सिद्धनाथ हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. भारतात अनेक ठिकाणी सिद्धनाथास काळभैरव म्हणून पूजले जाते. बलवडी गावात सिद्धनाथाचे ऐतिहासिक मंदिर आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीच्या या मंदिराचे बांधकाम सुमारे दोनशे वर्षांपूर्वी करण्यात आल्याची नोंद आहे. सिद्धनाथ हे काळभैरवाच्या रूपात बलवडी गावचे आणि लगतच्या प्रदेशाचे संरक्षक दैवत मानले जाते. या भागातील अनेक घराण्यांचे सिद्धनाथ हे कुलदैवतही आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की सिद्धनाथ ही नवसाला पावणारी देवता आहे. यामुळे येथे विशेषतः दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते.
‘सिद्धांतबोध’ या ग्रंथामध्ये सिद्धनाथाची आख्यायिका वर्णन केलेली आहे. हा ग्रंथ नगर जिल्ह्यातील पेडगाव येथे जन्मलेले मुस्लिम संतकवी शहामुनी यांनी लिहिला आहे. पेशवाईच्या काळात इ.स. १७७८ मध्ये या ग्रंथाची रचना करण्यात आली. या ग्रंथाप्रमाणेच ‘शिवलीलामृता’चे कर्ते थोर ग्रंथकार श्रीधरस्वामी नाझरेकर यांनीही सिद्धनाथाची कथा मांडली आहे. त्यानुसार, प्राचीन काळी काळासुर नावाच्या एका दैत्याने दक्षिण भागातील ऋषी-मुनींचा मोठा छळ चालवला होता. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते शंकराकडे गेले. त्यांची याचना ऐकून शंकराने आपल्या जटा जमिनीवर जोराने आपटल्या.
त्यातून एका सिद्ध पुरुषाची निर्मिती केली. त्याचेच नाव सिद्धनाथ. शंकराच्या सांगण्यावरून त्याने पाताळलोकातील पाच कुंडांतील जल प्राशन करून दिव्य शक्ती प्राप्त केली व त्यायोगे काळासुराचा वध केला.
सिद्धनाथाला काळभैरव, भैरवनाथ, शिदोबा, सिद्धेश्वर या नावानेही संबोधले जाते. बलवडीनजीक म्हसवड, तसेच खरसुंडी येथेही सिद्धनाथाची मंदिरे आहेत. पेशव्यांच्या इतिहासात काही सिद्धनाथ मंदिरांचा उल्लेख आढळतो. दुसऱ्या बाजीरावाने केलेल्या धार्मिक कार्यांत सिद्धनाथ मंदिराचा उल्लेख येतो. इ.स. १७५० ते १८१८ या काळात सांगोला तालुका पेशव्यांच्या ताब्यात होता. १८१८मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांचा पराभव केल्यानंतर हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. पुढे इ.स. १८३५ मध्ये शिंदे, निंबाळकर, धायगुडे पाटील या छत्रपतींच्या कारभाऱ्यांच्या पुढाकाराने येथे सिद्धनाथ मंदिराचे बांधकाम करण्यात आले. १९९१ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
बलवडी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सिद्धनाथ मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे एक उंच चौथरा आहे. येथील अनेक कार्यक्रमांच्यावेळी त्याचा वापर व्यासपिठाप्रमाणे केला जातो. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एकावर एक अशा दोन चौथऱ्यांवर उंच दगडी दीपस्तंभ आहे. त्याशेजारी काही प्राचीन मूर्ती, विरगळ व शिवपिंडी आहेत. एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासणारे मंदिराचे प्रवेशद्वार हे दगडी बांधणीचे आहे. दुमजली प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कमळदल नक्षी व त्यावर दीपकोष्टके आहेत. या प्रवेशद्वाराचे बांधकाम शके १८३५ साली केल्याची त्यावर नोंद आहे. प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. या नगारखान्याला समोरील बाजूने दोन खिडक्या व छताकडील बाजूस बाशिंगी कठडा आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला द्वारपाल कक्ष आहेत.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारापासून मुख्य मंदिरापर्यंतच्या मार्गावर सभामंडप उभारलेला आहे.
या मार्गावर एका चौथऱ्यावर सिद्धनाथांचे वाहन असलेली घोड्याची मूर्ती आहे. त्यापुढे पितळी कासव आहे. सभामंडपात पुढच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. येथील गर्भगृह हेच मूळ मंदिर होय. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील बंदिस्त स्वरूपाच्या या गर्भगृहाला अरुंद प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या लाकडी झडपांवर द्वारपालशिल्पे आहेत. या प्रवेशद्वाराजवळ भैरवनाथ व जोगेश्वरी देवीचे उत्सवात वापरले जाणारे पितळी मुखवटे आहेत. गर्भगृहात एका मोठ्या वज्रपिठावर रजतपटल अच्छादित मखरात सिद्धनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींवर चांदीचे मुखवटे, विविध वस्त्रे व अलंकार आहेत. सिद्धनाथ मूर्तीजवळ गणेशाची पितळी लहान मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तींच्या मस्तकावर मागील प्रभावळीत पाच फण्यांच्या शेषाची शिल्पे व त्यांच्या दोन्ही बाजूला मयूरनक्षी आहे. मखराच्या दोन्ही स्तंभांवर खालील बाजूला द्वारपालशिल्पे आहेत.
दिवाळीचा पाडवा आणि तुलसी विवाहाच्या दिवशी येथे सिद्धनाथाची महापूजा केली जाते. या दरम्यानच्या काळात सिद्धनाथाचा उत्सव साजरा होतो. सिद्धनाथांच्या पुजेदरम्यान येथे गुलाल व खोबरे उधळण्याची प्रथा आहे. अनेक भाविक या काळात कडक उपवास करतात. रविवार हा सिद्धनाथाचा वार मानला जातो. या दिवशी येथे दर्शनासाठी अनेक भाविक येतात.