श्री बनेश्वर मंदिर

तळेगाव दाभाडे, पुणे


काही गावांच्या नावातूनच इतिहास डोकावतो. मावळ तालुक्यातील तळेगावही असेच! हे गाव मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून इनामात मिळाले. त्यामुळेच या गावाला ‘तळेगाव दाभाडे’, असे नाव पडले आहे. हे ऐतिहासिक गाव आता शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करीत असले तरी येथील अनेक वास्तू इतिहासाची साक्ष देतात. त्यामध्ये बनेश्वर मंदिर अग्रस्थानी आहे. हे ठिकाण पुण्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे.

मूळ बनेश्वर मंदिर यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. सुमारे ३०० वर्षांपूर्वी या वास्तूचा जीर्णोद्धार सरदार खंडेराव दाभाडे यांनी केला. ते शिवशंकराचे भक्त असल्यामुळे त्यांनी अनेक शिव मंदिरे उभारली. त्यातीलच हे एक मंदिर. मंदिराच्या आजूबाजूला वस्ती असली तरी या वास्तूमध्ये शांतता अनुभवायला मिळते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रांगणात काही समाधीस्थाने नजरेस पडतात. त्यामध्ये मराठा साम्राज्यातील पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्यासह राजघराण्यातील अनेक सदस्यांचा समावेश आहे.

मंदिरासमोर दगडी पुष्करणी आहे आणि त्यात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. त्यांचे बांधकामही साचेबद्ध आहे. या पुष्करणीतील पाणी उपशासाठी मोटेची बांधणी केलेली आढळते. त्यावरून पूर्वी तलावातील पाणी शेती व पिण्यासाठी वापरण्यात येत असावे, अशी शक्यता जाणवते.

तलावाच्या बाजूलाच नंदी मंडप आहे. एकसंध पाषाणातील चार खांबांवरील हा मंडप म्हणजे सूंदर वास्तुकला आहे. येथील नंदीही सुंदर आहे आणि त्याच्यावरील नक्षीकामाला अनुसरून दिलेला सोनेरी रंग त्याच्या सौंदर्यात भर टाकतो. या मंडपाच्या समोरच अत्यंत देखणे मराठा वास्तुशैलीतील बनेश्वराचे मंदिर आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात १६ खांब आहेत. या खांबांवर कोणतेही नक्षीकाम नसले तरी त्यांची रचना लक्षवेधी आहे. छताचे बांधकामही सुंदर आहे. मंदिरात एक नगारा आहे आणि समोरच डाव्या बाजूला श्री गणेशाची; तर उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. याच भागात कोनाड्यात देवीची मूर्ती आहे. तसेच वरच्या बाजूला कोनाड्यात पंचमुखी गणेशमूर्ती आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर सुबक नक्षीकाम आहे. गाभाऱ्याची रचनाही विलोभनीय आहे. शिवपिंडीच्या मागच्या बाजूलाच शंकराची ध्यानस्थ मूर्ती आहे. त्याशिवाय भलामोठा त्रिशूळ पिंडीच्या बाजूलाच ठेवण्यात आला आहे.

मंदिराच्या बाहेर गोरक्षनाथ धुनी आहे. त्याच्या बाजूला आणखी एक शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या मागे शेषनाग आहे. येथे पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांचे लाल दगडात बांधलेले समाधिस्थळ आहे. त्यावर रामायण, महाभारत आणि समकालीन ऐतिहासिक प्रसंग कोरलेले आहेत. हिरवाईमुळे परिसरात नानाविविध पक्ष्यांचा मुक्त विहार असतो व त्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करतो.

बनेश्वराच्या दर्शनासाठी दर सोमवारी भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात भाविकांच्या संख्येत वाढ होते. महाशिवरात्रीलाही भाविक मोठ्या संख्येने महादेवाचे दर्शन घ्यायला येतात. गेली दोन दशके अक्षय तृतीयेच्या दिवशी येथे चंदनउटी सोहळा होतो. यावेळी अनेक किलोचा चंदनाचा लेप महादेवाला लावण्यात येतो. त्यानंतर नित्य आरती होते. परिसरातील भजन मंडळांची सेवाही या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मंदिराबाहेरील फुलांची सजावट अन् विजेची रोषणाई लक्षवेधी असते. हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येतात.

उपयुक्त माहिती:
:

  • पुणेपासून ३४ किमी.; तर तळेगाव रेल्वेस्थानकापासून ३.५ किमी अंतरावर
  • राज्याच्या अनेक भागांतून तळेगावसाठी एसटीची सुविधा
  • पुण्यातून तळेगावसाठी पीएमपीएमएल बस सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येण्याची व्यवस्था
Back To Home