शांतादुर्गा ही गोव्यातील एक प्रसिद्ध देवता. ती जशी शांतीची देवता आहे, तशीच ती रक्षणकर्ती देवताही मानली जाते. शांतादुर्गा या स्वरुपात देवीच्या सौम्य व शांत रूपाची पूजा केली जाते. शैव आणि वैष्णव संप्रदाय यांच्यात समेट घडवून आणण्याच्या ऐतिहासिक व धार्मिक कार्यात शांतादुर्गा देवी अवताराचे योगदान मोठे असल्याची कथा आहे. गोव्यात शांतादुर्गेची अनेक भव्य मंदिरे आहेत. त्यातील एक सुप्रसिद्ध मंदिर नानोडामध्ये वसले आहे. येथील देवी कलंगुटवरून स्थलांतर होऊन आल्याने तिला कळंगुटकरीण या नावाने ओळखले जाते.
धर्म-इतिहासानुसार, शांतादुर्गा ही देवी गोव्यात त्रिहोत्रपूर येथून आणण्यात आली. मराठी विश्वकोशानुसार, मिथिला देशाची एकूण १२ नावे होती. त्यातील एक नाव तैरभुक्ती असे होते. त्याचा अपभ्रंश तिहोत्र असा झाला. सध्याच्या बिहार राज्यातील गंगेच्या उत्तरेकडील भागास तिरहूत क्षेत्र असे म्हणतात. येथून काही ब्राह्मणांनी ही देवी गोमंतकात आणली. प्र. कृ. प्रभुदेसाई यांच्या ‘देवीकोश, खंड २’नुसार, कान्यकुब्ज प्रदेशातून (हल्लीचे उत्तर प्रदेशातील कनौज) काही सारस्वत रामेश्वरच्या यात्रेला गेले होते. तेथून परतताना वाटेमध्ये गोव्यात त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि ते येथेच राहिले. देवशर्मा, लोकशर्मा आणि शिवशर्मा हे त्यांतील प्रमुख होते. त्यांनी गोव्यात देवीची स्थापना केली. यानंतर येथे देवीपूजनाची मोठी परंपरा निर्माण झाली.
गोव्यामध्ये शांतादुर्गेच्या नावास उपनामाप्रमाणे ग्रामनाम जोडले जाते. याचे कारण गोमंतकातील पोर्तुगीजांनी केलेल्या धर्मछळाच्या इतिहासात दडले आहे.
२८ फेब्रुवारी १५१० हा या इतिहासातील एक काळा दिवस आहे. विजयनगर साम्राज्याचा दर्यासारंग थिमय्या उर्फ तिमोजा आणि गोव्यातील काही हिंदू पुढारी यांनी येथील आदिलशाही सत्ता हटवण्यासाठी दिलेल्या आमंत्रणावरून पोर्तुगीजांचे आरमार याच दिवशी गोवा बेटाच्या सामुद्रधुनीत अवतरले. याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकले आणि त्यानंतर येथे धार्मिक अत्याचारांचे पर्व सुरू झाले. १५६७ मध्ये साष्टी (सासष्टी) प्रांताचा सुभेदार दियोगु रुद्रिगिश याने त्या प्रांतातील २८० हिंदू मंदिरे, तसेच काही मशिदी पाडल्या. यामुळे तिसवाडी, बार्देश, साष्टी प्रांतातील हिंदूंमध्ये मोठी घबराट पसरली. अनेकांनी आपल्या देव-देवतांसह नजीकच्या आदिलशाही प्रदेशात स्थलांतर केले. यात शांतादुर्गेच्या मूर्तींचाही समावेश होता. तिच्या मूळ ठिकाणाची स्मृती जपण्यासाठी तिच्या नावापुढे ते ग्रामनाम जोडण्यात आले.
यानुसार, नानोड्यातील शांतादुर्गा ही मूळची बार्देश तालुक्यातील म्हापसा जवळच्या कळंगुट येथील आहे. पोर्तुगीजांच्या अत्याचारामुळे तेथील तिचे मंदिर डिचोली तालुक्यातील नानोडा येथे १७व्या शतकात स्थलांतरित करण्यात आले. येथे प्रशस्त भूखंडावर देवीचे हे भव्य देवालय वसले आहे.
एका प्राचीन महाद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. महाद्वाराच्या आत डावीकडे एक छोटे लिंग मंदिर आहे. येथून काही अंतरावर मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय स्थापत्यशैलीतील आधुनिक वास्तू उभी आहे. मंदिरास २०२१ मध्ये जीर्णोद्धार केलेले उंच व रूंद असे मुखद्वार आहे. त्याच्या वरील भागात देवकोष्टकांत मध्यभागी सिंहासनारूढ जगदंबेची शस्त्रधारी, परंतु अभयमुद्रेतील मूर्ती आहे. तिच्या डावीकडे सरस्वतीची आणि उजवीकडे गणेशाची मूर्ती आहे. या तीन देवकोष्ठकांवर तीन शिखरे आहेत, तर मुखद्वारास दोन्ही बाजूंना असलेल्या उपद्वारांवरही शिखरे आहेत. येथे डावीकडील उपद्वाराच्या समोर दोन छोटी तुळशीवृंदावने आहेत. मुखद्वारातच स्थानिक लोकदेवतेची देवळी आहे. मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या प्रकारचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना कक्षासने आहेत. आतील चौकालगत रुंद खांबांची रांग आहे. सभामंडपातील चौकाच्या उजवीकडे ब्राह्मणदेवाचा पाषाण असलेली देवळी आहे. सभामंडपास दोन्ही बाजूंनी उतरते छत आहे. मंदिरास दोन अर्धमंडप आहेत. पहिल्या अर्धमंडपाच्या कमानदार प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात पांढऱ्या शुभ्र रंगातील एक मोठा देव्हारा बसवलेला आहे. त्यात देवीचे सुवर्णपाट असलेले आसन आहे.
गर्भगृहात उंच लाकडी मखरामध्ये देवीची उंच वारुळ स्वरूपातील मूर्ती विराजमान आहे. वारूळावर देवीचा मस्तकी मुकूट धारण केलेला पितळी मुखवटा आहे. या समोर देवीची धातूची सिंहासनारूढ मूर्ती प्रतिष्ठापित आहे. असे सांगण्यात येते की येथील देवीची मूर्ती ही सुमारे ८०० वर्षे जुनी आहे. मंदिराच्या गर्भगृहावर गोव्यातील जुन्या घरांच्या शैलीतील चारही बाजूंनी उतरते असे कौलारू शिखर आहे. मंदिराच्या उजवीकडे गणपतीचे सुबक छोटे मंदिर आहे.
शांतादुर्गा मंदिरात फाल्गुन महिन्यातील शिगमोत्सव हा गोव्यातील लोकप्रिय उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. शिगमोत्सवास येथे शिशिरोत्सव असेही म्हणतात. या दहा दिवसांच्या उत्सवादरम्यान येथे देवीची विविध वाहनांवरून मिरवणूक काढण्यात येते. या उत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. मार्गशिर्ष शुद्ध द्वितीयेला येथे मोठी जत्रा असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. याशिवाय गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, कार्तिक अमावस्या (दिवजोत्सव), राम नवमी, कोजागिरी पौर्णिमा, मकर संक्रांत, तुलसी विवाह, तसेच श्रावणी सोमवार हे सण व उत्सवही येथे साजरे केले जातात. देवीच्या मंदिरात सण व उत्सवांचे दिवस वगळता सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत कौल प्रसाद लावला जातो. ‘श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण देवस्थान’ विश्वस्त मंडळातर्फे मंदिर परिसरात २०२१ साली सभागृह, अग्रहार (भक्त निवास), भोजनगृह बांधण्यात आलेले आहे.