अत्रि म्हणजे त्रिगुणातीत भाव व अन् असूया म्हणजे निर्मत्सर वृत्ती यांच्यापासून ज्ञानाचा जन्म होतो. म्हणूनच दत्तात्रेय म्हणजे मूर्तिमंत ज्ञान समजले जाते व त्यामुळेच दत्तावतार हा परमेश्वराचा चिरकालाचा अवतार मानला जातो. यास अविनाश अवतार असेही म्हणतात. गोव्यात दत्तावताराची उपासना सोळाव्या शतकापासून चालत आलेली आहे. सांखळी या गावातील दत्तमंदिर ही याच उपासना परंपरेतील एक प्राचीन कडी होय. ‘गोमंतकातील गाणगापूर’ म्हणून ख्याती असलेल्या या स्थानी भक्ताच्या भेटीसाठी साक्षात् दत्त महाराज आले होते अशी आख्यायिका आहे.
धर्मांध पोर्तुगीजांनी १५१० मध्ये गोव्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी येथील हिंदू व मुस्लिम धर्मीयांवर अनन्वित अत्याचार केले. मंदिरे, तसेच मशिदी पाडून अनेकांचे सक्तीने धर्मांतर केले. पोर्तुगीज राजवटीत ‘अर्काइव्ह’ विभागाचे संचालक असलेले इतिहासाचार्य डॉ. पांडुरंगबाब सखाराम शेणवी पिसुर्लेकर यांनी, तिसवाडी, सासष्टी आणि बारदेश या प्रांतातील पोर्तुगीजांनी १५४० ते १५६७ या काळात उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची समग्र यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात दत्तात्रेयाच्या एकाही मंदिराचा समावेश नाही. पोर्तुगीजांनी सासष्टीतील देवालयांचा १५६७मध्ये विध्वंस केला. त्यानंतर त्यांनी देवालये बांधण्यास बंदी घातली होती. मात्र यानंतरही सासष्टीतील केळोशी येथे दत्तमंदिर असल्याचा एक उल्लेख पोर्तुगीज दप्तरात आहे. ‘केळोशी या सासष्टीतील गावात आंबसेत नामक शेत आहे. ते म्हाळू शेणवी याने दत्तात्रेयाच्या देवालयास दिले होते’, अशी ती नोंद आहे. त्या पत्रावर १ सप्टेंबर १५८३ अशी तारीख आहे.
गोव्यामधील दत्तोपासनेची ती एक महत्त्वाची नोंद आहे. इ.स. १५६९च्या सुमारास गोवा बेटातील जेसुईटांनी काही मराठी धार्मिक ग्रंथांचे पोर्तुगीज भाषेत संक्षेप केला होता. ‘योगराज टिळक’ हा त्यातील एक ग्रंथ होता. या ग्रंथास दत्तात्रेयाचा ग्रंथ असे म्हटले जाते. यानंतरच्या शतकांमध्ये गोमंतकात दत्त उपासनेचा मोठा प्रसार झाल्याचे मत ‘देवभूमी गोमंतक’ या ग्रंथात मंदिर अभ्यासक विनायक नारायण शेणवी धुमे यांनी मांडले आहे.
साखळी येथे १८८१-८२ मध्ये दत्त मंदिराचे बांधकाम सुरू झाले. शेणवी धुमे यांच्या ग्रंथानुसार, ५ एप्रिल १८८२ (चैत्र वद्य द्वितीया, शके १८०४) रोजी येथे दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराविषयी आख्यायिका अशी की साखळी येथे त्या काळी म्हाळू कामत नावाचे एक विठ्ठलभक्त राहात असत. त्यांनी पंढरपूर येथे एक तप वास्तव्य केले होते. त्यांचे पुत्र लक्ष्मण म्हाळू कामत हे दत्तभक्त होते. दरवर्षी ते नरसोबाची वाडी येथे जाऊन गुरूचरित्राचे पारायण करीत असत. ते गौड सारस्वत जातीचे असल्यामुळे नरसोबाची वाडी येथील काही लोक त्यांचा वेळोवेळी अपमान करीत असत. त्यांच्या भजन-पूजनादी सेवेत विनाकारण व्यत्यय आणून त्यांना त्रास देत असत. तरीही दत्तभक्त कामत यांनी आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही.
एकदा ते वाडीतील देवालयाच्या ओवरीत गुरूचरित्राचे वाचन करीत बसले असता, अन्य काही दत्तभक्तांनी विनाकारण अद्वातद्वा बोलून त्यांचा असह्य असा अपमान केला. त्यामुळे दुःखी झालेल्या कामत यांना रडू कोसळले. त्यांच्या मुखातून अभावितपणे शब्द आले की ‘हे दयाघना गुरूमहाराजा, तू सर्वज्ञ आहेस. आजचा माझा अपमान हा मी तुझाच अपमान समजतो.’ यानंतर त्याच रात्री त्यांना दत्तगुरूंचा स्वप्नदृष्टान्त झाला. त्यात दत्तगुरुंनी त्यांना सांगितले की ‘तू चिंता करू नकोस. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. लवकरच मी तुझ्या गावी येईन.’
याच सुमारास सांखळी येथील मथुराबाई येसू बोडके या स्त्रीने आपल्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ, कुलपुरोहित रामेश्वर भट्ट पित्रे यांच्याकरवी औंदुबर वृक्षाचे विधिपूर्वक रोपण केले. पूर्वी या जागेत स्मशानभूमी होती. कालांतराने त्या वृक्षाभोवती पार बांधावा, असे ठरले. त्याकरीता मथुराबाईने दिलेले पैसे अपुरे पडल्याने लक्ष्मण कामत यांनी उरलेले पैसे दिले. त्या पारासाठी पाया खोदताना तेथे सोन्याचा नाग, चांदीच्या पादुकांचा जोड आणि मारुती व गणेशाची मूर्ती सापडली. हा सोन्याचा नाग भटजींनी नेला. पादुकांचा जोड देवासान्निध्य ठेवण्यात आला आणि मारुती व गणेश मूर्ती भग्न झालेल्या असल्यामुळे त्या नदीत विसर्जित करण्यात आल्या.
या पाराचे बांधकाम अश्विन कृष्ण द्वादशी, शके १८०१ (इ.स. १८७९) रोजी झाले. नंतर लक्ष्मण कामत व अन्य ग्रामस्थांनी वर्गणी काढून या पाराच्या शेजारीच गर्भागाराचे बांधकाम केले. बोरी येथील शिल्पकाराकडून आणलेली एकमुखी दत्ताची काळ्या पाषाणातील कुर्मासनस्थ मूर्ती येथे प्रतिष्ठापित करण्यात आली. यानंतर येथे दत्ताचे मोठे मंदिर बांधावे, असे ग्रामस्थांनी ठरवले. या काळात लक्ष्मण कामत यांचे बंधू वासू कामत यांना एकदा स्वप्नदृष्टान्त झाला. त्यात एक संन्यासी त्यांना म्हणाला की ‘सह्यपर्वत ओलांडून आल्यामुळे मी थकलो आहे. मला विश्रांतीसाठी निवांत जागा दाखव.’ त्यावर वासू कामत यांनी त्या संन्याशास, ‘येथील ब्राह्मणांच्या घरी आपली सोय होईल’, असे सांगितले. परंतु संन्याशाने त्याला नकार दिला व त्याने औंदुबराच्या पाराजवळची जागा निवडली. तेथे तो झरझर चालत गेला व तेथे जाताच अदृश्य झाला. ही स्वप्नकहाणी वासू कामत यांनी लक्ष्मण कामत यांना सांगितली. त्यावर हा संन्यासी म्हणजेच दत्त महाराज असल्याचे जाणून लक्ष्मण कामत म्हणाले की ‘देवालयाची जागा दत्तमहाराजांनी पसंत केली आहे.’ यानंतर या ठिकाणी दत्ताचे भव्य मंदिर उभारण्यात आले. या बांधकामाच्या वेळी एकदा लाकूड सामानाची अडचण निर्माण झाली.
तेव्हा गोव्याचे तत्कालिन पोर्तुगीज गव्हर्नर जनरल राफायेल आंद्रादी यांनी, देवालयास ३०-४० झाडे देण्याचा हुकूम जंगल अधिकाऱ्यांना केला व ही समस्या दूर केली. या मंदिरातील लाकूडकाम बांदिवडे गावातील पांडुरंगजी नामक सुताराने केले. मंदिराच्या बांधकामास त्या काळी साडेआठ हजार रूपये खर्च झाला. या देवालयासाठी मुंबईहून शुभ्र संगमरवरी पाषाणाची नवी मूर्ती आणण्यात आली. चित्रभानू संवत्सर, शके १८०४, चैत्र शुक्ल पौर्णिमेपासून चैत्र वद्य द्वितीयेपर्यंत या मंदिराच्या स्थापनाकार्याचा सोहळा झाला. यावेळी येथे दत्तमूर्तीबरोबरच श्रीपादुकांची, तसेच परिवार देवता म्हणून गणपती, मारूती व अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
म्हापसा-डिचोली रस्त्यावर दत्तवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या परिसरात दत्तात्रेयाचे हे मंदिर वसले आहे. परिसरास महिरपी कमान असलेले मोठे प्रवेशद्वार आहे. येथून पुढे येताच समोर एक छोटे चौकोनाकार कुंड आहे. त्यात दत्तगुरुंच्या पादुकांना नमन करणारी कपिला गाय तसेच श्वानांची शिल्पे आहेत. दत्तगुरूंसोबत असलेली गाय ही पृथ्वीचे, तर श्वान हे वेदांचे प्रतीक मानले जातात.
दत्त मंदिराच्या शताब्दी महोत्सवाच्या स्मृतीनिमित्ताने हे स्मारक शिल्प उभारण्यात आले आहे. याची कल्पना ‘बाकीबाब’ म्हणून ओळखले जाणारे कवीवर्य बा. भ. बोरकर यांची असल्याचे सांगण्यात येते.
या स्मारकशिल्पाच्या नजीक छोटासा दीपस्तंभ आहे. त्यासमोर दत्तात्रेयाचे भव्य मंदिर उभे आहे. खुल्या प्रकारचा, उतरते कौलारू छप्पर असलेला प्रशस्त सभामंडप, दोन मोठे अर्धमंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या छताकडील भागावर दत्तगुरूंच्या चरित्रातील अनेक कृष्ण-धवल चित्रे लावलेली आहेत. येथून मंदिराच्या मुख्य अर्धमंडपात प्रवेश होतो. अर्धमंडपाच्या कमानदार प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दत्तगुरूंचे तपस्वी वेशातील सुंदर चित्र लावलेले आहे. या अर्धमंडपास संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत. छतावर सुंदर झुंबर आहे. यापुढे आणखी एक मोठा अर्धमंडप आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या उत्तरांग भागात मध्यभागी दत्तगुरूंची त्रिमुखी मूर्ती व त्यावर कीर्तिमुख आहे. अर्धमंडपाच्या मध्ये रुंद गोल स्तंभरांग असून हे स्तंभ मोठ्या कमानीने एकमेकांस जोडलेले आहेत. येथेच एका बाजूस दत्तगुरूंची पालखी ठेवलेली आहे. छतास मोठी पितळी घंटा, तसेच अनेक काचेच्या हंड्या टांगलेल्या आहेत.
गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवरील देवळ्यांत गणेश आणि शंकराची मूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार कोरीव नक्षीकामाने सुशोभित आहे. द्वारस्तंभांच्या खालच्या बाजूला द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, तर ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. त्यावरील भागात कीर्तिमुख आहे. आत उंच चौथऱ्यावर संगमरवरी पाषाणात घडवलेली त्रिमुखी दत्तात्रेयाची मूर्ती विराजमान आहे. या मंदिराची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथे अर्धमंडपास डावीकडील आणि उजवीकडील प्रवेशद्वारावर मुखमंडप आहे. त्यावर चारहा दिशांनी उतरत्या छपराचे मोठे शिखर आहे. मंदिराच्या गर्भगृहावर त्रिस्तरीय चौकोनाकार इमारतीसारखी शिखररचना आहे. त्यावर चारही दिशांनी उतरते कौलारू छप्पर व त्यावर कलश आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस औदुंबराचा मोठा पार बांधलेला आहे.
दत्तात्रेयाच्या या मंदिरात रामनवमी, नृसिंह सरस्वती जयंती, विजयादशमी, अश्विन वद्य १२ रोजी गुरूद्वादशी, कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा आदी उत्सव अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. येथे उत्सव प्रसंगी आणि प्रत्येक पौर्णिमेस शिबिकोत्सव होत असतो. या उत्सवात रात्री साडेदहा वाजता देवाची पालखी मिरवणुक काढण्यात येते. येथे गुरूद्वादशी, गुरुप्रतिपदा, दत्तजयंती आणि मंदिराचा वर्धापन दिन या दिवशी रौप्य शिबिकेतून, तर अन्य उत्सवांत काष्ठ शिबिकेतून देवमूर्तीची मिरवणूक काढण्यात येते. दत्त जयंती हा येथील सर्वांत मोठा उत्सव होय. मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीपासून या महोत्सवास प्रारंभ होतो. पौर्णिमेपर्यंत येथे रोज रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होता. पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास दत्त जन्माचा सोहळा होतो. या उत्सवानिमित्ताने येथे लळीतासारखे सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे केले जातात. गोव्यासोबतच कारवार व कोकणातील हजारो भाविक या उत्सवात सहभागी होतात.