सीना आणि भोगावती नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या नरखेड या गावामध्ये मध्ययुगीन कालखंडातील सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर स्थित आहे. या मंदिरातील शिवलिंग वालुकामय आहे. या शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांनी केली आहे, अशी मान्यत आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील सिद्धेश्वर महादेवाची श्रद्धापूर्वक मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. नरखेडच्या या ग्रामदैवताची चैत्रात तीन दिवसांची मोठी यात्रा असते. सिद्धेश्वरावरील श्रद्धेमुळे या गावात मंदिराहून अधिक उंच इमारत बांधली जात नाही. ही पूर्वापार रीत आजही पाळली जाते.
नरखेड हे गाव प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले गाव असल्याची लोकश्रद्धा आहे. या मंदिराविषयीची आख्यायिका अशी की सीतामातेचे अपहरण केल्याची शिक्षा म्हणून श्रीरामांनी रावणाचा वध केला. परंतु रावण हा शिवशंकराचा परमभक्त होता. तसेच तो वेदांचे अध्ययन करणारा ब्राह्मणही होता. त्याच्या वधामुळे श्रीरामांच्या हातून ब्रह्महत्येचे तसेच शिवभक्ताच्या हत्येचे पातक घडले. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रीरामांनी लंका ते अयोध्या या प्रवासात जेथे-जेथे विश्रांती घेतली त्या स्थानी शिवलिंगाची स्थापना केली. या प्रवासात ते नरखेड येथे थांबले होते. त्या काळी दंडकारण्याचा भाग असलेल्या या परिसरात घनदाट अरण्य होते. येथे त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. तेच सिद्धेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते.
‘कल्पसमूह संहिता’ या ग्रंथात ‘सिद्धेश्वर देव असे तेथे सिद्धि असे’ असे म्हटलेले आहे. शैव संप्रदायामध्ये, आत्मसाधनेद्वारे जो आध्यात्मिक प्रगती साधून आपल्या जाणीवांवर नियंत्रण ठेवतो, शिवाशी एकरूप होतो आणि ज्याला दिव्य शक्ती प्राप्त होतात, त्याला सिद्ध असे म्हटलेले आहे. संत ज्ञानेश्वरांनी नाथ संप्रदायाला सिद्धपंथ असे म्हटले आहे. नाथपंथात चौऱ्यांशी सिद्ध सांगितले आहेत. सिद्धेश्वर म्हणजे या सर्व सिद्धांचा ईश्वर होय. नरखेड येथील सिद्धेश्वर मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास अनुपलब्ध आहे. मात्र जाणकारांच्या म्हणण्यानुसार, इ.स. १२४७ मध्ये राजगादीवर आलेला यादव राजा कृष्ण ऊर्फ कन्हर याच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले असावे.
सिद्धेश्वराचे येथील मूळ मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील होते. हेमाडपंत ऊर्फ हेमाद्री सोडवीकार हा महादेव यादव व रामदेवराय यादव यांच्या पदरी होता. कृष्णानंतर महादेव व त्यानंतर रामदेवराय हे सत्तेवर आले. त्यामुळे येथील मूळ मंदिराची उभारणी त्यांच्या काळातही झाली असावी, असा कयास आहे. कालांतराने या मंदिराचे जीर्णोद्धार होऊन त्यातून मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
नरखेड गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे. मंदिराभोवती दगडी तटभिंत आहे. या तटभिंतीला लागून बाहेरच्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. तटभिंतीत असलेल्या प्रवेशद्वाराच्या वरील सज्जावर शिवशंकराची बैठी मूर्ती व शेजारी दोन सिंहशिल्पे आहेत. शंकराच्या मूर्तीच्या मागे त्रिशुळ व नगारा आहे. या प्रवेशद्वाराला एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासणाऱ्या लाकडी झडपा आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. तटभिंतीच्या आतील बाजूने ओवऱ्या आहेत. नंदी मंडप, मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. स्वतंत्र नंदीमंडपात चार दगडी स्तंभांमध्ये शिवपिंडी व त्यासमोर अखंड पाषाणातील नंदीमूर्ती आहे. नंदीमंडपाच्या पुढे खुल्या स्वरूपाचा मंडप आहे. या मंडपातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची पितळी मूर्ती व जमिनीवर कासव शिल्प आहे.
अंतराळात असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभ शाखा आहेत. या शाखांना पितळी पत्राने मढविलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूला किर्तीमूख, ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती व उत्तरांगेवर तोरणनक्षी आहे. गर्भगृहात मध्यभागी काळ्या पाषाणातील चौकोनी शिवपिंडी आहे. या पिंडीच्या पुढे भिंतीजवळ असलेल्या चौरंगावर सिद्धेश्वराचा धातूचा मुखवटा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटेची सूर्यकिरणे या पिंडीवर पडतात. मंदिराच्या गर्भगृहावर असलेल्या शिखराच्या शिर्षभागी दोन आमलक व त्यावर कळस आहे.
सिद्धेश्वर मंदिराच्या कळसापेक्षा गावात अधिक उंचीचे बांधकाम करू नये, असा अलिखित नियम आहे. कळसापेक्षा उंच बांधकाम केले, तर ती वास्तू लाभदायक ठरत नाही, असा येथे समज आहे. त्यामुळे गावात दुमजली इमारत आढळत नाही. सिद्धेश्वराचे पावित्र्य जपण्यासाठी गावकरी मंदिर परिसरात मांसाहार करीत नाहीत. तसे केल्यास सिद्धेश्वराचा कोप होतो, असे मानले जाते.
मंदिराचे व्यवस्थापन, देखभाल, दुरुस्ती व धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून गावातील गुरव कुटुंबाकडे आहे. ब्रिटिश सरकारने इनाम कमिशन नियुक्त करून १८६१ मध्ये मंदिराच्या संपूर्ण व्यवस्थापन व खर्चाची जबाबदारी गुरव कुटुंबाकडे दिली होती. तशी सनदही ब्रिटिशांनी गुरव कुटुंबाला बहाल केली होती. ब्रिटिश सरकारच्या काळात सरकारकडून वार्षिक २० रुपये गुरव कुटुंबाकडे देण्यात येते असत. मंदिरात नित्यनेमाने सिद्धेश्वराची पूजा-अर्चना केली जाते.
चैत्र शुद्ध नवमीपासून येथे सिद्धेश्वराची तीन दिवसांची यात्रा असते. यात्रेनिमित्त गेल्या काही वर्षांपासून येथे तीन कोटी हरिनामाचा जप केला जातो. यावेळी आलेल्या भाविकांना ग्रामस्थांकडून महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. यात्रेच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता ग्रामस्थ बैलगाडीतून धान्यकोठीची मिरवणूक काढतात. दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिरातील पुजाऱ्याकडून सिद्धेश्वरास अभिषेक घातला जातो. सायंकाळी पाच वाजता दलित वस्तीमधून श्रींच्या काठीची मिरवणूक सुरू होते. शोभेचे दारूकाम व मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात. तिसऱ्या दिवशी भाविकांसाठी झुणका-भाकरीचा प्रसाद दिला जातो. यावेळी धनगरी ओव्यांचा कार्यक्रम व कुस्त्यांचे मोठे फड भरतात. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात. येथे श्रावणी सोमवारी, तसेच सर्व शिवरात्र व महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते.