शेगावचे संत गजानन महाराज यांनी सूचविलेल्या जागेवर उभारण्यात आलेले मंदिर ही भांबेरीतील श्रीराम मंदिराची महत्त्वाची ओळख आहे. या गावच्या आराध्यदैवतासारखा मान असलेल्या भाऊसाहेब महाराज उर्फ देव मास्तर यांनी गजानन महाराज यांच्या आज्ञेवरून ७७ वर्षांपूर्वी हे मंदिर उभारले. या मंदिराला लागून भाऊसाहेब महाराजांचे समाधी मंदिरही आहे. पंचक्रोशीतील असंख्य लोकांची भाऊसाहेब महाराजांवर नितांत श्रद्धा आहे. त्यांना मानणारे अनेक भाविक त्यांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतल्यानंतरच दिनचर्येला सुरूवात करतात. त्यामुळे हे मंदिर नित्य गजबजलेले असते.
मंदिराबाबतच्या आख्यायिकेनुसार, भांबेरी येथे गुरुवर्य रामचंद्र पुरूषोत्तम देव ऊर्फ भाऊसाहेब महाराज हे सत्पुरूष होऊन गेले. २९ मार्च १८७३ ही त्यांची जन्मतारीख. ते शिक्षक होते. त्यामुळे पंचक्रोशीत ‘देवमास्तर’ म्हणूनही ते ओळखले जात. समाजात प्रबोधनकार्य करणाऱ्या भाऊसाहेब महाराजांनी येथे वारकरी संप्रदायाची स्थापना केली. अनेकांना सन्मार्गावर नेले. ते महादेवाचेही निस्सिम भक्त होते. एकदा ते गावातून चालले असता, तेथे अचानक आलेल्या गजानन महाराजांनी त्यांच्याजवळचे कैऱ्यांचे गाठोडे हिसकावून घेतले आणि त्यातील कच्च्या कैऱ्या खाण्यास सुरूवात केली. त्यानंतर एका जागेकडे निर्देश करत तेथे श्रीराममंदिर उभारण्याची त्यांनी भाऊसाहेबांना आज्ञा केली. ती शिरसावंद्य मानून भाऊसाहेब महाराजांनी मंदिर उभारण्याच्या कामास प्रारंभ केला.
भाऊसाहेब यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी लोकवर्गणीतून हे मंदिर उभारण्याचे ठरवले. त्यासाठी काही हजार रूपये जमा झाले. परंतु ते धन त्यांनी ज्या व्यक्तीकडे जपून ठेवण्यासाठी दिले होते, त्या व्यक्तीने ते लंपास केले. त्यामुळे सत्प्रवृत्तीच्या भाऊसाहेब महाराजांना परमदुःख झाले. त्यांना कमालीचे वैराग्य आले आणि त्यांनी ग्रामत्याग करून तपसाधनेसाठी हिमालयात प्रयाण केले. भाऊसाहेबांना सोसाव्या लागलेल्या मानसिक वेदनांमुळे गावातील अनेक सज्जन व्यक्ती हळहळत होत्या.
अखेर त्यातील काहींनी हिमालयात जाऊन महाराजांना गावी परत येण्याचे साकडे घातले. अखेर भाऊसाहेब येथे परतले. ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा मंदिरासाठी निधी उभारून दिला आणि त्यातून १९ एप्रिल १९४८ रोजी येथे हे मंदिर उभारण्यात आले. गजानन महाराज यांनी दिलेली मंदिर उभारणीची आज्ञा त्यांच्या निर्वाणानंतर तब्बल ३८ वर्षांनी पूर्ण झाल्यानंतर एका वर्षात भाऊसाहेबांनी प्राण त्यागले. ६ मे १९४९ रोजी त्यांचे निर्वाण झाले.
भांबेरी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी रस्त्यालगत हे मंदिर आहे. एखाद्या जुन्या वाड्याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. प्रशस्त सभामंडप व तीन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. बंदिस्त सभामंडपातील सर्व स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपातील भिंतीवर भाऊसाहेब महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित अनेक प्रतिमा आहेत. सभामंडपाच्या पुढे लाकडी रेलींग व त्यापुढे तीन गर्भगृहे आहेत. त्यापैकी मध्यभागी असलेल्या मुख्य गर्भगृहात तीन थरांच्या वज्रपिठावर वरील बाजूस श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. श्रीराम व लक्ष्मणाच्या हातांत धनुष्यबाण, सर्व मूर्तींच्या डोक्यावर मुकूट व त्यावर छत्रे आहेत. वज्रपिठाच्या मधल्या स्तरावर भरत व शत्रुघ्न यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या दोन मूर्तींच्या मध्यभागी श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या पितळी उत्सवमूर्ती आहेत. वज्रपिठाच्या खालच्या स्तरावर हनुमान व गरूड यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. डावीकडील गर्भगृहात राधा-कृष्णाच्या संगमरवरी मूर्ती व उजवीकडील गर्भगृहात चतुर्मुखी शिवलिंग आणि त्यासमोर नंदी विराजमान आहे. शिवलिंगाच्या मागील बाजूकडील भिंतीनजीकच्या मखरात पार्वतीमातेचे स्थान आहे. या मखराच्या डावीकडे गणेशाची तर उजवीकडे वीरभद्राची मूर्ती आहे.
या मंदिराला लागून भाऊसाहेब महाराजांचे समाधीमंदिर आहे. येथे येण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून खाली काही पायऱ्या उतराव्या लागतात.
समाधीमंदिरात भाऊसाहेब महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे गावातील महादेवाचे प्राचीन मंदिर, तसेच हनुमान मंदिर यांच्या प्रतिमा आहेत. या प्राचीन महादेव मंदिरात भाऊसाहेब महाराज नेमाने दर्शनासाठी जात असत. मंदिर परिसरातील एका खोलीतील देव्हाऱ्यात भाऊसाहेब महाराजांचे सुंदर शिल्प आहे.
या मंदिरात सकाळी तसेच सायंकाळी आरती केली जाते. प्रभू रामचंद्रांना दररोज पुरणपोळीचा नैवद्य दाखवण्यात येतो. रोज सायंकाळी हरिपाठ होतो. दर शुक्रवारी तसेच पौर्णिमेला गावात भाऊसाहेब महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. त्यावेळी महाप्रसादाचेही वाटप करण्यात येते. दर एकादशीला येथे जागरण करण्यात येते. दर महिन्यातील शिवरात्रीला मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो. येथे गुढीपाडवा, रामनवमी, गोकुळअष्टमी, नवरात्र, कोजागरी पौर्णिमा, गीता जयंती, मकर संक्रांत, गुरू पौर्णिमा आदी सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याच प्रमाणे येथे फाल्गुन वद्य पंचमीस भाऊसाहेब महाराज प्रकट दिन महोत्सव व महाप्रसाद, तसेच वैशाख शुद्ध पंचमीस मंदिर स्थापना व भाऊसाहेब महाराज पुण्यतिथी सप्ताह साजरा करण्यात येतो. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात देवाचे दर्शन घेता येते.