सप्तचिरंजिवांपैकी एक असलेला हनुमान हे शक्ती आणि भक्तीचे मूर्त रूप मानले जाते. मारुती, बजरंग, बलभीम, रामदूत, केसरीनंदन, आंजनेय, वायुपुत्र, पवनसुत, वज्रांग, संकटमोचन, महावीर, महारुद्र, हनुमंत आदी नावांनी पूजला जाणारा हनुमान हे अनेकांचे आराध्यदैवत आहे. हनुमान हा आर्येतरांचा मूळ देव मानला जातो. महाराष्ट्रात एकही गाव असे नसेल की जेथे हनुमानाची मूर्ती नाही. माण आणि म्हैस नद्यांच्या संगमावर वसलेल्या बालापूरमध्ये हनुमानाचे प्राचीन स्थान आहे. श्री सिद्ध तपे या नावाने येथील हनुमान ओळखला जातो.
माण आणि म्हैस नद्यांच्या संगमावर वसलेल्या बालापूरला मोठा इतिहास आहे. येथील बालापूर किल्ला विदर्भातील सर्वात मजबूत किल्ला समजला जातो. औरंगजेबाचा पुत्र आझमशाह याने १७२१ मध्ये या किल्ल्याच्या उभारणीस सुरूवात केली. या किल्ल्याचे काम तत्कालीन एलिचपूरचा (सध्याचे अमरावतीतील अचलपूर) नवाब इस्माईल खान याने पूर्ण केल्याची नोंद आहे. या किल्ल्याच्या दक्षिण दिशेला बालादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या देवीवरूनच या शहराला ‘बालापूर’ हे नाव पडल्याचे सांगण्यात येते. बालापूर तालुक्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. सिद्ध तपे हनुमान मंदिर हे त्यापैकीच एक होय. तीन हेक्टर जागेत, निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या मंदिरात शिवशंकर, राधाकृष्ण, अंबिका माता तसेच रामदरबाराचेही दर्शन घडते.
या मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे ५०० वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील होशिंगाबाद जिल्ह्यातील ठाकूर कबिल्यातील एक सेनापती आपल्या सैन्यासह मोहिमेवर जात होता. त्या दरम्यान काही काळ त्याने बालापूर परिसरात छावणी ठोकली होती. हा परिसर भावल्याने त्याने येथे आपल्या आराध्यदेवतेचे म्हणजेच हनुमानाचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला या मंदिराचे स्वरूप छोटेखानी होते. एका ओट्यावर हे मंदिर उभे होते. कालांतराने येथे एक संन्यासी आला. त्याने तब्बल २४ वर्षे येथे तपश्चर्या केली. त्यामुळे त्याला तपी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले आणि येथील हनुमानालाही त्याच्याच नावाने संबोधले जाऊ लागले. भक्ताच्या नावाने देवाला संबोधले जाण्याचे हे एक अनोखे उदाहरण मानले जाते.
खामगाव-अकोला मार्गावरील बाळापूर बायपासनजीक असलेल्या या मंदिरावरील शिखरे लांबूनही नजरेस पडतात. मंदिरासमोर असलेल्या प्रांगणात पत्र्याची शेड व डावीकडे गोशाळा आहे. याच प्रांगणात एक प्राचीन शिवपिंडी व नंदी आहे. त्यासमोर शिवाची सुंदर मूर्ती आहे. येथे एक यज्ञमंडप आहे. या मंडपासमोरील लहानशा मंदिरात हनुमानाच्या तीन मूर्ती आहेत. मुख्य मंदिराशेजारी संतभवन आहे. सभामंडप व तीन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. कमानीदार प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडात प्रवेश होतो. या सभामंडपात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच साईबाबांची मूर्ती आहे. सभामंडपाच्या उजव्या बाजूस अंबिकामातेचे गर्भगृह आहे. त्यात देवीची सुंदर मूर्ती विराजमान आहे. नजीकच असलेल्या शंकराच्या गर्भगृहासमोर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात शिवपिंडी व त्यावर नागाने छत्र धरले आहे. मागील बाजूला असलेल्या भिंतीतील देवळीत पार्वतीमातेची मूर्ती आहे.
सभामंडपात मध्यभागी हनुमानाचे मुख्य गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या एका भिंतीवर पादुकांचे चित्र आहे. गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या हनुमानाच्या शेंदूरचर्चित मूर्तीवर मुखवटा आहे. या गर्भगृहाच्या समोर रामदरबार आहे. त्यात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. याशिवाय श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्या धातूच्या मूर्तीही येथे आहेत. उत्सवप्रसंगी त्या पालखीत ठेवल्या जातात. मंदिरात राधा-कृष्णाचेही मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात येथे तपस्या करणाऱ्या मौनीबाबा महाराज, सूर्यानंद पुरी महाराज आदींच्या मूर्तीही आहेत. या मंदिराच्या छतावर एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराच्या परिसरात असलेल्या पाकशाळेजवळ एक जुने जाते आहे. या जात्यावर आजही धान्य दळले जाते. त्याचा उपयोग मंदिरात नैवद्य बनवण्यासाठी केला जातो.
या मंदिरात हनुमान जयंती, रामजन्म हे प्रमुख उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने साजरे केले जातात. त्याच प्रमाणे येथे महाशिवरात्र, कृष्णजन्माष्टमी हे उत्सवही साजरे केले जातात. उत्सवांनिमित्ताने येथे भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. मंगळवारी, शनिवारी तसेच पोर्णिमेच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.