
आद्यपूजेचा मान असलेल्या गणेशाच्या पूजनाची परंपरा प्राचीन आहे. अनार्य परंपरेतील गजराज व आर्य परंपरेतील यक्ष यांच्या एकत्रित रूपातून गणेशाचे स्वरूप साकारले गेले, असेही एक मत प्रचलित आहे. अनेक ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननात प्राचीन गणेशमूर्ती सापडल्या आहेत. गणेशमूर्ती कितीही जीर्ण झालेली किंवा झिजलेली असली तरी विशिष्ट आकार अथवा सोंडेवरून ती सहज ओळखू येते. अशाच प्रकारे उत्खननात सापडलेल्या सिद्धेश्वर गणेशाचे प्राचीन मंदिर धुळे शहरात पांझरा नदीकाठी वसलेले आहे. हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
रिद्धी–सिद्धीचा नायक असलेल्या या सिद्धेश्वर गणपती मंदिराबाबत आख्यायिका अशी की सुमारे दोनशे वर्षांपूर्वी मन्नालाल बलदेव शर्मा नामक एक गणेश भक्त धुळे शहरात पांझरा नदीच्या तीरावरील एका शांत जागी बसून नित्य नेमाने तल्लीन होऊन गणेशाची भक्ती करीत असे. एक क्षणही तो गणेशाचे नामस्मरण केल्याशिवाय राहत नसे. त्याच्या या भक्तीवर प्रसन्न
होऊन गणेशाने एका रात्री त्यास स्वप्नदृष्टान्त दिला. आपण एके ठिकाणी जमिनीखाली आहोत असे गणेशाने त्यास स्वप्नात सांगितले. त्या दृष्टांतानुसार स्वप्नात दिसलेल्या जागी त्याने खोदकाम केले. त्या वेळी तेथे सुमारे वीस फुटांवर गणेशाची पाषाण मूर्ती आढळून आली. पुढे याच ठिकाणी गणेशाचे मंदिर बांधण्यात आले.
रांगमंडप, मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. रांगमंडपास उजव्या व डाव्या बाह्य बाजूस बाशिंगी कठडा आहे. रांगमंडपापेक्षा उंचावर असलेल्या मुखमंडपात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. सुमारे पंधरा फूट लांबीच्या पायऱ्यांच्या मध्यभागी व दोन्ही बाजूंस स्टेनलेस स्टीलच्या नळ्या लावून दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुखमंडापातून सभामंडपात जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. मधल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ व त्यावरील हस्तांवर सज्जा आहे. सज्जावर दोन आमलक व त्यावर कळस असलेल्या पंचदल शिखराची प्रतिकृती आहे. शिखरात मध्यभागी ओम् चिन्ह आहे. दोन्ही बाजूस असलेल्या
उपद्वारांच्या वरील सज्जावर त्रिदलीय शिखर आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडील बाह्य भिंतीस उजव्या व डाव्या बाजूला दोन चौकोनी स्तंभ व त्यावर नक्षीदार हस्त आहेत.
सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे व त्यात प्रकाश व हवा येण्यासाठी भिंतींमध्ये खिडक्या आहेत. येथील गर्भगृह सभामंडपापेक्षा उंचावर आहे. गर्भगृहाच्या लाकडी द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी दोन खिडक्या आहेत. गर्भगृहात मध्यभागी वज्रपिठावर महिरपी कमानीने एकमेकांना जोडलेल्या चार चौकोनी स्तंभावर छत असलेल्या मखरात गणेशाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे भविकांवर कृपाकटाक्ष टाकत असल्याचा भास होतो. गणेशाने डोक्यावर चांदीचा मुकुट धारण केलेला आहे. मूर्तीची सोंड आणि दात चांदीचे आहेत. मूर्तीच्या डोक्यावर चांदीचे छत्र आहे.
मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे. सभामंडपाच्या छतावर दोन घुमटाकार शिखरे, त्यावर उभ्या धारेची व कमळ फुलांची नक्षी आहे. शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर उंच शिखर, त्यावर आमलक व कळस आहे. मुख्य शिखराच्या चारही बाजूंनी बारा लहान शिखरे, त्यावर आमलक व कळस आहेत.
माघ शुद्ध चतुर्थी हा गणेश जयंतीचा सोहळा व भाद्रपद मासातील दहा दिवसांचा गणेशोत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी गणेशयाग, अथर्वशीर्ष, महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले जाते. दर महिन्यास संकष्टी व विनायकी चतुर्थी तसेच मंगळवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वर्दळ असते. शहरातील अनेक भाविक रोज या गणेशाच्या दर्शनाने आपल्या दिवसाची सुरूवात करतात.