सिद्धेश्वर मंदिर

बारामती, ता. बारामती, जि. पुणे


पुणे जिल्ह्यातील बारामती शहराचे ग्रामदैवत असलेले श्री सिद्धेश्वर मंदिर कऱ्हा नदीच्या तीरावर आहे. श्री सिद्धरामेश्वरांना त्यांचे गुरू मल्लिकार्जुन यांनी तुला जेथे शक्य असेल, तेथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून धर्म वाढवावा, अशी आज्ञा केली होती. त्यानुसार श्री सिद्धरामेश्वरांनी येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली, अशी आख्यायिका आहे. इ.स. ११३७ मध्ये राजा रामदेवराव यादव यांनी या मंदिराची उभारणी केली. या मंदिराचे बांधकाम अखंडपणे ४० वर्षे सुरू होते, असे सांगितले जाते.

कऱ्हा नदीच्या उगमापासून म्हणजेच सासवडपासून सोनगावपर्यंत या नदीकिनारी शंकराची १२ मंदिरे आहेत. त्यातीलच एक हे सिद्धेश्वर मंदिर. हे मंदिर दगडी बांधकामाचे आहे. नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह, अशी त्याची रचना आहे. नंदीमंडप १२ फूट लांब आणि १२ फूट रुंदीचा आहे. जोता अडीच फूट उंचीचा आहे. हा नंदी पूर्वी उभा होता; परंतु काही कारणाने तो दुभंगून त्याचे दोन भाग झाले. या दोन शिळांपैकी एकातून हा बसलेला नंदी साकारला गेला. नंदीच्या तोंडावर असणारा पट्टा, गळ्यामध्ये असणाऱ्या साखळ्या, नंदीच्या गळ्यात बांधलेली घंटा हीसुद्धा दगडाची आहे. ही घंटा पाच इंच उंचीची आहे. नंदीच्या शरीराभोवती असणारा पट्टा हा घुंगरांचा आहे. विशेष म्हणजे हे सर्व घुंगर एकाच आकाराचे आहेत. एका बाजूला २५ आणि दुसऱ्या बाजूला २५, असे एकूण ५० घुंगर यात आहेत. सहा फूट उंच असलेल्या या नंदीच्या शेपटाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे शेपूट मागच्या पायामागून पलीकडे आले आहे. नंदीमंडपाच्या बाजूलाच उंच दगडी दीपमाळ आहे.

सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर जय-विजय यांची शिल्पे कोरलेली आहेत. ही दोन्ही शिल्पे एकमेकांचे जणू प्रतिबिंबच भासावे, असे त्यांचे कोरीव काम आहे. सभागृहाच्या मध्यभागी भलामोठा पितळी कासव आहे. येथेच एक चौथरा आहे. पूजा विधी, पोथीवाचनासाठी पूर्वी याचा वापर होत असे. याशिवाय सभामंडपात नृसिंह व महाकाली यांच्या मूर्ती आहेत.

गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरही कोरीव काम आहे. गणपती, नंदी, सिंह यांची शिल्पे या प्रवेशद्वारावर कोरलेली आहेत. येथे महाशिवरात्र आणि प्रत्येक एकादशीला शंकराच्या पिंडीला दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो. ही शिवपिंडी एकाच दगडात कोरलेली आहे आणि पिंडीच्या मागील बाजूस गणपतीची मूर्ती आहे; तर वरील बाजूस कऱ्हामाईची मूर्ती आहे. याच गर्भगृहात एक भुयारही आहे, असे सांगितले जाते.

शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्य काळापासून असलेल्या या मंदिराची व्यवस्था पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे सोपविली होती. तेव्हापासून आजतागायत दाते कुटुंबीयच सिद्धेश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात.

श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे भाविकांची गर्दी होते. पहाटे अभिषेक करून पूजा-आरती होते आणि त्यानंतर भाविकांना दर्शन घेता येते. महाशिवरात्रीला येथे मोठा सप्ताह भरवला जातो. सप्ताहामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम होतात. मंदिराच्या चोहोबाजूंनी उंच दगडी तटबंदी आहे. भाविकांना सकाळी ६.३० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत देवदर्शन करता येते.

उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून १०३ किमी अंतरावर
  • पुणे आणि राज्यातील अनेक भागांतूनएसटी बसची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येण्याची व्यवस्था
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
Back To Home