर ही सतीशिळा दिसते. या द्वाराच्या पट्टिकेवर ललाटबिंबस्थानी गणेशाचे शिल्प आहे. मंदिरास मोठा आधुनिक बांधणीचा, परंतु ओवरीसदृश सभामंडप आहे. येथे संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची पाषाणातील जुनी मूर्ती विराजमान आहे. तिच्या मागच्या बाजूस संत अमरदास महाराज यांचे मोठे छायाचित्र आहे. या ठिकाणी महाराज ध्यानधारणेस बसत असत, असे सांगितले जाते. समोरच एका कोपऱ्यातील देवळीत गणेशाची, तर दुसऱ्या देवळीत हनुमंताची मूर्ती विराजमान आहे. येथून पुढे प्राचीन मंदिराचा मूळ भाग सुरू होतो. येथे प्रवेशभागात दोन्ही बाजूंस मोठे ओटे आहेत. पुढे मंदिराचा मूळचा सभामंडप आहे. कोरीव काम केलेल्या ताशीव स्तंभांवर पेललेल्या या सभामंडपात आता स्टीलचे पाईप लावून दर्शनरांग तयार करण्यात आली आहे. या सभामंडपाच्या छतावर पाषाणात कोरलेल्या चौकोनाकारांवर कीर्तिमुखांनी केलेली सजावट आहे. एरवी मंदिरांच्या द्वारशाखेवर गौण शिल्प म्हणून अंकित असलेले हे कीर्तिमुख काही चालुक्यकालीन मंदिरांच्या छतावरही कोरलेले दिसते. यावरून येथील सिद्धेश्वराचे मंदिर चालुक्यकालीन असल्याचा अंदाज बांधता येतो. सभामंडपातील एका स्तंभावर खालच्या भागात ‘मगरधज ७००’ ही अक्षरे कोरलेली आहेत. गर्भगृहासमोर छोटे अंतराळ आहे. गर्भगृहाच्या दगडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर, तसेच त्या बाजूस असलेल्या द्वारस्तंभांवर अलंकारिक कोरीव काम केलेले आहे. द्वारपट्टिकेवर ललाटबिंबस्थानी गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. त्यावरील उत्तरांगावर सप्तमातृकांची शिल्पे कोरलेली आहेत. या मातृका सात वा आठ अशा गटामध्ये असतात. येथे त्यांचा आठचा गट असून सोबत गणेशाचेही शिल्प कोरलेले आहे. गर्भगृहाचा आकार तुलनेने लहान आहे. आत जमिनीवर सिद्धेश्वराची मोठी पिंडी आहे. या पिंडीच्या शाळुंखेस पितळी आवरण व मध्यभागी उंच पाषाणलिंग आहे. त्यावर पंचमुखी नागदेवतेने फणा उभारलेला आहे. मागच्या बाजूला भिंतीवर सिद्धेश्वराचा पितळी मुखवटा आहे.

सिद्धेश्वर मंदिर व संत अमरदास समाधी मंदिराच्या आवारात दगडांनी बांधलेले द्रौपदीकुंड आहे. येथेच दगडी नंदी आणि शिवलिंग आहे. या मंदिराच्या परिसरात अनेक शिवलिंगे आहेत. त्याचप्रमाणे हनुमान, दत्त यांची छोटी मंदिरेही आहेत. येथे भक्तनिवास, तसेच गोशाळाही आहे.

श्रावण अमावास्येला अमरदास महाराजांच्या पुण्यतिथीस आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मोठा जत्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवांत अमरदास महाराजांची पालखी काढली जाते. त्याचप्रमाणे हरिनाम सप्ताह आणि महाप्रसादाचेही आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • रिसोड बसस्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • वाशिम येथून ४२ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून रिसोडसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९२२६४८८८०, ८८०६३८२२२७

सिद्धेश्वर मंदिर संत अमरदास बाबा समाधि मंदिर

रिसोड़, ताल. रिसोड़, जिला. वाशिम

Back To Home