
पु्णे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरूनगर येथे भीमा नदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील हे हेमाडपंथी रचनेचे मंदिर परिसरातील शिवभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. स्कंद पुराणातील भीमा माहात्म्यामध्ये या मंदिराचे वर्णन आहे आणि त्यात या गावाचा ‘खेटक’ असा नामोल्लेख आहे. भीमा माहात्म्य दहाव्या-अकाराव्या शतकात लिहिले गेले. हे मंदिर त्याच्या आधीपासून अस्तित्वात असल्याचे त्यावरून स्पष्ट होते. सध्याचे मंदिर काशीकर मधवे यांचे पूर्वज त्रिंबक शेठ यांनी ४ मार्च १७८५ रोजी बांधून पूर्ण केले. तसेच भागीरथी कुंड १२ ऑक्टोबर १७३५ रोजी बांधून पूर्ण झाल्याची नोंद आहे. येथे पेशव्यांचे प्रधान नाना फडणवीस यांनी दोन धर्मशाळा बांधल्याचाही उल्लेख सापडतो.
मंदिरापासून काही अंतरावर वायव्येला सिद्धेश्वराच्या पादुकांचे स्थान आहे. याविषयी अख्यायिका अशी की, त्रिंबक मधवे यांची आराधना झाल्यानंतर स्वत: सिद्धेश्वर महाराज रात्री त्यांना सोडण्यासाठी येथपर्यंत येत असत. पुढे गावाची हद्द असल्याने ते तेथे लुप्त होत किंवा माघारी फिरत, अशी अख्यायिका सांगितली जाते.
नवसाला पावणारा देव म्हणून या स्थानाची महती आहे. सिद्धेश्वरासमोर भाविक मनोभावे त्याची मनोकामना जेवढ्या दिवसांत पूर्ण करण्याचे साकडे घालतो, तेवढ्या दिवसांत ती पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार, पूर्वी या मंदिरात कैलास महादेव मधवे हे नियमित पहाटे येऊन पूजा करीत असत. त्यावेळी त्यांना घरी सोडण्यासाठी स्वतः सिद्धेश्वर जात होते. एका व्यक्तीच्या मनात त्याविषयी शंका निर्माण झाली. त्यामुळे त्या व्यक्तीने मधवे यांच्यावर पाळत ठेवली. पण, सिद्धेश्वराला हे आवडले नाही. त्यामुळे संशय घेणाऱ्या त्या व्यक्तीची शिळा झाली. ही शिळा आता मंदिरात नंदी महाराजांच्या बाजूला आहे.
मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर उजवीकडे रेखीव बांधकाम असलेले एक कुंड आहे. त्याची स्थापत्यकला आवर्जून पाहावी अशी आहे. या कुंडाला भागीरथी कुंड असे म्हणतात. येथे बारमाही पाणी असते. त्याचा वापर मंदिरातील अभिषेक आणि इतर धार्मिक कामांसाठी केला जातो. मंदिराच्या आवारात चार आकर्षक दीपमाळा आहेत. उत्सवकाळात असंख्य दीपांमुळे त्या उजळून निघतात.
गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी सुरेख नंदीमंडप आहे. त्यापूर्वी एका मंडपात निळकंठ शंकराची ध्यानस्थ मूर्ती आहे. सभामंडपात चार भव्य खांबांवर कोरीव काम आहे. हा स्थापत्यकलेचा अनोखा नमुना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल जय व विजय आणि वर चौकटीवर गणेशाची प्रतिमा कोरली आहे. गर्भगृहात सिद्धेश्वराचे स्वयंभू लिंग आहे आणि तेथे एका बाजूला पार्वती प्रतिष्ठापित आहे.
मंदिराच्या आवारात डाव्या बाजूला पाताळेश्वराचे आणखी एक छोटे शिवालय आहे; तर उजव्या बाजूला गणेश वृक्ष मंदिर, मारुती मंदिर, दत्त मंदिर व श्री कार्तिकस्वामींचे मंदिर आहे. उंच उंच झाडे आणि प्रशस्त प्रांगणात काळ्या दगडातील या वास्तूमुळे या संपूर्ण परिसराला वेगळीच भव्यता आली आहे.
श्रावण महिन्यात दररोज हजारो शिवभक्त दर्शनासाठी मंदिरात येतात. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. यावेळी सिद्धेश्वराची पालखी काढण्यात येते. येथील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी सिद्धेश्वर मंदिरासह बाजूचे कार्तिकस्वामींचे मंदिर दिव्यांनी उजळून निघते. वर्षातून एकदाच म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला महिलांना कार्तिकस्वामींचे दर्शन घेता येते. त्यामुळे महिलांची या सोहळ्यात विशेष उपस्थिती असते. कार्तिकस्वामींचे वाहन मोर आहे आणि येथे मोरपीस वाहण्याची प्रथा आहे. देवाला वाहिलेले मोरपीस घरी नेल्यानंतर त्याची विधिवत पूजा करून, ते जपून ठेवण्यात येते.