सिद्धेश्वर महाराज मठ

बेळंकी, ता. मिरज, जि. सांगली

आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पीठांप्रमाणेच भारतात वीरशैवांचीही पाच पीठे आहेत. त्यांना पंचाचार्य पीठ असे म्हटले जाते. रेवणाराध्य (रंभापुरी पीठ), मरूळाराध्य (उज्जयिनी पीठ), एकोरामाराध्य (केदारपीठ), पंडिताराध्य (श्रीशैलपीठ) आणि विश्वाराध्य (काशीपीठ) हे त्यांचे पंचाचार्य होत. हे पाच आचार्य वीरशैव धर्माचे गोत्रपुरूष मानले जातात. ते क्रमशः वीर, नंदी, भृंगी, वृषभ आणि स्कंद यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. पंचाचार्य पीठांपैकी रंभापुरी येथील पीठास वीरसिंहासनपीठ असे म्हटले जाते. त्याचेच एक स्थान म्हणजे बेळंकी येथील सिद्धेश्वरमहाराज मठ होय.

सिद्धेश्वरमहाराज (दोडमुरगेश्वर महास्वामी) हे बेळंकी गावाचे ग्रामदैवत मानले जाते. त्याच बरोबर ते लिंगायत समाजाच्या आणि खासकरून हिरेमठ आडनावाच्या लोकांचे गुरूस्थान आहे. या स्थानाबद्दल आख्यायिका अशी की बेळंकी जवळ कुकटोळीनजीक जुना पन्हाळा म्हणजेच गिरलिंग डोंगर आहे. नाथ संप्रदायाचे केंद्र असलेल्या या डोंगरावर पराशर ऋषींचे समाधीस्थानही आहे. या डोंगराच्या मागील डोंगरावर गौसिद्धा हे लिंगायत समाजाचे प्राचीन स्थान आहे. येथील एका गुहेमध्ये एक सिद्धपुरूष राहात असत. त्यांना सिद्धेश्वरमहाराज म्हणत. बेळंकी या गावातील एक वाणी त्यांचा परमभक्त होता. तो नेहमी त्या सिद्धपुरूषाच्या दर्शनासाठी डोंगरावर जात असे. पुढे वार्धक्यामुळे त्याला डोंगर चढून जाणे कठीण झाले. तेव्हा त्याने सिद्धेश्वर महाराजांनातुम्ही माझ्या गावी चलाअशी विनंती केली.

बेळंकीमधील त्या वाण्याच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या सिद्धेश्वरांनी त्याची विनंती मान्य केली ते येथील निसर्गरम्य अशा स्थानी येऊन निवास करू लागले. याच ठिकाणी आज सिद्धेश्वरमहाराजांचा मठ स्थित आहे. या मठाचे अधिकारी म्हणून १९९३ साली शिवलिंगय्या हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली. २३ ते २८ जानेवारी या कालावधीत त्यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा येथे साजरा करण्यात आला होता. या सोहळ्यास जगद्‌गुरू बाळेहोन्नूर (रंभापुरीपीठ) जगद्‌गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य (काशीपीठ) यांच्यासह अनेक लिंगायत धर्मपंडित असंख्य भाविक उपस्थित होते.

गावापासून काहीसे दूर, एका ओढ्याकाठी असलेले हे निसर्गरम्य स्थान आहे. मठाभोवती १० ते १२ फूट उंचीची दगडी तटबंदी आहे. या तटबंदीत मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार आहे. कमानीकृती असलेल्या या प्रवेशद्वाराच्या वरील बाजुस नगारखाना आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजुस असलेल्या एका चौथऱ्यावर दीपस्तंभ आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. फरसबंदी केलेल्या प्रांगणाच्या सर्व बाजुंनी तटबंदीला ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांमध्ये पुजाऱ्यांची निवासस्थाने तसेच मठाचे कार्यालय आहे.

जमिनीपासून तीन फूट उंच असलेल्या या मठाचे सभामंडप, अंतराळ गर्भगृह असे स्वरुप आहे. प्रवेशद्वाराजवळील चार स्तंभ महिरपी कमानींनी एकमेकाशी जोडलेले आहेत. येथून सभामंडपात प्रवेश होतो. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपाच्या भोवतीने पाषाणी गोलाकार स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. हा सभामंडप नंतरच्या काळात बांधलेला आहे. अंतराळात एका मध्यम आकाराच्या चौथऱ्यावर नंदीची पितळी मूर्ती आहे. येथून पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. या गर्भगृहात वज्रपिठावर शिवपिंडी आहे. या शिवपिंडीच्या मागील बाजुस असलेल्या सुवर्णरंगी प्रभावळीवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे.

गर्भगृहाच्या शिखराच्या चारही बाजुने घुमटाकृती आकाराचे दोन आमलक आहेत. गोलाकार असलेल्या मुख्य शिखरावरील तिन थरांमध्ये देवकोष्टके आहेत. या देवकोष्टकांमध्ये ऋषिमुनी, देवदेवतांच्या मूर्ती त्यावर कळस आहेत. शिर्षभागी एकावर एक असे तीन आमलक त्यावर कळस आहे. मुख्य मंदिराशिवाय या मंदिर प्रांगणात सात लहान मोठ्या समाध्या आहेत. त्या येथील महंतांच्या असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. मंदिर परिसर स्वच्छ, प्रसन्न शांत आहे.

पुत्रपरंपरेने हा मठ चालवला जातो. या मठास तत्कालिन संस्थानिकांनी जमीनदारांनी बरीच जमीन इनाम म्हणून दिलेली आहे. त्यातून या मठाची व्यवस्था चालते. येथे श्रावणी अमावास्येला मोठा भंडारा होतो. त्यावेळी मठातील स्वामींच्या दर्शनासाठी तसेच प्रसाद ग्रहणासाठी आजूबाजूच्या अनेक गावातून हजारो लोक येथे येतात.

उपयुक्त माहिती

  • मिरजपासून २५ किमी, तर सांगलीपासून ३४ किमी अंतरावर
  • मिरज सांगली येथून बेळंकीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मठापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home