श्रीराम मंदिर

अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव

थोर साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी नेते साने गुरूजी यांचे वास्तव्य व कार्य यामुळे ओळखले जाणारे अमळनेर हे खान्देशातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. उद्योगपती श्रीमंत प्रतापशेठ यांनी या शहरात पहिली सूत गिरणी सुरू करून त्याच्या औद्योगिक प्रगतीचा पाया घातला. याच श्रीमंत प्रतापशेठ यांनी अमळनेरमध्ये भव्य अशा श्रीराम मंदिराची उभारणी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले हे मंदिर आज शहरातील विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे केंद्र आहे.

बोरी नदीकाठी वसलेल्या अमळनेर या ग्रामनामाची उत्पत्ती ‘अ-मल’ अधिक ‘नेर’ अशी सांगण्यात येते. अमल म्हणजे मलविरहित व नेर हा ‘पूर’, ‘नगर’ यांसारखा ग्रामवाचक प्रत्यय आहे. या परिसरात प्राचीन काळी भिल्ल तसेच गोंड राजांची सत्ता होती. यानंतर यादव, फारूखी, मुघल, मराठे व ब्रिटिश यांच्या राजवटीही या परिसराने अनुभवल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात अमळनेरच्या प्रगतीत श्रीमंत प्रतापशेठ यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांचे मूळ नाव मोतीलाल माणिकचंद अगरवाल असे होते. इ.स. १९०८मध्ये त्यांनी येथे ‘प्रताप स्पिनिंग, विव्हिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ या नावाने मोठी सूतगिरणी स्थापन केली. श्रीमंत प्रतापशेठ हे दूरदृष्टीचे दानशूर उद्योगपती होते, त्याच प्रमाणे ते तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासकही होते. 

‘तत्त्वज्ञानावरील व्याख्याने’ (हिंदी व मराठी), तसेच ‘श्रीमंत प्रतापशेठजी की खासगी टिप्पणीयां’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी त्यांनी १९१६ मध्ये येथे ‘प्रताप तत्त्वज्ञान केंद्र’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था उभारली. १९२२ साली साने गुरूजी पदवीधर झाले. त्यानंतर ते याच संस्थेत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी आले होते. दोन वर्षांनी ते येथील खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत इंग्रजी, संस्कृत, इतिहास व मराठीचे शिक्षक म्हणून रूजू झाले. ही शाळा आज प्रताप हायस्कूल म्हणून ओळखली जाते. अशा शैक्षणिक संस्थांबरोबरच समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रीमंत प्रतापशेठ यांनी अमळनेरमध्ये १९४३ साली श्रीरामाचे मंदिर उभारले.

समोरून भव्य अशा हवेलीसारखे दिसणारे हे मंदिर प्रशस्त प्रांगणात वसले आहे. या प्रांगणास चहूबाजूंनी आवारभिंत आहे. रस्त्याच्या बाजूने त्यास दोन मोठी महिरपी कमानदार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताच डाव्या बाजूस शंकराचे छोटे मंदिर आहे. मंदिरात संगमरवरी दगडात घडविलेले शिवलिंग व नंदी आहे. येथून पुढे काही अंतरावर उंच अधिष्ठानावर बांधलेल्या दगडी छत्रीमध्ये हनुमानाची वैशिष्ट्यपूर्ण संगमरवरी मूर्ती आहे. येथील हनुमान बालरूपात आहे. या मूर्तीचे हात-पाय व मुख यांतून बालहनुमानाचे वानररूप स्पष्टपणे दिसते. या मूर्तीच्या अंगावर खान्देशी सुती वस्त्रे व मस्तकावर मोठा मुकूट आहे. या छत्रीसमोर मंदिराची तीन मजली भव्य इमारत उभी आहे. मुख्य मंदिराच्या इमारतीवर दक्षिण भारतीय मंदिर वास्तुकलेप्रमाणेच वसाहतकालीन आणि इंडो-सरासेनिक स्थापत्यशैली यांचा प्रभाव आहे. आयताकृती आकाराच्या या इमारतीच्या दर्शनी भागातील उंच कमानदार खिडक्या वसाहतकालीन इमारतींची आठवण करून देणाऱ्या आहेत. खिडक्यांच्या चौकोनी पॅनेलवर फुलांचे व भौमितिक आकाराचे नक्षीकाम करण्यात आले आहे.

मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि त्यावर उरूशृंग पद्धतीचे उंच शिखर अशी या मंदिराची रचना आहे. सुंदर व प्रसन्न अशी रंगसंगती आणि कोरीव नक्षीकामाने नटवलेले स्तंभ असलेल्या मुखमंडपातून आत येताच समोर प्रशस्त आणि उंच असा सभामंडप आहे. दोन्ही बाजूंच्या भिंतीत मोठमोठ्या जाळीदार खिडक्या, वरच्या भागात काचेची तावदाने लावलेल्या खिडक्या यामुळे हा सभामंडप प्रकाशमान आहे. दोन्हींकडील भिंतीत असलेल्या रंगीत नक्षीदार अर्धस्तंभांच्यावर शीर्षस्थानी मोठी गजमुखे आहेत. त्यातून सभामंडपातील वरचा गच्चीचा भाग हत्तींनी पेलल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. या गच्चीचा कठड्यांचा भागही जाळीदार नक्षीकामाने सुशोभित केलेला आहे. सभामंडपात उजव्या बाजूस संगमरवरी चौथऱ्यावर आदी शंकराचार्यांची सुबक संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. श्रीमंत प्रतापशेठ हे आदी शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाने प्रभावित होते. सभामंडपातील भिंतींवर हनुमान, श्रीराम-लक्ष्मण-सीता, लक्ष्मी, सरस्वती यांच्या मोठ्या तसबिरी आहेत. याच बरोबर येथील ‘सेतुबंधन’ आणि श्रीराम-सीता यांचा ‘विश्रांतीचा क्षण’ ही दोन मोठी चित्रे प्रेक्षणीय आहेत.

मुखमंडपाच्या प्रवेशद्वारावर गजमुखांवर पेललेली कमान व ललाटबिंबस्थानी श्रीरामांचे मुखशिल्प कोरलेले आहे. गर्भगृहाच्या द्वारचौकटीशेजारील देवकोष्टकांमध्ये वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याच्या वरील भागात भिंतीवर गणेशाची प्रतिमा लावलेली आहे. आत उंच अधिष्ठानावर नक्षीदार गजमखरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या विलोभनीय संगमरवरी मूर्ती विराजमान आहेत.

या मंदिरात नियमित आरती, भजन व सत्संगाचे आयोजन होते. रामजन्म हा मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव होय. या दिवशी येथे विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. परिसरातील असंख्य लोक या दिवशी मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिरात सातत्याने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. देशभरातील अनेक संत व आध्यात्मिक गुरूंनी या मंदिरात येऊन भाविकांना मार्गदर्शन केले आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे अमळनेर पंचक्रोशीतील नवीन लग्न झालेली जोडपी सर्वप्रथम या मंदिरात येऊन श्रीराम-सीतेचे दर्शन घेतात. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक या मंदिरात दर्शनासाठी येऊ शकतात.

उपयुक्त माहिती

  • अमळनेर बस स्थानकापासून २ किमी, तर जळगावपासून ५७ किमी अंतरावर
  • जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरांतून अमळनेरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मिलिंद अग्रवाल, मो. ७८७५५५६५८९
Back To Home