श्रीक्षेत्र शिवथरघळ

कुंभेशिवथर, ता. महाड, जि. रायगड

ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद।

येथ बोलिला विशद। भक्तिमार्ग॥

असे समर्थ रामदास स्वामीदासबोधाच्या सुरुवातीलाच सांगत असले, तरी हा ग्रंथ केवळ भक्तिमार्गच सांगणारा नाही. जगावे कसे हे तर हा ग्रंथ सांगतोच, पण कसे जगू नये, याचीही शिकवण देतो. अशा या महान ग्रंथाचे जन्मस्थान म्हणून महाड तालुक्यातील कुंभेशिवथर येथील शिवथरघळीकडे पाहिले जाते. १६४९ ते १६६० अशी तब्बल ११ वर्षे रामदास स्वामी या ठिकाणी वास्तव्यास होते. समर्थांच्या वास्तव्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे स्थळ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे

गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे।। धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे  

असे सुंदर वर्णन समर्थांनी या घळीसंदर्भात केलेले आहे. यामुळेच त्यांनी या जागेलासुंदरमठही उपमा दिली होती. रायगड सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर, पर्वताच्या कुशीत वसलेले शिवथरघळ हे निसर्गरम्य ठिकाण आहे. दोन बाजूंनी उंचच उंच डोंगर आणि मध्यभागी अरुंद दरीत ही निसर्गनिर्मित घळ आहे. समर्थांनंतर सुमारे २५० वर्षे ही घळ काळाच्या पडद्याआड गेली होती. येथील स्थानिक तिला रामदास गोसाव्याची गुहा असे संबोधत असत. परंतु धुळे येथील समर्थभक्त श्रीशंकर देव यांनी विविध ग्रंथांचा आधार घेत १९३० साली ती शोधून काढली. त्यामुळे आज ही घळ सर्वसामान्यांना पाहता येते.

कुंभेशिवथर आणि आजुबाजूचा परिसर चंद्रराव मोरे यांच्या जावळीच्या वतनात येत असे. ते विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. असे सांगितले जाते की चंद्रराव मोरे यांच्याशी सलोखा व्हावा, यासाठी समर्थांनी या घळीमध्ये गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी शिवाजी महाराज लवाजम्यासह येथे दर्शनासाठी आले होते. तेव्हा चंद्रराव मोरे यांच्याशी त्यांची भेट झाली होती. याशिवाय दक्षिणेकडील स्वारीवर जाण्यापूर्वी महाराजांनी येथे येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता, अशा इतिहासात नोंदी आहेत. .. १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. घळीच्या वरच्या डोंगरावर आजही चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे भग्नावशेष दिसतात. तेथून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड साधारणतः सारख्याच अंतरावर आहेत.

घळीच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापासून पुढे पायी यावे लागते. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका कमानीतून या घळीच्या मंदिर परिसराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथून पुढे ४० पायऱ्या चढून श्रीसमर्थ सेवा मंडळ आणि सुंदरमठ सेवा समिती यांचे कार्यालय असलेल्या इमारतीजवळ पोहोचता येते. या इमारतीमध्ये भक्तनिवास, भोजन मंडप, सभागृह अशा सोयीसुविधा आहेत. असे सांगितले जाते की ही सर्व जागा पूर्वी शिवथरचे जमीनदार श्रीमान पांडुरंगराव परांजपे यांच्या मालकीची होती. समर्थकार्यासाठी त्यांनी ही जागा दान दिली आहे. या ठिकाणी असलेल्या सभामंडपात समर्थांची सुमारे सहा फूट उंचीची मोठी मूर्ती आहे

येथून पुढे घळीकडे जाण्याचा मार्ग आहे. या साधारणतः १०० मीटर अंतराच्या मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी शेड उभारण्यात आलेली आहे. या शेडमधून पुढे आल्यावर शिवथरघळीचे दर्शन होते. समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचीवर असलेली ही निसर्गनिर्मित घळ साधारणतः ३८ मीटर लांब, २७ मीटर रूंद पुरुषभर उंचीची आहे. या घळीत मारूतीची मूर्ती आहे. याशिवाय रामदास स्वामी सांगत असलेल्या ओव्या कल्याण स्वामी लिहून घेत आहेत, अशा सुंदर मूर्ती आहेत. सन १९५९ मध्ये श्री. बी. डी. थत्ते यांनी घडविलेल्या या मूर्तींची १९६० साली श्रीधरस्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. समर्थांच्या मूर्तीच्या मागील बाजूस श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आहेत. १९६१ मध्ये गोकर्णचे विद्वान पंडित गोविंदशास्त्री खरे यांनी या मूर्ती दिल्या होत्या. वर्षातील आठ महिने या घळीच्या वरून पांढरा शुभ्र धबधबा कोसळत असतो. पावसाळ्यात त्याचा वेग जास्त असतो. निसर्गाची मुक्त उधळण १०० फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे हे ठिकाण पर्यटकांनाही कायम आकर्षित करते.

दररोज पहाटे .३० वाजता आणि संध्याकाळी .३० वाजता येथे उपासना चालते. माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमीपर्यंत येथेदासबोध जयंती उत्सवहोतो. याखेरीज योग शिबिर, बाल शिबिर, प्रौढ शिबिर, वानप्रस्थ शिबिर असे अध्यात्मिक उपक्रमही राबविले जातात. दररोज दुपारी १२ ते दीडपर्यंत येथे येणाऱ्या भाविकांना समितीतर्फे मोफत खिचडीभात शिरा असा प्रसाद देण्यात येतो. भाविकांसाठी येथे सुसज्ज भक्तनिवासही आहे.

उपयुक्त माहिती

  • महाडपासून ३२ किमी, तर सातारा येथून १३२ किमी अंतरावर
  • मुंबई महाड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने घळीच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : दत्ताजीराव चव्हाण, अध्यक्ष, मो. ९४२३२५००८२
Back To Home