मौर्य काळात शिरोडा हे गाव शिवपूर या नावाने ओळखले जात असे. हे नाव येथील शिवनाथाच्या मंदिरावरून पडले असे सांगण्यात येते. हे मंदिर ज्या परिसरात आहे त्यालाही शिवनाथी असे नामानिधान प्राप्त झालेले आहे. शिवनाथ हे शिरोड्याचे ग्रामदैवत मानले जाते. त्याचे येथील मंदिर दहाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. गोव्याप्रमाणेच महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अनेक शिवभक्त येथे दर्शनासाठी येत असतात. मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी हजारो भक्तगण शिरोडा येथे येतात.
शिवनाथी येथे एका सिद्ध पुरुषाने शिवनाथांचे लिंग स्थापन केल्याचे सांगितले जाते. तेथेच हे मंदिर उभारण्यात आले. या सिद्धपुरुषाच्या पादुका मंदिरासमोर असलेल्या छोट्याशा टेकडीवर स्थापित आहेत. शिवनाथांबरोबरच मंडलेश्वर, रवळनाथ, माधव, महामाया, वीरभद्र, वेताळ, बारो, ब्रह्मदुर्गा, क्षेत्रपाल, खुटी, नारायणदेव, ग्रामपुरुष आणि केळबाय अशा ग्रामदेवतांची स्थापनाही त्यांनी केली. शिरोड्याच्या पंचक्रोशीत असलेल्या या सर्व देवतांचे उत्सव शिवनाथ देवालयाच्या पुढाकाराने होतात. जवळच असलेल्या कामाक्षी मंदिराशीही या मंदिराचे धार्मिक संबध आहेत. गेल्या अनेक शतकांपासून ते पाळले जातात. सोळाव्या शतकात राय गावातून कामाक्षी देवीचे येथे आगमन झाले. त्यावेळी शिवनाथांनी तिचे स्वागत केले होते. या घटनेचे स्मरण म्हणून नवरात्रोत्सवाच्या नवव्या रात्री दसऱ्याच्या आमंत्रणासाठी शिवनाथांचे भक्तगण कामाक्षी मंदिरात जातात.
या मंदिराचा परिसर मोठा आहे. मंदिरासमोर एक पुष्करणी आहे. मुखमंडप, अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप, बंदिस्त महामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात मध्यभागी कासवमूर्ती आहे. अन्य मंदिरांमध्ये जमिनीवर स्थापन केली जाणारी कासवमूर्ती येथे मात्र एका गोलाकार उंच पिठावर स्थापित आहे. सभामंडपातून चार पायऱ्या चढून काहीशा उंचावर असलेल्या दुमजली अर्धमंडपात प्रवेश होतो. येथे देवाच्या उत्सवाच्या वेळी लागणाऱ्या पालखीसह इतर साधने ठेवलेली आहेत. येथून पुढे महामंडप आहे. १९७२ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरीही महामंडपातील लाकडी छत व येथील प्राचीन काष्ठशिल्प कायम ठेवण्यात आलेले आहेत. या काष्ठशिल्पांमध्ये अनेक देवदेवता आहेत. त्याचबरोबर कृष्णलीला तसेच रामायणातील विविध प्रसंगही साकारण्यात आलेले आहेत. महामंडपात मध्यभागी काचेच्या उंच पेटीमध्ये मोठी पितळी समई आहे. गर्भगृहासमोर एका कमी उंचीच्या चौथऱ्यावर नंदी स्थापित आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर लाकडाचे कोरीव काम आहे. दुहेरी द्वारशाखा असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला द्वारपाल मूर्ती व कोरीव नंदी आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी शंकर पार्वतीसोबत बालगणपती आणि बालकार्तिकेय (शिवपरिवार) एकत्रित कोरलेले आहेत. गर्भगृहात जमिनीलगत शिवनाथ महादेवाची पिंडी आहे. पिंडीच्या मागील भिंतीवरील देवकोष्टकात शिवनाथांची मूर्ती आहे. येथील गर्भगृहावर चौकोनी व त्यावर त्रिकोणी आकाराचे शिखर आहे. या शिखराच्या अग्रभागी आमलक व कळस आहे.
आद्य ग्रामदेवतेचा मान असलेल्या या मंदिरात नित्यनेमाने अभिषेक, लघुरुद्र यांसारखे विधी केले जातात.
श्रावण सोमवारी येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कामाक्षी देवीच्या उत्सवाप्रमाणेच शिवनाथच्या वार्षिक जत्रोत्सवातही दिवजा उत्सव हा मुख्य भाग असतो. त्याला शिवनाथांचे भक्त शिवपुनव असे म्हणतात. त्या दिवशी सकाळी शिवनाथ आणि पंचिष्ट देवतांची विधीवत अभिषेक आणि पूजाअर्चा केली जाते. शिरोडा परिसरात असलेले मंडलेश्वर आणि शिवनाथ ही दोन्ही शिवाचीच रुपे मानली जातात. मंडलेश्वराची पूजाअर्चा केली तरी शिवनाथ प्रसन्न होतो आणि शिवनाथाची पूजा केली तरी मंडलेश्वर प्रसन्न होतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी मंडलेश्वराचा उत्सव आणि शिवनाथाचा जत्रोत्सव वेगवेगळा होत असे. शिवनाथाचे मंदिर आणि त्याभोवतीचा परिसर विस्तृत असल्याने मंडलेश्वराचा उत्सवही शिवनाथाच्या जत्रेला जोडण्यात आला आहे. दोन्ही उत्सव एकाच वेळी एकाच ठिकाणी साजरे केले जातात.
मार्गशीर्ष पौर्णिमा ते मार्गशीर्ष कृष्ण पंचमीपर्यंत येथील जत्रोत्सव चालतो. पौर्णिमेला पूजाअर्चा झाल्यावर रात्री शिवनाथाची पालखी संचाराला निघते. मंदिराभोवती संचार झाल्यानंतर पालखी देवळात येते. त्याच सुमारास मंडलेश्वराची पालखी वाजे येथून शिवनाथाच्या मंडपात पोहोचते. पहाटे जत्रेतील नाटक संपल्यावर आणि मंडलेश्वर सांगोड्यावर विराजमान झाल्यावर नौकाविहार सुरू होतो. सकाळ होईपर्यंत हा नौकाविहार सुरू असतो. नौकाविहारानंतर मंडलेश्वर खांद्यावरच्या रथात बसतो. मग मंडलेश्वराचा रथ आणि शिवनाथाची पालखी वाजत-गाजत गावपरिसरात फिरतात. अनेक महत्वाच्या स्थानांना आणि मंदिरांना या पालख्या भेट देतात. पहाटे मंदिरासमोरील तलावात शिवनाथाचा नौकाविहार होतो. नंतर मूर्तीची फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक निघते. दुपारी दिवजोत्सव पार पाडतो. दिविजोत्सव म्हणजे दीपोत्सव. यात सुवासिनी आपल्या हातात दिवा घेऊन देवाला प्रदक्षिणा घालतात. यासाठी अनेक माहेरवाशिणी येथे गर्दी करतात. हा महत्वाचा उत्सव पार पाडल्यावर विविध भक्त शिवनाथाचे दर्शन घ्यायला गर्दी करतात. हा संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असता. या मंदिरात नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्याच्या उत्सवाला शिवनाथाबरोबर शिरोडा परिसरातील कामाक्षी देवीबरोबर इतर देवतांच्या पालख्याही सहभागी होत असतात.