‘वत्सगुल्म माहात्म्य’ या प्राचीन ग्रंथामध्ये १०८ पवित्र तीर्थस्थानांचा समावेश आहे. त्यापैकी एक असलेले ‘कंटकतीर्थ’ म्हणजेच काटा येथील शिवशक्ती मंदिर होय. अकोला जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणाऱ्या पूर्णा नदीची उत्तरवाहिनी उपनदी असलेल्या काटेपूर्णा नदीच्या उगमस्थानानजीक हे मंदिर वसले आहे. शिव आणि शक्तीचे स्थान असलेल्या या मंदिरात कंटकेश्वर महादेवाचे पंचमुखी शिवलिंग विराजमान आहे. हेमाडपंती शैलीतील या प्राचीन मंदिराची स्थापना यादव नृपतींनी केल्याचे सांगण्यात येते. यामुळे धार्मिकतेप्रमाणेच हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे गणले जाते.
वाशीम हे प्राचीन काळी भारतात असलेल्या १६ महाजनपदांपैकी एक होते. त्यास वत्स जनपद असे म्हणत. वत्सगुल्म हे वाशीमचे नाव अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये येते. ही वाकाटकांची राजधानी होती. पौराणिक आख्यायिकेनुसार, हा प्राचीन दंडकारण्याचा भाग होता. येथे वत्सऋषींचा आश्रम होता. त्यांच्या घोर तपश्चर्येने देवांच्या मनातही धडकी भरली. ते सर्व जण येथे जमा झाले व वत्सऋषींच्या आश्रमाच्या परिसरात वास करू लागले. वत्सऋषी हे शंकराचे भक्त होते.
त्यामुळे एकटे शंकर भगवान वत्सऋषींकडे गेले. त्यांची कठोर तपश्चर्या पाहून शंकराच्या नेत्रांमध्ये पाणी आले. त्या अश्रूंनी त्यांच्या पायाखाली असलेली एक कोरडी विहीर भरून गेली आणि त्यातून नदी वाहू लागली. करुणेच्या अश्रूंनी निर्माण झालेली म्हणून या नदीस करुणा असे नाव पडले.
हे करुणातीर्थ म्हणजेच कंटकतीर्थ होय. यानंतर वत्सऋषींच्या विनंतीवरून शंकराने येथे लिंगस्वरूपात निवास केला. त्यावेळी सर्व देव तेथे एकत्र जमा (गुल्म) झाले व त्यांनीही आम्ही या भागात अंशरूपाने निवास करू असे वत्सऋषींना सांगितले. तेव्हापासून या भागास ‘वत्सगुल्मेही पंचकोशी’ असे म्हटले जाऊ लागले. वत्सगुल्म माहात्म्याच्या आठव्या अध्यायात पुढील श्लोकातून ही गोष्ट सांगितलेली आहे – ‘गुल्मत्वेन स्थिता देवा वत्साश्रमपदं प्रति। अतोsस्य चाभवन्नाम वत्सगुल्ममिति प्रभो।।’ वात्सायनाच्या ‘कामसूत्रात’ही वत्सगुल्मचा उल्लेख आहे.
बाराव्या-तेराव्या शतकात या भागावर देवगिरींच्या यादवांचे राज्य होते. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ‘तेथ यदुवंशविलासु। जो सकळकला निवासु। न्यायातें पोषी क्षितिशु। श्रीरामचंद्रु।। ’
अशा शब्दांत ज्यांचा गौरव केला आहे, त्या रामदेवरायांनी शके १२२७ (इ.स. १३०५)मध्ये कंटकतीर्थावरील हे शिवशक्ती मंदिर बांधले. विशेष म्हणजे, इ.स. १२९४मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने वऱ्हाडातील अचलपूर मार्गे जाऊन देवगिरीवर हल्ला केला व रामदेवरायाचा पराभव केला. त्यावेळी त्याने देवगिरीत मोठी लूटमार केली, तसेच रामदेवरायाकडून जबर खंडणी वसूल केली. या पराभवानंतर रामदेवरायाने दिल्लीचे मांडलिकत्व स्वीकारले. अशा परिस्थितीतही, सुमारे दशकभरातच रामदेवरायाने येथे शिवशक्ती मंदिराची उभारणी केली. रामदेवरायाचा करणाधिपती (पंतप्रधान) हेमाद्री उर्फ हेमाडपंत याने लोकप्रिय केलेल्या हेमाडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. या मंदिराच्या स्थापनेचा शक मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या पादतळी कोरलेला आहे.
काटेपूर्णा नदीकिनारी दाट वनराई असलेल्या भागामध्ये उंच स्थानी हे मंदिर वसले आहे. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर नंदीच्या दोन मूर्ती बसवलेल्या आहेत. यातील एक मूर्ती प्राचीन आहे. त्यासमोर लोखंडी त्रिशूळ व पारंपरिक पद्धतीचे तुळशी वृंदावन आहे. त्यापुढे होमकुंड आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेल्या या प्राचीन मंदिराची कालौघात पडझड झाली होती,
त्यामुळे त्याची डागडुजी करण्यात आली आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपावर सिमेंटचा स्लॅब घालण्यात आला आहे, तर अंतराळ व गर्भगृहावर आधुनिक पद्धतीचे शंकूच्या आकाराचे शिखर उभारलेले आहे. मात्र, मंदिराच्या आतील मूळ रचनेस धक्का लावण्यात आलेला नाही.
मंदिराचे प्रवेशद्वार दगडी बांधणीचे आहे. त्याच्या द्वारचौकटीच्या बाजूस कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. आत सभामंडपावर नव्याने बांधलेले सिमेंटचे छत आहे. आत भिंतींमध्ये दगडी अर्धस्तंभ आहेत. या स्तंभांच्या खालील बाजूला असलेले तळखडे चौरसाकृती तर मधला स्तंभभाग अष्टकोनी आहे. यावर नक्षीकाम केलेला हार आणि गोलाकार भागावर कुंभ प्रतीक कोरलेले आहे. येथील देवकोष्टकांत विठ्ठल रुक्मिणीची व धामणगावचे फुरसुंगी महाराज यांची मूर्ती आहे. सभामंडपातील भिंतीवर पितांबर बाबा या सत्पुरुषाचे छायाचित्र लावलेले आहे.
सभामंडपातील दोन स्तंभांच्या मधून अंतराळात प्रवेश होतो. येथे डाव्या बाजूला असलेल्या देवकोष्ठकात गणेशाची जुनी मूर्ती विराजमान आहे.
हेमाडपंती मंदिरातील या देवकोष्ठकात आतून संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत. या मंदिरातील गर्भगृहाचे प्रवेशद्वार हे सुबक कोरीव काम असलेले व मंदिर अभ्यासकांना भुरळ घालणारे आहे. हे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. पत्रशाखा, गंधर्वशाखा, स्तंभशाखा, व्यालशाखा आणि स्वल्पशाखा अशा या पाच शाखा आहेत. त्यातील एकेका चौकटीवर पत्र, गंधर्व याप्रमाणे शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभांच्या खालच्या भागात गंगा, यमुना, चामरधारिणी सेविका यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. द्वारमंडारकावर कीर्तिमुख कोरलेले आहे. त्याच्या दोन्ही बाजूला फुलांची नक्षी आहे. मध्यभागी अर्धचंद्रशिळा, तर ललाटबिंबस्थानी गणेशाची प्रतिमा आहे.
येथील गर्भगृह जमिनीपासून खोल व चौकोनाकार आहे. नऊ पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. येथे मध्यभागी शिवपिंडी आहे. या शिवपिंडीची शाळुंका मोठ्या आकाराची आहे. तिच्या मध्यभागी पंचमुखी लिंग आहे. त्यावर पितळेच्या नागफण्याचे छत्र आहे. त्यावर अभिषेकपात्र आहे. मागील भिंतीवरील देवकोष्ठकात काळ्या पाषाणातील देवीची चतुर्भुज मूर्ती विराजमान आहे. विविध अलंकार परिधान केलेल्या या मूर्तीच्या मस्तकी शिवलिंग कोरलेला मुकुट आहे. तिच्या पायांजवळ दोन्ही बाजूला दोन सेविकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांच्या हातात शस्त्रे आहेत. ही शक्तिदेवता म्हणून ओळखली जाते. याशिवाय गर्भगृहात शंकर-पार्वतीची एक प्राचीन मूर्ती आहे. यात पार्वती ही महादेवाच्या वामांगावर आरूढ आहे. त्यात शंकराच्या पायांजवळ डाव्या बाजूला गणेश, तर उजव्या बाजूला कार्तिकेय आहे. याचप्रमाणे येथे देवीची एक प्राचीन मूर्तीही विराजमान आहे.
मंदिराच्या आवारात चिंतामणी महादेवांचे मंदिर आहे. एक मोठे सभागृहही आहे, त्याचा कार्यक्रमाच्या वेळी वापर केला जातो. त्यात काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे. या परिसरात ब्रह्मकुंड नावाची एक बारव आहे आणि हेच काटेपूर्णा नदीचे उगमस्थान आहे, असे सांगितले जाते.
या मंदिरात रोज पहाटे ४ वाजता कंटकेश्वर महादेवास अभिषेक घातला जातो. येथे सकाळी व सायंकाळी ६ वाजता आरती केली जाते. येथे महाशिवरात्र, तसेच नवरात्र हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते.