काटेपूर्णा (महान) धरणानजीक वसलेल्या कोथळी (बु।।) येथील शिवालयातील सिद्धेश्वर महादेव हे विदर्भातील अनेक कुटुंबांचे आराध्यदैवत आहे. काळ्या दगडांचा वापर करून उभारण्यात आलेले हे मंदिर अकोला जिल्ह्यातील पुरातन मंदिरांपैकी एक आहे. स्थानिक स्थानमाहात्म्य कथेनुसार, ११व्या शतकात या मंदिराची उभारणी झाली. असे सांगण्यात येते की पातूरचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या सिदाजी महाराजांचे या मंदिरात काही काळ वास्तव्य होते. विदर्भातील हजारो भाविकांबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक येथील भाविकही येथे दर्शनासाठी येतात. येथील सिद्धेश्वरास रोडग्याचा नैवद्य दाखवण्याची प्रथा आहे.
इसवी सनाच्या दहाव्या आणि अकराव्या शतकात या भागावर चालुक्यांचे राज्य होते. इ.स. १०४९मध्ये चालुक्य नृपती आहवमल्ल सोमेश्वर (पहिला) हा गादीवर आला. शिव, विष्णू, कोल्हापूरची महालक्ष्मी, तसेच कार्तिकेय ही चालुक्यांची प्रमुख उपास्य दैवते होती. त्यांच्या काळात अनेक मंदिरांची उभारणी झाली. कोथळीतील सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या स्थानमाहात्म्य कथेनुसार, या मंदिराची उभारणी इ.स. १०६० मध्ये म्हणजेच आहवमल्ल सोमेश्वर (पहिला) याच्या कारकिर्दीत करण्यात आली आहे.
याबाबत आख्यायिका अशी की या भागात एक शिवभक्त सरदार होता. मुलुख जिंकल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी तो शिवमंदिर उभारत असे. त्यानेच अकोला, अमरावती, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये अनेक शिवमंदिरे उभारली. कोथळी बुद्रुक येथील सिद्धेश्वराचे मंदिर त्याने १०६० मध्ये उभारले.
कोथळी (बुद्रुक) गावाच्या वेशीवर, काटेपूर्णा धरणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मंदिराभोवती आवारभिंतीत असलेल्या प्रवेशकमानीतून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मध्यभागी सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरासमोर मोठ्या चौथऱ्यावर दोन दीपस्तंभ व त्याशेजारी प्राचीन वटवृक्ष आहे. या दीपस्तंभांच्या मधोमध मोठा त्रिशूळ आहे. या मंदिराच्या दर्शनी भागाच्या रचनेवर मुघलकालीन वास्तुशैलीचा प्रभाव दिसतो. ती काहीशी मशिदीसारखी आहे. उंच जोत्यावर उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या गर्भगृहावर घुमटाकार शिखर आहे. मात्र, आकाराने लहान असलेले हे शिखर लांबून दिसत नाही. काळ्या दगडाचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले आहे. कमानीच्या आकाराच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत. या कठड्यांवर लहान आकाराचे अनेक खड्डे दिसतात. सभामंडपाच्या प्रवेशद्वारानजीकच्या पायऱ्यांवरही असे खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये पूर्वी चांदीची नाणी रोवली जात असत. देवासमोर संपत्तीचे महत्त्व नाही, श्रीमंतीचा थाट बाहेरच ठेवून या मंदिरात प्रवेश करावा, या भावनेतून ही नाणी येथे रोवली जात असत. मंदिराच्या सभामंडपात सोळा स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ महिरपी कमानीच्या आकाराने एकमेकांशी जोडलेले आहेत. मध्यभागी असलेल्या चार स्तंभांच्या मध्ये नंदीचे स्थान आहे. सभामंडपातील देवकोष्टकांमध्ये श्रीदत्त, हनुमान, भगवान मुंगसाजी महाराज यांच्यासह इतर देव-देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपातून मंदिराच्या वरच्या भागात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. दोन पायऱ्यांदरम्यान सुमारे दीड फूटांचे अंतर आहे. गर्भगृहात सिद्धेश्वर महादेवाची पिंडी आहे. या पिंडीच्या भोवताली कलाकुसर केलेला धातुचा पत्रा लावलेला आहे. उत्सवांप्रसंगी या पिंडीवर मुखवटा बसवण्यात येतो.
सिद्धेश्वर महादेव हे विदर्भातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. त्यामुळे या मंदिरात दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येतात. येथे येणारे अनेक भाविक मंदिर परिसरात रोडग्याचा नैवद्य बनवतात. रोडगा हा विदर्भातील एक खास खाद्यपदार्थ आहे. रवा आणि गव्हाच्या पिठाच्या कणकेचे जाड थर एकावर एक ठेवून त्याची गोल जाड रोटी गोवऱ्यांवर भाजून तो तयार केला जातो. मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांना या नेवैद्याचे वाटप करण्यात येते.
महाशिवरात्रीच्या दिवशी येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रात्रभर मंदिरात पारायणही करण्यात येते. गुढीपाडव्यापासून बाराव्या दिवशी येथे मोठी यात्रा असते. यावेळी गावातून महादेवाची मिरवणूक काढण्यात येते. येथे हनुमान जयंतीही उत्साहात साजरी केली जाते. श्रावण महिन्यात येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. या महिन्यातील अखेरच्या सोमवारी या मंदिरात कावड यात्रा येते.