कारंजा लाड म्हणजेच प्राचीन करंजनगरी. पौराणिक आख्यायिकेनुसार करंज ऋषींची तपोभूमी असलेल्या या शहराला दत्तात्रेयाचे दुसरे अवतार मानले जाणारे नृसिंह सरस्वती यांची जन्मभूमी मानले जाते. या क्षेत्रास ‘शेषांकित क्षेत्र’ असेही म्हणतात. ऐतिहासिक काळात हे एक अत्यंत श्रीमंत व्यापारकेंद्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तसेच नागपूरकर भोसले यांच्या इतिहासाशीही हे शहर निगडित आहे. अनेक प्राचीन तीर्थे व मंदिरांची भूमी असलेल्या या शहरातील हटोटीपुरा भागात सिद्धेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर उभे आहे. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
‘श्री करंजे माहात्म्य’मध्ये या क्षेत्राची महती वर्णन केलेली आहे. त्यानुसार,
येथे वसिष्ठ ऋषींचे शिष्य करंज ऋषी यांचा आश्रम होता. करंज ऋषींनी येथील ऋषीतलावाच्या ठिकाणी सर्व तीर्थांना व नद्यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या नावावरून या क्षेत्रास ‘करंजनगरी’ असे नाव प्राप्त झाले, अशी आख्यायिका आहे. गरूडाच्या भीतीने शेषाने आपल्या कुळासह येथे आश्रय घेतला होता, त्यामुळे करंजक्षेत्रास ‘शेषांकित क्षेत्र’ असे नाव पडले. ‘वाशिम गॅझेटियर’मधील माहितीनुसार, निजामशहाने आपली कन्या ‘बिब’ हिच्या लग्नात कारंजा गाव आंदण म्हणून दिले होते. त्यामुळे या गावास ‘बिबचे कारंजे’ असे म्हणत. येथे लाड आडनावाच्या कुटुंबांची संख्या अधिक असल्याने पुढे ते ‘लाडाचे कारंजे’ वा ‘कारंजा लाड’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
कारंजा हे गाव मुघल काळात अत्यंत ऐश्वर्यसंपन्न होते. औरंगजेबाच्या ताब्यातील इलाख्यात असलेल्या या गावात इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन दिवस मुक्काम केला होता, असा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर १६७० मध्ये औरंगजेब बादशहाच्या ‘दाढीचा बाल’ समजले जाणारे सुरत शहर लुटले. त्यानंतर दोनच महिन्यांत त्यांच्या फौजेने बुऱ्हाणपूर आणि बागलाणात धडक मारली. तेथून छत्रपती शिवाजी महाराज कारंज्याला आले.
‘सभासद बखरी’त या स्वारीबद्दल असे नमूद आहे की ‘त्याउपरी कारंजे मोगलाईत मोठें शहर होतें. तेथून पालती आणून खासा राजियांनीं लष्कर बराबर घेऊन चालिलें. जातां जातां औरंगाबादेची पेठ मारिली. सात गांवची दौड करून जाऊन कारंजियावरि तीन दिवस मुकाम करून, शहराचे वाडे काबीज करून, मत्ता (संपत्ती) खणती लावून काढली. नक्त जडजवाहीर, सोनेंरूपें, उंच कापड असें घेऊन स्वारी करून चालिलें.’ इंग्रजांच्या ‘फॅक्टरी रेकॉर्ड’मध्येही याचा उल्लेख आहे. त्यातील १९ डिसेंबर १६७० च्या पत्रात असे म्हटले आहे की ‘कारंजा हे सधन गाव शिवाजी महाराजांनी लुटले व तेथील सर्व श्रीमंत लोकांना धरून नेले. एक बराच मोठा इसम मात्र स्त्रीवेश करून पळून गेला.’ या हकीकतीवरून कारंजा शहराच्या संपन्नतेची साक्ष मिळते.
अशा या ऐतिहासिक शहरामध्ये महादेवाची पाच प्राचीन मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर होय. या मंदिराचा निश्चित स्थापनाकाल व त्यामागील इतिहास उपलब्ध नाही, मात्र या मंदिराचे स्थान हजार वर्षे जुने असल्याचा दावा केला जातो. या मंदिराचे भव्य महाद्वार, नगारखाना आणि परकोट (तटबंदीसारखी आवारभिंत) यांचे बांधकाम नागपूरकर भोसले राजांनी केल्याचे सांगण्यात येते.
मंदिराला दगड आणि विटांचा वापर करून बांधलेले भव्य महाद्वार आहे. त्यावर तीन खिडक्या असलेला नगारखाना आहे. या महाद्वाराच्या दोन्ही बाजूंना उतरत्या पायऱ्यांच्या आकाराची भिंत आहे. मंदिरास चारही बाजूंनी परकोट आहे. काही दगडी पायऱ्या चढून महाद्वारात प्रवेश होतो. येथून आत जाताच समोरच मोठा नंदीमंडप आहे, जेथे नंदीची दगडी मूर्ती आहे. समोरच मंदिराची भव्य इमारत उभी आहे. हे मंदिर जमिनीपासून चार ते पाच फूट उंच जोत्यावर बांधलेले आहे. त्याचा खालचा भाग दगडी आहे, तर वरील भागाचे बांधकाम विटांमध्ये करण्यात आले आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपास उंच दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास मोठी कमान आहे, जीच्या दोन्ही बाजूंना पिसारा फुलवलेल्या मोरांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. चार मोठे अष्टकोनी स्तंभ, त्यांत कमानी आणि या स्तंभांनी मध्यभागी निर्माण झालेला छोटा चौक, बाजूच्या भिंतींत प्रवेशद्वारे असे या सभामंडपाचे स्वरूप आहे. येथे एका स्तंभानजीक संगमरवरी चौथऱ्यावरील देवळीत वेदमूर्ती सद्गुरू रामचंद्र महाराज उंडणगावकर यांची मूर्ती विराजमान आहे.
ते मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील होते. त्यांना सिद्धेश्वराचा दृष्टांत झाला होता, असे सांगितले जाते.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार दगडी आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. उंबरठ्यावर कीर्तिमुख आहे. चौकटीच्या बाजूच्या मोठ्या दगडी स्तंभांच्या वरच्या भागात नक्षीकाम केलेले आहे. उतरांग भागात मोठे कोरीव देवकोष्ठक आहे, ज्यामध्ये भैरवनाथाची उभी मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृह आकाराने मोठे आहे. त्यात मध्यभागी साधारणतः एक फूट खोल चौकोनी भागात काळ्या पाषाणातील मोठे शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या बाजूला या चौकोनी भागाच्या कठड्यावर पाषाणात घडविलेल्या काही देवतांच्या मूर्ती, तसेच नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात असलेल्या एका देवळीत गणरायाची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या भिंतीच्या चारही कोपऱ्यांतील कोरीव अर्धस्तंभ, भिंतीवरच्या कमानदार रचना आणि छताच्या घुमटाकार भागावर केलेले नक्षीकाम यांतून या मंदिराचे प्राचीनत्व स्पष्ट होते.
मंदिराच्या बाह्यभिंतींची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. उंच स्तंभांची शेजारी-शेजारी उभी रचना करून या भिंती उभारण्यात आल्या आहेत. कलात्मक स्तंभांतील कलशाकार, त्यांतील कोरीव देवकोष्ठके यांनी गर्भगृहाच्या बाह्यभिंतींचा वरचा भाग सजलेला आहे. या देवकोष्ठकांत विष्णू, हनुमान, नारदमुनी आदींच्या मूर्ती आहेत. रावण हा शंकराचा महान भक्त मानला जातो, म्हणून त्यास गर्भगृहाच्या मागील बाह्यभिंतीतील देवकोष्ठकात स्थान दिलेले आहे. येथे रावणाचे दशमुखी शिल्प आहे. गर्भगृहाच्या या बाह्यभिंतींच्या वर चारही कोपऱ्यांत नंदी शिल्पे बसवलेली आहेत. येथून मंदिराच्या शिखराचा भाग सुरू होतो. हे शिखरही स्तंभांची कलात्मक रचना करून उभारलेले आहे. त्यातील देवकोष्ठकांत गणेश, हनुमान आणि काळभैरवाची मूर्ती आहे. वरच्या भागात चारही बाजूंनी नागशिल्पे आणि मयूरशिल्पे कोरलेली आहेत. शीर्षस्थानी मध्यभागी मोठा कळस आणि त्याच्या चारही बाजूंना चार छोटे कळस, अशा प्रकारे येथे एकूण पाच कळस आहेत.
या मंदिरातील भिंतींमध्ये ठिकठिकाणी लहान-मोठ्या आकाराचे कोनाडे आहेत. बाहेरील बाजूला ८४, नगारखान्यातील भिंतींत १८, सभामंडपात २७, तर गर्भगृहात आठ अशी या कोनाड्यांची संख्या आहे. शिवरात्रीला आणि देवदिवाळीत दीपोत्सवाच्या वेळी या कोनाड्यांत लावलेल्या असंख्य दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघतो. या प्राचीन मंदिरात दर सोमवारी, तसेच खास करून शिवरात्रीच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी असते.