सात सर्ग, २४,००० श्लोक आणि सुमारे ४,८०,००० हजार शब्द असलेल्या विश्वप्रसिद्ध ‘रामायण’ या महाकाव्याची रचना करणाऱ्या आदिकवी महर्षी वाल्मिकी यांचे जन्मस्थान म्हणून श्री क्षेत्र वालझरी ओळखले जाते. असे सांगितले जाते की पिंपरखेड येथे असलेल्या एका झऱ्यावर वाल्मिकी ऋषी जलप्राशनास येत असत. त्यामुळे या भागाला वालझिरी हे नाव पडले. महाराष्ट्र गॅझेटीयरमध्ये तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रकाशित कॉफी टेबल बुकमध्ये या स्थानाचा उल्लेख वाल्मिकी ऋषींचे जन्मस्थान, असा करण्यात आलेला आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या स्थानावर दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात.
महाकवी वाल्मिकी यांच्या जीवन चरित्राविषयी पौराणिक वाङ्मयात विविध मतमतांतरे आहेत. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ट्रेंड इन सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट’ या संशोधन पत्रिकेच्या पहिल्या खंडात संस्कृत तज्ज्ञ डॉ. मोहन मिश्र यांच्या ‘आदिकवि वाल्मिकी : रामकथा के प्रथम गायक’ या शीर्षकाचा निबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, वाल्मिकींना कोणी भृगू वंशीय, कोणी प्रचेतचा पुत्र, कोणी शूद्रेचा पती म्हटलेले आहे. स्कंद पुराणाच्या वैष्णव, आवन्त्य, प्रभास व नागर या खंडांमध्ये वाल्मिकी हे प्रथम दस्यू होते, असा उल्लेख आहे. वैष्णव खंडाखेरीज अन्य खंडामध्ये वाल्मिकींना
ब्राह्मणपुत्र म्हटलेले आहे. विष्णुपुराणानुसार वाल्मिकी हे भृगुवंशी ऋषी होते. त्यांचे मूळ नाव ऋक्ष असे होते. प्राचीन बौद्धकवी अश्वघोषाने, ते च्यवन ऋषींचे पूत्र असल्याचे म्हटले आहे, तर महाभारतात ते च्यवन ऋषी तप करत असताना वाल्मिकी झाले असे म्हटलेले आहे.
स्कंद पुराणातील नागरखंडातील १२४व्या अध्यायात दरोडेखोराचा वाल्मिकी झाल्याची कथा आलेली आहे. त्यानुसार चमत्कारापूर येथे लोहजंघ नावाचा ब्राह्मण राहात होता. तो मातृ–पितृ भक्त होता. सलग १२ वर्षे दुष्काळ पडल्यामुळे आपल्या माता–पित्याचे पोट भरण्यासाठी तो चोऱ्या करू लागला. एकदा सप्त ऋषी रस्त्यातून जात असताना त्याने त्यांना अडवून धमकावले. तेव्हा सप्त ऋषींनी त्यास विचारले की तू तुझ्या घरच्या लोकांसाठी जे पाप करीत आहेस, त्याचे ते भागीदार होतील का? घरी जाऊन त्याने कुटुंबीयांना जेव्हा तसे विचारले, तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यानंतर तीव्र पश्चात्ताप झालेल्या लोहजंघ याला सप्त ऋषींनी जटाघोत हा अद्भूत मंत्र दिला. लोहजंघ ध्यानमग्न होऊन त्याचा अहोरात्र जप करू लागला. त्याच्या अंगावर वारूळ चढले तरी त्यास त्याचे भान नव्हते. काही काळाने ते सप्त ऋषी तेथून परतत असताना त्यांना त्या वारूळातून जटाघोत मंत्राचा ध्वनी ऐकू आला. त्यावेळी त्यांनी त्यातून लोहजंघास बाहेर काढले. त्या तपस्येने त्याला सिद्धी प्राप्त झाली होती. लोकप्रिय कथेनुसार, वाल्मिकींचे मूळचे नाव वाल्या कोळी असे होते. त्यास भिल्लीणीने वाढवले होते. नारदाने त्याला रामनामाचा जप करण्यास सांगितले होते. त्यामुळे वाल्याचे वाल्मिकी झाले. तमसा नदीच्या किनारी त्यांचा आश्रम होता. एकदा तेथे त्यांच्या भेटीस आलेल्या नारद मुनींना त्यांनी पृथ्वीवर आदर्श पुरूष कोण आहे असे विचारले. तेव्हा नारदाने त्यांना रामकथा सांगितली. या कथेतून त्यांनी महाकाव्याची रचना केली.
जळगाव जिल्ह्यातील वालझिरी ही महर्षी वाल्मिकी यांची तपोभूमी व जन्मस्थान मानली गेली आहे. येथे एक प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. याच मंदिर परिसरात असलेल्या कुंडात वाल्मिकी ऋषी पाणी पिण्यासाठी येत असत, अशी अख्यायिका आहे. गायमुखी नदीच्या तीरावरील या मंदिर परिसरात मोठा वाहनतळ आहे. तेथून मंदिराकडे येण्यासाठी असलेल्या मार्गावर पुजासाहित्य व प्रसादविक्रीची अनेक दुकाने आहेत. मंदिरासमोर अर्धगोलाकार अशी मोठी पत्र्याची शेड आहे. या शेडमधून पुढे आल्यावर एक प्राचीन वटवृक्ष दिसतो. असे सांगितले जाते की या वटवृक्षाखाली वाल्मिकी ऋषी तपश्चर्या करण्यासाठी बसत असत. या वटवृक्षाशेजारी वाल्मिकी ऋषींचे मंदिर आहे. या मंदिरातील एका अधिष्ठानावर वाल्मिकी ऋषींची मूर्ती व मूर्तीसमोर पादुका आहेत.
वाल्मिकी मंदिराच्या शेजारी वाल्मिकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. येथील महादेवाचे स्थान हे वाल्मिकींच्या जन्माआधीचे म्हणजे त्रेतायुगातील असल्याचे सांगितले जाते. हे येथील मूळ स्थान असल्याची मान्यता आहे. या मंदिराच्या खालच्या बाजुला एक गोमुख कुंड आहे. या कुंडात उतरण्यासाठी चारही बाजुने दगडी पायऱ्या आहेत. गोमुखातून या कुंडात येणारे हे पाणी पवित्र मानले जाते. या पाण्यात स्नान केल्याने अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसपूर्तीनंतर येथे धातुचे वा लाकडी पाळणे तसेच घंटा देण्याची पद्धत आहे. सोमवती अमावस्या, ऋषिपंचमी, महाशिवरात्री या पर्वणीच्या काळात येथे भाविकांची गर्दी असते. या दोन मंदिरांशिवाय या परिसरात श्रीराम, हनुमान, विठ्ठल–रखुमाई, श्रीदत्त व नवनाथ यांची मंदिरे आहेत.