
महड व पाली या अष्टविनायक क्षेत्रांपैकी दोन स्थानांच्या मध्यावर सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा हे गाव आहे. येथील पेशवेकालीन जागृत सिद्धलक्ष्मी महागणपती मंदिर प्रसिद्ध आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची व दहा भुजा असलेली अशी दुर्मिळ आहे. अशी मान्यता आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळेओवळे अतिशय कडक असते. परंतु जांभुळपाड्याचे ग्रामदैवत असलेला हा उजव्या सोंडेचा गणपती कृपाळू आहे व त्याचा वरदहस्त गावावर आहे, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
पाली–खोपोली मार्गावर रस्त्यापासून काहीसे आत जांभूळपाडा हे गाव आहे. या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सिद्धलक्ष्मी महागणपतीचे मंदिर आहे. पूर्वी हा परिसर भोर संस्थानाचा भाग होता. त्या काळात गोंविंदराव दीक्षित यांचे हे खासगी मंदिर होते. तेव्हापासून हे मंदिर प्रसिद्ध आहे. २४ जुलै १९८९ ला आलेल्या महाभयंकर पुरामुळे जांभूळपाडा हे गाव प्रसिद्धीस आले. गावातून वाहणाऱ्या अंबा नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जवळजवळ सगळे गाव त्यात वाहून गेले होते. १०० पेक्षा जास्त ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या या महापुरानंतर उद्ध्वस्त झालेल्या गावाच्या पुनर्वसनात येथील सिद्धलक्ष्मी महागणपती देवस्थानाचा मोठा वाटा आहे.
महापुरात या मंदिराचेही नुकसान झाले होते. मंदिराच्या सर्व भिंती वाहून गेल्या होत्या. नदीतून मोठमोठे ओंडके वाहून आले होते. अशाही परिस्थितीत गणपतीची बैठक आणि मूर्तीला मात्र कोणताही धक्का लागला नव्हता. या एका घटनेने या गणपतीवरील ग्रामस्थांची श्रद्धा द्विगुणित झाली आणि याच मंदिराच्या माध्यमातून काही दिवसांनी हे गाव पुन्हा उभे राहिले. पुरानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष नाना बोडस यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी या मंदिरासाठी ४० लाख रुपयांच्या देणग्या गोळा केल्या. त्या रकमेतून अंबा नदीतील गाळ उपसण्यात आला. नदीचे मुख अधिक रूंद करून पाण्याचा मार्ग अधिक प्रशस्त केला गेला. पाणी थेट गावात शिरू नये, यासाठी नदीकाठी बंधारा बांधण्यात आला. याशिवाय आलेल्या सरकारी मदतीचे योग्य व्यवस्थापन केले गेले आणि गाव पुन्हा उभे राहिले. त्यामुळे पुरामुळे उद्ध्वस्त झालेले आणि त्यानंतर उभे राहिलेले गाव, यात हे मंदिर
महत्त्वाचा दुवा ठरले.
रस्त्याला लागून असलेल्या या मंदिरासमोर खुला मंडप आहे. भाविकांच्या सोयीसाठी त्यावर पत्र्याची शेड टाकलेली आहे. या मंडपात मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस हवनकुंड आहे. जमिनीपासून काहीसे उंच असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. या पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूच्या चौथऱ्यावर गजराज शिल्पे आहेत. प्रवेशद्वारावरील ललाटबिंब स्थानाच्या वरील बाजूला गणपतीची मूर्ती आहे. येथून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपातील सर्व स्तंभ एकमेकांशी
महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या सभामंडपातील खांबांवर अष्टविनायकांच्या प्रतिमा आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या समोरील बाजूस जमिनीवर कासवमूर्ती आहे.
गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या एका छोटेखानी देव्हाऱ्यात सिद्धलक्ष्मी महागणपतीची प्रसन्न मूर्ती आहे. उजव्या सोंडेच्या या गणपतीच्या डाव्या मांडीवर सिद्धलक्ष्मी विराजमान आहे. सिद्धलक्ष्मी म्हणजे धनाची देवता. भक्तांना इप्सित फलप्राप्ती करून देणारी ही देवता असल्याची श्रद्धा आहे.
त्यामुळे या गणपतीचे नाव सिद्धलक्ष्मी महागणपती असे आहे. हा दशभुजा, म्हणजे १० हात असलेला गणपती आहे व त्याच्या प्रत्येक हातात एकेक अस्त्र आहे. पौराणिक माहितीनुसार, हेरंब, उच्छिष्ट व वल्लभ ही गणेशाची ध्याने दहा भुजांची आहेत. यातील चार हात गणपतीचे व उर्वरित सहा हात हे ब्रह्मा, विष्णू व महेशाचे मानले जातात. महाराष्ट्रात अशी मूर्ती दूर्मिळ असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आवारात साईबाबा, स्वामी समर्थ व वेळणेश्वर ही लहान मंदिरे आहेत. याशिवाय येथे मंगल कार्यालयही आहे. परिसरातील गावांमधील आदिवासींना विविध कार्यासाठी ते अल्प शुल्कात उपलब्ध करून दिले जाते.
दरवर्षी माघी गणेश जयंतीला येथे मोठा उत्सव होतो. गणेशजन्माचे कीर्तन, पालखी सोहळा, महाप्रसाद असे कार्यक्रम असतात. माघी गणेशोत्सवात बालगणेशाचा पाळणा हलविला की निपुत्रिकांना आपत्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याशिवाय भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवही येथे साजरा होतो. दरवर्षी २५ व २६ डिसेंबर या दोन दिवसांत मंदिराचा वर्धापनदिन साजरा केला जातो. त्यावेळी येथे गणेश याग केला जातो. यावेळी महाप्रसाद असतो. या उत्सवांव्यतिरिक्त मंदिर समितीतर्फे परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिरे, मोतीबिंदू तपासणी आणि चष्मा वाटप यांचा त्यात समावेश आहे.