तीन नद्या, दोन राज्ये आणि तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले वारी हनुमान मंदिर हे विदर्भातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. एका आख्यायिकेनुसार, सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना समर्थ रामदास स्वामींनी केली. ही मूर्ती त्यांनी स्थापन केलेल्या हनुमान मूर्तींपैकी सर्वात मोठी असल्याचे सांगण्यात येते. वाण नदीच्या तीरावर, निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या येथील हनुमानावर लाखो भाविकांची गाढ श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या भाविकांबरोबरच मध्य प्रदेशसारख्या शेजारी राज्यांतील असंख्य भाविकही येथील अंजनीसुतासमोर नतमस्तक होतात.
समर्थ रामदास स्वामी हे हनुमानाचे अवतार मानले जातात. बुद्धी आणि बळाची देवता असलेल्या रुद्रावतार हनुमानाची उपासना त्यांनी महाराष्ट्रात प्रचलित केली. त्यांनी स्वतः स्थापन केलेली ११ मारूती मंदिरे प्रसिद्ध आहेत. याशिवाय, टाकळी, वाई, महाबळेश्वर, प्रतापगड आणि उर्वशी नदीकाठी डोळेगाव येथेही मारूतीची स्थापना केल्याचे इतिहासकार सदाशिव खंडो आळतेकर यांनी ‘श्रीसमर्थ-चरित्रा’त (१९३३) म्हटले आहे. समर्थांनी सज्जनगड, सिंहगड, शिवथरघळ, मिरज, टेंभू, शिरगाव, तंजावर आणि हिमालयातील प्रसिद्ध बद्रिनाथ येथेही मारुतीची स्थापना केली, अशी लोकधारणा आहे.
समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांच्या ‘श्रीसमर्थावतार’ या ग्रंथानुसार, समर्थ जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब या त्यांच्या जन्मगावी १६४० मध्ये आले. तेथे मातेची भेट घेतल्यानंतर ते दक्षिणेस तीर्थाटनास गेले व तेथून १६४४ मध्ये ते कृष्णातिरी आले. पुढे १२ वर्षे ते सातारा, कोल्हापूर या भागात होते. याच काळात त्यांनी या प्रदेशात ११ मारूतींची स्थापना केली. तसेच १६४९ मध्ये त्यांनी दासबोधाच्या रचनेस प्रारंभ केला. १६४४ मध्ये समर्थांनी वारी येथील या मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली व त्यावेळी येथे विष्णूयज्ञ केला, अशी लोकधारणा आहे. १९१०च्या ‘अकोला गॅझेटियर’मधील वारी गावच्या नोंदीत येथील ‘हनुमान वा मारूतीची सहा फुटांहून अधिक उंचीची व लक्षणीय चेहरा असलेली मूर्ती ४०० वर्षांपूर्वी रामदास स्वामी यांनी स्थापन केली असे बोलले जाते’, असे नोंदलेले आहे. या नोंदीनुसार इ.स. १९००च्या सुमारास ‘हनुमंदासबुवा’ नावाच्या बैराग्याने येथे मोठे मंदिर बांधून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
१९०६-०७मध्ये या बैराग्याचे निधन झाले. कालौघात या मंदिराचे अनेक जीर्णोद्धार झाले. अलिकडेच झालेल्या जीर्णोद्धारादरम्यान मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
तेल्हारा तालुक्यातील भैरवगड किल्ल्यानजीक हे प्रसिद्ध देवस्थान आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या तसेच अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर हे मंदिर आहे. वान नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत येथे येते. मेळघाटमधून उगम पावणाऱ्या या नदीवरील वान धरणही (हनुमान सागर) याच जिल्ह्यात असून ते मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आहे. हे मंदिर असलेले वारी हे गाव अकोला जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे, तर मंदिरामागील परिसर बुलडाणा जिल्ह्यात येतो.
गावातील मंदिराच्या कमानीपासून या मंदिरात येण्यासाठी सुमारे १०० पायऱ्या उतराव्या लागतात. पायऱ्या संपल्यानंतर हनुमान सागर धरणातून येणाऱ्या पाण्यामूळे येथे पुल बांधलेला आहे. या मंदिराकडे येताना नदीच्या वरच्या बाजूला खडकांमध्ये गरम पाण्याचे एक कुंड आहे. येथील गोमुखातून वर्षभर गरम पाणी बाहेर पडते. हे पाणी पिण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठीही वापरले जाते. या गोमुखाजवळ पूर्वी एक शिलालेख होता. मात्र, येथे झालेल्या सिमेंटच्या बांधकामामुळे तो अस्पष्ट झाला आहे.
मंदिराच्या संकुलाच्या सुरुवातीलाच जटाशंकर महादेवाचे छोटे शिवमंदिर लागते. येथील शिवलिंगावर गोमुखातून अभिषेक होत असतो. येथून काही पायऱ्या चढून वारी हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोचतो. प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. आटोपशीर सभामंडपात मध्यभागी प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. येथील गर्भगृहात हनुमानाची १५ फूट उंचीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. सुवर्णमुकुट परिधान केलेल्या या उभ्या मूर्तीच्या डावीकडे गदा आहे. या मूर्तीच्या डाव्या बाजूला गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गर्भगृहाच्या उजवीकडील देवळीत समर्थ रामदास स्वामींची मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या गर्भगृहावर आकाराने लहान होणारे तीन चौकोनी स्तरांचे शिखर आहे.
या शिखराच्या अग्रभागी द्विस्तरीय आमलक व कळस आहेत. मंदिराच्या परिसरात राममंदिर, शिवमंदिरासह काही लहान मंदिरे आहेत. येथील समर्थ धाममध्ये भाविकांच्या निवासाची सोय होते. येथे भाविकांसाठी २४ खोल्या आहेत. नजीकच अन्नपूर्णा मंडप आहे. दररोज पहाटे ५ वाजल्यापासून सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.
मंदिरापासून नजीकच असलेल्या हनुमान सागर धरणाच्या खालील बाजूस, नदीपात्रात एक खोल डोह आहे. मामा-भाच्याचा डोह म्हणून प्रसिद्ध असलेल्या या डोहात मामा व भाच्याने एकत्र स्नान करू नये, असे मानले जाते. या डोहात अनेक कपारी आहेत. हा डोह पोहण्यासाठी धोकादायक समजला जातो. या डोहानजीक आसरा मातेचे स्थान आहे.
या मंदिरात नित्यनेमाने पूजा-अर्चा करण्यात येते. शेकडो भाविक येथील हनुमानाला नवस बोलतात. तो पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविक येथे भंडाराही घालतात. याशिवाय नवसपूर्तीनिमित्त नारळांचे तोरण देवाला अर्पण केले जाते. देवाला अर्पण केलेली अशी शेकडो नारळांची तोरणे गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गावर मागील बाजूस लावलेली पाहायला मिळतात. शनिवारी व रविवारी येथे भाविकांची जास्त गर्दी असते. या मंदिरात मकरसंक्रांती, रामनवमी, हनुमान जयंतीसह विविध सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.