
भारतातील देवस्थाने जशी देव देवतांच्या नावाने ओळखली जातात तशीच ती ऋषीमुनी, साधू, संत व संन्यासांच्या नावानेही ओळखली जातात. व्यास पुत्र शुकाचार्य मुनी यांचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आटपाडी तालुक्यातील हिवतड गावाजवळील डोंगर भागात आहे. शुकाचार्य हे जन्मजात वेदसंपन्न होते. त्यांनी शुक म्हणजेच पोपटाच्या जन्मात शिव व पार्वती यांचा संसारभेद संवाद ऐकला होता. त्यामुळे त्यांची संसार सुखाची आसक्ती जाऊन मोक्षाचे ज्ञान प्राप्त झाले होते. त्यांच्या निर्वाणाचे स्थान असल्याने या हेमाडपंती स्थापत्य शैलीतील मंदिराला विशेष महत्त्व आहे.
हे मंदिर सातशे ते आठशे वर्षे प्राचीन असले तरी येथील गुहा हजारो वर्षांपूर्वीच्या असल्याचे सांगितले जाते. शुकाचार्यांना कशाचाही मोह, आसक्ती नव्हती. ते सदेही असूनही विदेही अवस्थेत होते. त्यामूळे स्वर्गातील अप्सराही त्यांच्यासमोर निसंकोच वावरत असत. असे सांगितले जाते की शुकाचार्यांनी येथील गुहेत परिक्षित राजाला संक्षिप्त स्वरूपात भागवत पुराण सांगितले होते. मंदिराची अख्यायिका अशी की शुकाचार्यांचे वाढते तपोबल पाहून इंद्राला आपले आसन डळमळीत होऊ लागल्याची शंका वाटली. इंद्राने शुकाचार्यांचा तपोभंग करण्यासाठी येथील गुहेत अप्सरा पाठवल्या. शुकाचार्यांना अंतर्ज्ञानाने इंद्राच्या कपटाची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आपला अवतार आवरता घेण्याचे ठरवले व येथील गुहांमधील खडकात ते अंतर्धान पावले. याच ठिकाणी हे मंदिर बांधले असल्याचे सांगितले जाते.
हिवतड गावाच्या वेशीवरून सुमारे १२५ पायऱ्या चढून शुकाचार्य मंदिराकडे येता येते. पायऱ्यांच्या एका बाजूला डोंगरकडा तर दुसऱ्या बाजूला दरी आहे. पायऱ्यांच्या मार्गालगत धर्मशाळेची इमारत आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांची राहण्याची येथे व्यवस्था होते. त्यापुढे काही अंतरावर शुक माहात्म्य
सांगणारा फलक आहे. यापुढे तीन गोमुख आहेत. त्यापैकी एका गोमुखातून पाण्याचा अखंड नैसर्गिक प्रवाह खालील कुंडात पडत असतो. गोमुखाच्या मागे कुंडावर शंकराची व नंदीची मूर्ती आहे. नंदीच्या बाजूला भग्न अवस्थेतील पुरातन वीरगळ आहे. येथील पाण्याने शुचिर्भूत होऊन भाविक मंदिराकडे जातात.
मंदिराच्या प्रांगणात असलेल्या तुलसी वृंदावनाच्या शेजारी नाग शिल्प व नंदीची मूर्ती आहे. याठिकाणी काही समाधी स्थळेही आहेत. त्यांच्या बाजूलाच असलेल्या गुहेत शिवपिंडी आहे. येथून पुढे मंदिराचा सभामंडप आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपात तीन पायऱ्या चढून यावे लागते. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ चौकोनी तर मधल्या रांगांतील सहा स्तंभ हे षट्कोनी, अष्टकोनी, वर्तुळाकार, चौकोनी व त्रिकोणी असे विविध भौमितिक आकाराचे आहेत. स्तंभांवर शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर तुळई व तुळईवर छत आहे. सभामंडपाचे संपूर्ण बांधकाम घडीव दगडात आहे. त्यात शिवगिरी
महाराजांची समाधी, गणपती, भैरव मूर्ती व शिवपिंडी आहेत.
पुढे असलेल्या अंतराळाच्या द्वारशाखेवरील नक्षीकाम व ललाटबिंबावरील शिल्प अस्पष्ट झालेले आहे. अंतराळात वज्रपिठावर शिवपिंडी व भिंतीकडील गुहेत दोन समाध्या आहेत. येथून पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गुहासदृश गर्भगृहात एका बाजूला असलेले कातळकडे ही शुकाचार्यांची पाठ असल्याचे सांगितले जाते. भाविक मंदिरात येऊन शुकाचार्यांच्या पाठीचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना व्यक्त करतात. येथे शुकाचार्यांचा पितळी मुखवटा आहे. मंदिराला लागून असलेल्या गुहेत यज्ञकक्ष आहे. बाजूला असलेल्या दुसऱ्या गुहेत शुकाचार्यांची ध्यानस्थ मूर्ती आहे.
प्रांगणातील वटवृक्षाच्या पाराच्या भिंतीत प्राचीन शिखराचे अवशेष व व्याल शिल्प आहे. या पारावर नाग, पंचमुखी हनुमान मूर्ती, काही भग्न वीरगळ, शिवपिंडी व नंदी आहे. तटबंदीच्या भिंतीतील देवकोष्टकात मारूतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. बाजूलाच देवस्थानच्या पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या तळघरात असलेल्या कपारीतील ध्यानगुहेत जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. येथून पुढे लहान चौथरा व त्यावर स्थानिक देवतांचे पाषाण, काही शंख व प्रतिमा आहेत. बाजूलाच डोंगराच्या कातळात कोरलेली दत्तात्रेयांची मूर्ती आहे. पुढे साठवण कक्ष व पुजा साहित्याची दुकाने आहेत. प्रांगणात लोखंडी तटबंदीच्या कडेकडेने भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. मंदिराच्या प्रांगणातून काही पायऱ्या उतरून हिवतड गावाकडे जाणाऱ्या मार्गावर देवस्थानची गोशाळा व उत्सव काळात वापरला जाणारा रथ ठेवलेला कक्ष आहे.
मंदिरात श्रावणातील सर्व सोमवारी तसेच अधिक मासात महिनाभर भाविकांची गर्दी उसळते. मंदिरात महाशिवरात्रीचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. शुकाचार्य डोंगर परिसरातील निसर्गसौंदर्य व पावसाळी धबधबे पर्यटकांचे आकर्षण असते.