श्री क्षेत्र उनपदेव

अडावद, ता. चोपडा, जि. जळगाव

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या तालुक्यातील अडावद गावाजवळील निसर्गसौंदर्याने नटलेले उनपदेव क्षेत्र हे येथील गरम पाण्याच्या कुंडामुळे प्रसिद्ध आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला जैवविविधतेने नटलेल्या या भागात विविध वनौषधी आहेत. अशी मान्यता आहे की शरभंग ऋषींच्या पुण्याईमुळे त्यांची भेट घेण्यासाठी प्रत्यक्ष श्रीराम, लक्ष्मण सीतेसह या स्थानावर आले होते. त्यामुळे पावन झालेल्या या भूमीवरील तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येथे येत असतात

या स्थानाबद्दल असे सांगितले जाते की उनपदेव परिसरात सध्या जेथे गरम पाण्याचे कुंड गुंफा आहे तेथे पूर्वी शरभंग ऋषींचा आश्रम होता. ऋषींच्या शरीरात छिद्रे पडून त्यातून रक्त पू येत असल्याने दुर्गंधी येत असे. आपल्या वनवासकाळात लक्ष्मण सीतेसह श्रीराम एकदा त्यांच्या आश्रमाजवळ आले. शरभंग ऋषींच्या इच्छेनुसार त्यांनी दोन दिवस येथे वास्तव्य केले. शरभंग ऋषींचा आजार बरा व्हावा, यासाठी श्रीरामांनी येथे अग्निबाण मारून गरम पाण्याचा झरा तयार केला. या कुंडात स्नान केल्यानंतर शरभंग ऋषींच्या सर्व व्याधी बऱ्या झाल्या. येथील वास्तव्याच्या काळात महादेवांच्या नित्यपूजेत खंड पडू नये यासाठी श्रीरामांनी शिवलिंगाचीही स्थापना केली. कुंडाशेजारी असलेल्या महादेवाच्या मंदिरातील शिवलिंग हेच श्रीरामांनी स्थापन केल्याची भाविकांची श्रद्धा आहे

वाहनतळापासून उनपदेव येथील कुंडापर्यंत सुमारे एक किमी अंतर पायी यावे लागते. आजुबाजुला असलेल्या मोठमोठ्या वृक्षांमधून येथे येण्यासाठी पेव्हरब्लॉक आच्छादित रस्ता काही ठिकाणी पायरी मार्ग आहे. यावल वनविभागातर्फे या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा शोभेची फुलझाडे आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरणसंदर्भातील संदेश देणारे फलकही येथे लावण्यात आलेले आहेत.

या ठिकाणी असलेल्या मंदिर समुहाभोवती असलेल्या आवारभिंतीत एक प्रवेश कमान आहे. प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी सर्वत्र मोठमोठी झाडे असल्यामुळे हा परिसर शांत सुंदर भासतो. प्रवेशकमानीच्या समोरील बाजूस गरम पाण्याचे मोठे चौकोनी कुंड आहे. काही पायऱ्या उतरून या कुंडात जाता येते. एका गोमुखातून सतत या कुंडात गरम पाणी पडत असते. गोमुखातून येणारी ही धार अखंड सुरू असते. कोणत्याही ऋतूत त्यात कधीही खंड पडत नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या पाण्यात स्नान केल्यामुळे शरीराच्या अनेक व्याधी बऱ्या होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे

या कुंडाच्या वरील बाजूस पंचमुखी महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बाहेरील बाजूला एका चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. फारशी कलाकुसर नसलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला देवळ्यांसारख्या रचनेत मोठी ओम अक्षरे आहेत. मंदिरात मध्यभागी असलेल्या शिवपिंडीला पितळी पत्र्याचे आवरण आहे. पिंडीवर छत्र धरणारा नाग त्यावर जलाभिषेक पात्र आहे. हे मंदिर भाविकांमध्ये उनपदेव महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. महादेव मंदिरापासून काही अंतरावर गरम पाण्याच्या कुंडाच्या शेजारी शरभंग ऋषीं जेथे बसून तपस्या करीत असत ती अखंड पाषाणात कोरलेली रामायणकालीन गुंफा आहे. त्यात महादेवाची पिंडी काही स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत. या गुंफेतून एका वेळेस केवळ एकच व्यक्ती आत किंवा बाहेर जाऊ शकते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या गुंफेत केलेले नवस पूर्ण होतात

याशिवाय या परिसरात गणपती, श्रीदत्त, हनुमान, विठ्ठलरुख्मिणी यांची लहान लहान मंदिरे काही देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. येथे स्वातंत्र्यपूर्वकाळात, १९४३ साली उभारलेली एक तीन मजली धर्मशाळा आहे. उनपदेव येथे संपूर्ण पौष महिन्यात यात्रोत्सव असतो. यावेळी जिल्ह्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात

उपयुक्त माहिती

  • चोपडा शहरापासून १६ किमी, तर जळगाव येथून ४० किमी अंतरावर
  • चोपडा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे मात्र निवासाची नाही
Back To Home