मार्तंड देवस्थान (खंडोबा)

जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे

‘जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार। मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर।।’ अशा शब्दांत तेराव्या शतकातील संत नरहरी सोनार यांनी ज्याची महती गायली ते देवस्थान म्हणजे पुण्याजवळील जेजुरी येथील श्री मार्तंड देवस्थान होय. हे संपूर्ण महाराष्ट्राचे एक महत्त्वपूर्ण आणि जागृत श्रद्धास्थान मानले जाते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने निनादणारा हा परिसर भंडाऱ्याच्या उधळणीमुळे सोन्यासारखा पिवळाधमक दिसतो. बहुजन समाजाचे आणि अनेक वीर घराण्यांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक या गडावर येतात. विवाहानंतर वधू-वरांनी एकत्र येऊन येथील भंडारा कपाळी लावण्याची, तसेच नव्या नवरीला उचलून घेत नवरदेवाने जेजुरी गडाच्या काही पायऱ्या चढून जाण्याची प्रथा आजही येथे पाळली जाते.

आठव्या शतकापासून या मंदिराचे अस्तित्व असल्याचे विविध ऐतिहासिक संदर्भांतून स्पष्ट होते. इसवी सन १२४८ मध्ये वीरपाल आणि वीरमल्ल नावाच्या राजांनी जेजुरी गडाचे मजबुतीकरण केल्याचा उल्लेख एका प्राचीन शिलालेखात आढळतो. मुख्य मंदिराच्या सभामंडपाबाहेर असलेला हा ऐतिहासिक शिलालेख काळाच्या ओघात आता वाचता येत नाही. सोळाव्या आणि सतराव्या शतकाच्या दरम्यान मंदिराचा मोठा विस्तार झाला व येथे अनेक नवीन बांधकामे झाली. सन १६०८ मध्ये मुख्य मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर सन १७१२ मध्ये येथे नवीन मंदिराची उभारणी करण्यात आली. मराठेशाहीच्या काळात या मंदिराला विशेष राजाश्रय मिळाला होता. थोरले बाजीराव पेशवे तसेच चिमाजी अप्पा यांनी या मंदिराच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. विशेषतः चिमाजी अप्पांनी वसईच्या मोहिमेत पोर्तुगीजांकडून मिळवलेल्या मोठ्या घंटा येथे अर्पण केल्या. जेजुरीच्या आधुनिक स्वरूपाचे मुख्य श्रेय होळकर घराण्याला जाते. मल्हारराव होळकर हे खंडोबाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी सन १७४२ मध्ये मंदिरात भव्य दगडी स्तंभ उभारले व सन १७७० पर्यंत गडाभोवतीची मजबूत तटबंदी तसेच पाण्याच्या तलावांचे काम पूर्ण केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या क्षेत्राचा सर्वांगीण विकास केला. ऐतिहासिक होळकर तलाव, विस्तीर्ण चिंचेची बाग तसेच चिलावती कुंड यांसारख्या वास्तू आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतात.

पौराणिक संदर्भांनुसार, खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो. मार्तंड भैरव तसेच मल्हारी या नावांनी ओळखले जाणारे हे दैवत मणी-मल्ल या दोन राक्षसांच्या वधासाठी अवतरले होते. मणी आणि मल्ल या दैत्यांनी ब्रह्मदेवाकडून वर मिळवून पृथ्वीवर मोठा उत्पात माजवला होता. या राक्षसांच्या जाचातून ऋषीमुनींची मुक्तता करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप धारण केले. हळदीने माखलेले सुवर्णासारखे शरीर आणि हातात खंडा नावाचे शस्त्र घेतलेल्या या रूपाने राक्षसांशी सहा दिवस घनघोर युद्ध केले. युद्धाच्या अखेरीस मणी राक्षसाने पश्चात्ताप व्यक्त करत आपला पांढरा घोडा खंडोबाला अर्पण केला व खंडोबाने त्याला आपल्या चरणापाशी कायमचे स्थान दिले. आजही मंदिराच्या मुख्य गर्भगृहात खंडोबाच्या पायाखाली मणीचे शिर कोरलेले दिसते. मात्र गर्विष्ठ मल्ल राक्षसाचा खंडोबाने शिरच्छेद केला आणि या विजयाच्या स्मृत्यर्थ ‘येळकोट’ म्हणजेच एक कोटी देवांचा नायक असा जयघोष सुरू झाला.

खंडोबाच्या दोन प्रमुख पत्नींमध्ये म्हाळसा देवी ही आदिशक्ती पार्वतीचा अवतार मानली जाते. ती नेवासे येथील एका व्यापाऱ्याची कन्या म्हणून जन्माला आली होती. दुसरी पत्नी बाणाई ही धनगर समाजातील आहे. ती प्रत्यक्ष इंद्राची कन्या असून पृथ्वीवर एका धनगराच्या घरी लहानाची मोठी झाली होती. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाने राक्षसाचा वध केल्यामुळे या दिवसाला ‘मल्हारी नवरात्र’ म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या काळात सातत्याने होणारा भंडाऱ्याचा वर्षाव खंडोबाच्या विजयोत्सवाचे प्रतीक आहे.

सह्याद्रीच्या उपरांगांमध्ये ७१८ मीटर उंचीवर स्थित असलेला हा गड निसर्गसमृद्ध परिसरात आहे. गडावर येण्यासाठी प्रामुख्याने तीन मार्ग उपलब्ध आहेत. त्यापैकी उत्तर दिशेकडील पायरी मार्ग सर्वात रहदारीचा व सोयीचा मानला जातो. पायरी मार्गाच्या सुरुवातीला मंदिराचे महाद्वार आहे. हे किल्लेवजा प्रवेशद्वार सुमारे पन्नास फूट उंच आहे आणि प्रवेशद्वारात दोन्ही बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. येथेच नंदीमंडप आहे व येथे भंडारा वाहून भाविक आपली गडयात्रा सुरू करतात. येथील पहिल्या पायरीवर नवविवाहित पतीने आपल्या नववधूला खांद्यावर उचलून पाच पायऱ्या चढाव्यात, असा रिवाज आहे. त्यामुळे येथील पहिल्या पाच पायऱ्यांना मानाच्या पायऱ्या म्हणतात. गडावर पोहोचण्यासाठी एकूण ३८५ पायऱ्या चढून यावे लागते. लोकसाहित्यात व लोकगीतांमध्ये या पायऱ्यांचा उल्लेख ‘नऊ लाख पायरी’ असा केला जातो. हा उल्लेख कदाचित पायऱ्यांसाठी वापरलेल्या दगडांच्या संख्येवरून झाला असावा. पायऱ्यांसमोर अनेक प्राचीन दीपमाळा आहेत. प्राचीन काळी नवस केलेल्या सरदार, जहागीरदार, सावकार घराण्यांनी या दीपमाळा बांधल्या असल्याचे सांगितले जाते. इथून काही पायऱ्या चढून आल्यावर उजव्या बाजूला खंडोबाच्या घोड्याची पाग आहे. खंडोबाच्या पालखीपुढे नाचणारा घोडा येथे ठेवला जातो. या घोड्याच्या देखभालीचा मान वंशपरंपरेने खान कुटुंबाकडे आहे. येथून आणखी काही पायऱ्या चढून वर आल्यावर खंडोबाभक्त स्वातंत्र्यसेनानी उमाजी नाईक यांचा पूर्णाकृती सशस्त्र पुतळा आहे. पायरी मार्गावर एका ठिकाणी प्राचीन देवळीत वीरभद्र देवतेची मूर्ती आहे.

पायऱ्यांच्या बाजूला एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व शहाजी राजे यांच्या भेटीच्या प्रसंगाचे शिल्प आहे. जेजुरी गडावर हा ऐतिहासिक प्रसंग घडला होता, असे सांगितले जाते. पायरी मार्गाच्या मध्यावर पोहोचल्यावर उजव्या बाजूला बाणाईचे प्राचीन मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहात बाणाईची पाषाणी मूर्ती आहे. मंदिरासमोर मेंढरांची पाषाणशिल्पे आहेत. नवस पूर्ण झाल्यावर भाविक मेंढरांची शिल्पे येथे अर्पण करतात. या मंदिराजवळ मल्हारराव होळकर यांनी शके १६१७ म्हणजे इ.स. १६९५ साली कोरलेला शिलालेख आहे. बाणाईच्या भेटीसाठी खंडोबा आजही मध्यरात्रीनंतर येथे येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आणखी काही पायऱ्या चढून आल्यावर खंडोबाचे सेनापती हेगडी प्रधान यांचे मंदिर आहे. हेगडी प्रधान खंडोबाची पट्टराणी म्हाळसादेवी हिचे भाऊ असले तरी ते खंडोबाचे भक्त होते. मंदिरात वज्रपीठावर हेगडी प्रधान यांची पाषाणी मूर्ती आहे. या मंदिराच्या शेजारी काही अंतरावर उंच चौथऱ्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. येथून आणखी काही पायऱ्या चढून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचता येते. प्रवेशद्वाराच्या बाजूला यशवंतराव यांचे शिल्प असलेली लहान देवळी आहे. जेव्हा मोगल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने जेजुरी गडावर आणि मंदिरावर हल्ला केला होता, तेव्हा गडाच्या सुरक्षेसाठी आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी यशवंतरावांनी प्राणांची आहुती दिली. गडाच्या रक्षणासाठी लढताना त्यांना वीरमरण आले, असे मानले जाते.

गडाच्या मुख्य दुमजली प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वारात विविध शिल्पे आहेत आणि आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. येथून गडावरील मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिरास चारही बाजूने भक्कम तटबंदी आहे आणि त्यावर जाण्यासाठी जिने आहेत. तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत. येथे गोंधळ, जागरण व इतर विधी केले जातात. प्रांगणात चार दीपमाळा आहेत. अष्टकोनी चौथऱ्यावर स्थित असलेल्या या विशाल दीपमाळा वर निमूळत्या होत गेल्या असून त्यांच्या शीर्षभागी शिखरे आहेत. दीपमाळांवर देवी-देवता, पशू-पक्षी व फुलांची शिल्पे कोरलेली आहेत. त्रिपुरारी पौर्णिमा व उत्सवांच्या वेळी या दीपमाळा दिवे लावून उजळवल्या जातात. दीपमाळेच्या बाजूला मणी-मल्ल राक्षसांच्या पाषाणी मूर्ती आहेत. बाजूलाच खंडोबाचा बगाड आहे. नवसपूर्तीसाठी भाविक या बगाडावर लटकत असत. आता या प्रथा प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. बगाडमंडपाच्या बाजूला अखंड दिवटी प्रज्वलित असते. देवाच्या दर्शनाला आलेले भाविक दिवटीत तेल घालतात. प्रांगणात विशाल आकाराचे पितळी कासव शिल्प आहे. बाजूला पाषाणी नंदीशिल्प आहे. येथेच बाजूला तळी-भंडारा करण्याचा मंडप आहे. मंदिरासमोर देवाचा खंडा आहे. भाविक हा अवजड खंडा एका हाताने उचलण्याचा प्रयत्न करतात.

पुढे खंडोबाचे मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूला लोखंडी जाळ्यांचे कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन केलेले आहे. यातील एक रांग सशुल्क दर्शन घेण्याची आहे. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. मंदिर सुमारे चार फूट उंच जगतीवर आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारात सहा पायऱ्या आहेत. सभामंडपात समोरील बाजूस चार स्तंभ आहेत आणि स्तंभांवर कमानी आहेत. सभामंडपास डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारातून भाविकांना आत सोडले जाते. प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा आणि ललाटबिंबावर गणपती आहे. सभामंडपात अनेक नक्षीदार पाषाणी स्तंभ व घोड्यावर बसलेल्या खंडोबाची मूर्ती आहे.

पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात मागील भिंतीजवळ मणी-मल्ल दैत्याच्या अंगावर बसलेल्या खंडोबाची पाषाणी चतुर्भुज मूर्ती आहे. समोर खंडोबा-म्हाळसा यांच्या प्रत्येकी दोन मूर्ती आहेत. मूर्तीपुढे जमिनीवर खंडोबा व म्हाळसा यांच्या स्वयंभू पाषाण पिंडी आहेत. गर्भगृहाला लागून डाव्या व उजव्या बाजूला दोन कक्ष आहेत. डाव्या बाजूच्या कक्षात देवाचे शयनगृह आहे. उजव्या बाजूच्या कक्षातील तळघरात खंडोबाचे गुप्त स्थान आहे. सभामंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या चारही बाजूने उरुश्रुंगी प्रकारची अनेक लहान शिखरे आहेत. त्यांच्या शीर्षभागी आमलक व कळस आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे.

खंडोबा मंदिराच्या मागे म्हाळसा देवीचे मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहात म्हाळसा देवीची शिळा स्वरूपातील पाषाण मूर्ती आहे. देवीस पितळी मुखवटा लावलेला आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात देवकोष्टके आहेत. शिखराचा वरील थर घुमटाकार असून त्यावरील स्तूपिकेवर कळस आहे. जेजुरी गडाच्या मागील बाजूस कडेपठार देवस्थान हे खंडोबाचे मूळस्थान आहे. कडेपठारावर जाण्यासाठी पायथ्यापासून सुमारे ७०० पायऱ्या आहेत.

जेजुरी गडावर वर्षभर विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला म्हणजेच सोमवती अमावस्येला येथे सर्वात मोठी जत्रा भरते. या दिवशी खंडोबाची पालखी गडावरून कऱ्हा नदीकडे स्नानासाठी नेली जाते. भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि ‘येळकोट’चा जयघोष करत हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. कऱ्हा नदीच्या पापनाशन तीर्थावर देवाच्या उत्सवमूर्तींना पवित्र स्नान घातले जाते आणि त्यानंतर पालखी पुन्हा गडावर परतते. मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीचा उत्सव सहा दिवस चालतो. या दिवशी देवाला वांग्याचे भरीत तसेच बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो. महाशिवरात्रीला मंदिराच्या कळसातील शिवलिंग आणि तळघरातील गुप्तलिंग दर्शनासाठी उघडले जाते. पौष पौर्णिमेला खंडोबा व म्हाळसादेवीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात साजरा होतो. चैत्र पौर्णिमेला देखील येथे मोठी जत्रा भरते. दसऱ्याच्या दिवशी गडावर तलवार उचलण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. भाविक येथे ‘तळी भरणे’ तसेच ‘जागरण-गोंधळ’ यांसारखे विधी करून आपला नवस पूर्ण करतात.

उपयुक्त माहिती

  • सासवडपासून १९ किमी अंतरावर
  • पुणे शहरापासून ५० किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून जेजुरीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२११५ – २५२५४५ / २५५५४५
Back To Home