पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका हा निसर्गसमृद्ध प्रदेश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावान सरदारांपैकी दयाजीराव मारणे यांचे हे कार्यक्षेत्र. सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या खारवडे गावात नवसाला पावणारा आणि प्रामुख्याने येथील शेतकरी, गवळी व भोसले कुळांत मानल्या जाणाऱ्या देवाचे म्हणजेच श्री म्हसोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. असे सांगितले जाते की, हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर या मंदिरात नेहमी दर्शनाला येत असत.
मंदिराची आख्यायिका अशी, बुवाजी मारणे नावाचे एक गृहस्थ रोज जंगलात लाकूडफाटा गोळा करण्यासाठी जात असत. एके दिवशी झाडाखालील पालापाचोळा दूर करताना त्यांच्या हाताला शेंदूर लागल्याचे दिसले. त्यांनी पुन्हा पुन्हा खात्री करून पाहिली. या घटनेमुळे ते अस्वस्थ झाले. घरी परतल्यावरही त्यांच्या मनात तेच विचार घोळत होते. रात्री उशिरा प्रत्यक्ष म्हसोबाने स्वप्नात येऊन, ‘‘ज्या जागी शेंदूर आढळला, त्या जागी माझे वास्तव्य आहे’’, असे सांगितले. स्वप्नदृष्टांतानुसार दुसऱ्या दिवशी तेथे उत्खनन केल्यावर त्या जागेवर गावकऱ्यांना शेंदराने भरलेली श्री म्हसोबाची मूर्ती आढळली. सध्याच्या खारवडे गावातील श्री म्हसोबाची मूर्ती ही तीच मू्ळ मूर्ती होय. साधारणतः तेराव्या शतकातील ही कथा आहे आणि हे जागृत देवस्थान मानले जाते.
दगडी बांधकामातील हे मंदिर जीर्णोद्धारानंतर काही नवीन बदलांनी सुसज्ज, प्रशस्त बनले आहे. भव्य तटबंदी असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर नगारखाना आहे. आजूबाजूला गर्द झाडी असल्यामुळे येथील वातावरण शांत व प्रसन्न भासते. संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ व टापटीप आहे. सर्वत्र शोभेची झाडे लावल्याने मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलते. संपूर्ण दगडी बांधकामातील या मंदिराचा कळस मात्र काहीसा वेगळा आहे. या कळसावरील नक्षीकाम काहीसे वेगळे आहे आणि लांबून पाहिल्यावर ते नक्षीकाम खालून वर जाण्यासाठी पायऱ्या असल्यासारखे वाटते.
मंदिराच्या आवारात एक मोठी प्राचीन घंटा व दोन दगडी दीपमाळा आहेत. मुख्य मंदिराजवळच श्री गणपती, श्री दत्त व मारुती यांची मंदिरे आहेत. बाजूलाच शिवलिंग आणि हत्तीची मोठी दगडी मूर्ती आहे. मागच्या बाजूला मुंजोबा देवाचे मंदिर आहे. भव्य सभामंडप व गाभारा असे मुख्य मंदिराचे स्वरूप आहे. भाविकांची या मंदिरात कायमच गर्दी असल्यामुळे सभामंडपात भक्तांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्टीलचे बॅरिकेटस् लावून दर्शन मार्ग तयार करण्यात आले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीचे नक्षीकाम केलेल्या मखरामध्ये तांदळा स्वरूपाची सुंदर व प्रसन्न अशी श्री म्हसोबा देवाची मूर्ती आहे. देवाच्या उजव्या हाताला वळंजाई देवीची मूर्ती आणि त्यामागे एक त्रिशूळ आहे.
मंदिरात दररोज चार वेळा देवाची आरती होते. सकाळी ५ ते ६ या वेळेत महापूजा व आरती, ९ वाजता आरती, दुपारी १२.३० वाजता नैवेद्य व आरती आणि सायंकाळी ६ वाजता पुन्हा आरती होते. दर पौर्णिमेला होमहवन व रुद्राभिषेक होतो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. पालखीत देवाचा चांदीचा मुखवटा व पादुका ठेवून पूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. या देवस्थानाला शासनाकडून ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. भाविकांच्या सोईसाठी मंदिर समितीतर्फे भक्त निवासाची सुविधा करण्यात आली आहे.