पुणेकरांचे एकांतात, निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचे आवडते ठिकाण म्हणजे पर्वती. येथेच पेशवेकालीन श्री देवदेवेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा उल्लेख पर्वती मंदिर असाही करतात. शंकर, पार्वती, विष्णू, विठ्ठल, रुक्मिणी, गणपती यांचीही येथे मंदिरे आहेत. यामध्ये देवदेवेश्वर अर्थात शंकराचे स्थान मुख्य आहे.
देवदेवेश्वर मंदिराच्या उभारणीची एक कथा सांगितली जाते. थोरल्या बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाई यांच्या उजव्या पायाला वेदना होत होत्या. तेव्हा कोणीतरी सांगितले की, पर्वतीच्या डोंगरावर शक्तिस्थान आहे; जे आपल्या वेदना दूर करते. त्यांनी त्या शक्तिस्थानी जाऊन आराधना केल्यानंतर त्यांच्या पायाच्या वेदना दूर झाल्या. तत्पूर्वी वेदना दूर झाल्यास येथेच तुझे भव्य मंदिर बांधेन, असा नवस त्यांनी केला होता.
तोच नवस पुढे काशीबाईंचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी १७४९ मध्ये पर्वती डोंगरावर पर्वताई देवी व देवदेवेश्वराचे मंदिर बांधून पूर्ण केला. पुढील काळात नानासाहेबांची प्रकृती बिघडल्यानंतर ते या मंदिर परिसरात विश्रांती घेण्यासाठी जात असत. मृत्यूनंतर त्यांचे येथे स्मृतिस्थळ बांधण्यात आले.
छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिरासाठी शुद्ध सोन्याच्या तीन मूर्ती दिल्या होत्या. त्यामध्ये शंकराची मूर्ती (७३ किलो), पार्वतीची मूर्ती (१४ किलो) व गणपतीची मूर्ती (आठ किलो) यांचा समावेश होता. २३ एप्रिल १७४९ रोजी देवदेवेश्वर मंदिरामध्ये या मूर्तींची विधियुक्त प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यावर ज्या ज्या वेळी परकीय आक्रमणाची चाहूल लागत असे, त्या त्या वेळी या सुवर्णमूर्ती सिंहगडावर नेल्या जात असत. १० नोव्हेंबर १८१७ रोजी दुसऱ्या बाजीरावांनी पांडुरंग कृष्ण बापट यांच्याबरोबर या मूर्ती सिंहगडावर पाठविल्या. २ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी सिंहगड ताब्यात घेतला. येथील नागरिकांच्या श्रद्धेचा आदर करून इंग्रजांनी या मूर्ती पुन्हा पर्वतीवर पाठविल्या; परंतु १५ जुलै १९३२ रोजी या मूर्ती चोरीस गेल्या. सध्या या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या मूर्ती आहेत.
पर्वतीवर पोहोचण्यासाठी पायथ्यापासून १०३ पायऱ्या आहेत. पेशवाईच्या काळात दळणवळणासाठी हत्तीचा वापर होत असे. त्यांना सहजपणे डोंगरावर चढून जाता यावे, अशा पद्धतीने पायऱ्यांची बांधणी दिसते.
मंदिराचे प्रवेशद्वार संगमरवरी आहे. येथूनच मंदिराचे प्रांगण सुरू होते. त्याला सदर अर्थात स्वागताची जागा, असे म्हटले जाते. येथे देवदेवेश्वर शिवपंचायतन आहे. त्यामध्ये देवदेवेश्वराचे पूर्वाभिमुख मुख्य मंदिर आहे. आग्नेयेस सूर्य मंदिर, नैऋत्येस गणेश मंदिर, वायव्येस देवी मंदिर व ईशान्येस विष्णू मंदिर अशी उपमंदिरे आहेत.
देवदेवेश्वर मंदिराची उंची तब्बल २५ मीटर (साधारणतः आठ मजली इमारतीएवढी) आहे. मंदिराचा पाया आयताकृती; तर शिखर अष्टकोनी आहे. मंदिराच्या शिखराची रचना आणि चारही बाजूंनी उभी असलेली तटबंदी वास्तूच्या भव्यतेत आणखी भर घालते. येथे दक्षिण आणि पश्चिमेकडे वाडे आहेत. ते एकेकाळी श्रीमंत पेशव्यांचे पर्वतीवरील वास्तव्याचे ठिकाण होते, अशी वदंता आहे.
देवदेवेश्वर मंदिरासमोर असलेल्या पाण्याच्या हौदाशेजारीच काळ्या पाषाणातील सुबक नंदी आहे. त्यावर उत्तम कलाकुसर केलेली दिसते. उत्सवप्रसंगी या नंदीवर चांदीचे कवच चढविले जाते. देवदेवेश्वर मंदिराची रचना आणि कळस यांतून येथे राजपूत, मुघल आणि गुजरातबरोबरच महाराष्ट्रीयन शैलीचा सुंदर संगम दिसून येतो. लांबट सभामंडपात रेखीव दगडी खांब आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात सोवळे नेसून प्रवेश दिला जातो. इतर भाविकांना गाभाऱ्याच्या दाराबाहेरून देवदेवेश्वराचे दर्शन घेता येते. येथील शिवपिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंडीवरील बाणावर (लिंग) मानवी मेंदूत वा अक्रोडावर असतात तशा रेषा आहेत. नेपाळमधील गंडकी नदीतील पाषाणातून या शिवलिंगाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते.
शिवलिंगाच्या मागील बाजूला शंकराची साधारण दीड फूट उंच चांदीची मूर्ती आहे. पद्मासनातील या मूर्तीच्या डाव्या मांडीवर पार्वतीची छोटी मूर्ती आणि उजव्या मांडीवर द्विभुज गणेश आहे. २२ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट गाभाऱ्यातील या मूर्तीवर पडतात. या दोन्ही दिवशी दिवस व रात्र बरोबर १२ तासांचे म्हणजे समान असतात.
बाजूला असलेल्या विष्णू मंदिराच्या शिखरावरील नक्षीकाम विलोभनीय आहे. विशेष म्हणजे येथील विष्णूमूर्ती लक्ष्मी यंत्रावर आरूढ आहे आणि असे रूप असलेले हे विष्णूचे एकमेव स्थान असल्याचे सांगितले जाते. विठ्ठलाचे मंदिर या परिसरात कालांतराने उभारण्यात आले. तो मूळ मंदिराच्या रचनेचा भाग नव्हता, असे स्पष्ट होते. भाविकांना सकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत देवदेवेश्वराचे दर्शन घेता येते.