सूर्यकुलातील गुरूनंतरचा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह असलेला शनी हा प्राचीन काळापासून देवता स्वरूपात पुजला जातो. अन्य देवांनी आपल्या पाठीशी राहावे म्हणून लोक त्यांची पूजा करतात. शनी हा एकमेव असा देव आहे, की तो आपल्या राशीला येऊ नये म्हणून लोक त्याची पूजा करतात. कारण शनी ही उग्र देवता आहे. त्याची उपेक्षा करणाऱ्याचे तो हाल करून सोडतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात गावोगावी शनीची मंदिरे आहेत. त्यातीलच एक भव्य असे शनी मंदिर नवी मुंबईतील नेरूळमध्ये स्थित आहे.
शनीचे माहात्म्य वा पूजा यांचा उल्लेख वेद संहितांत किंवा रामायण–महाभारत या महाग्रंथांत नसला, तरी तो उत्तरकालीन ग्रंथांमध्ये येतो. तिसऱ्या ते पाचव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मार्कंडेय पुराणात शनीचा महिमा वर्णन केलेला आहे. त्याच प्रमाणे उत्तरकालीन अग्निपुराणातही त्याचा उल्लेख आहे. मराठीतील ‘शनी माहात्म्य’ ही पोथी अनेक घरांत वाचली जाते. त्यातही शनीचा महिमा वर्णन केलेला आहे. ही पोथी इसवी सनाच्या तेराव्या ते सोळाव्या शतकांदरम्यान होऊन गेलेल्या तात्याजी महिपती या कवीने लिहिली. फलज्योतिषाच्या अनेक ग्रंथांत शनीचे माहात्म्य सांगितलेले आहे. या ग्रंथांनुसार शनी सामान्य लोकांना उपद्रव देऊ लागल्यामुळे त्याला संतुष्ट करण्यासाठी शंकराने त्याला मकर व कुंभ राशींचा स्वामी केले, अशी कथा आहे. तूळ राशीत तो उच्चीचा व मेष राशीत नीचीचा मानतात.
शनीदेवाबाबत ‘स्कंद पुराणा’त अशी कथा आहे की शनी हा सूर्यदेवाचा पुत्र आहे. दक्षकन्या संज्ञा ही सूर्याची पत्नी. तिला सूर्याचे तेज सहन न झाल्याने ती त्याला सोडून दूर गेली. तत्पूर्वी आपल्या तपश्चर्येच्या बळावर तिने आपल्या सावलीस मनुष्यरूप दिले. तिचे नाव छाया. संज्ञाने आपल्या वैवस्वत मनू, यम आणि यमुना या मुलांना छायाच्या स्वाधीन केले. पुढे छायाला सूर्यापासून दोन पुत्र व एक कन्या झाल्या. त्यांची नावे मनु, शनी आणि कन्या भद्रा होय. अन्य एका आख्यायिकेनुसार, छाया ही शिवभक्त होती. शनी तिच्या गर्भात असताना ती तपश्चर्या करीत होती. त्यात ती इतकी तल्लीन झाली होती, की तिने अन्नाचीही पर्वा केली नाही. त्यावेळी तिने केलेल्या तीव्र प्रार्थनेचा गर्भातील अर्भकावर परिणाम झाला व त्याचा रंग काळा झाला. आपला मुलगा असा काळ्या रंगाचा पाहून सूर्याला छायाचा संशय आला. त्याने तिचा अपमान केला. शनीला आपल्या मातेचा अपमान सहन झाला नाही. त्याने अशा संतप्त नजरेने सूर्याकडे पाहिले की त्यामुळे सूर्याचे शरीर जळून काळेठिक्कर पडले व सूर्याच्या रथाचे अश्व थांबले. याचा विश्वसृष्टीवर परिणाम होत असल्याचे पाहून देवांनी शंकराला हाक मारली. शंकराने सूर्याला शनीची माफी मागण्याची सूचना केली. त्यानुसार सूर्याने क्षमायाचना केल्यानंतर शनीने त्याचे पूर्वरूप व अश्वांची शक्ती बहाल केली.
शनी या शब्दाचा अर्थ मंदगतीने चालणारा असा आहे. ‘शनये क्रमतिसः’ म्हणजे मंदगतीने फिरणारा म्हणून तो शनैश्वर. त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास सुमारे ३० वर्षे लागतात. म्हणून त्याला मंद असेही म्हणतात. याशिवाय दशरथकृत ‘शनैश्चर स्तोत्रा’त शनीची कोणान्तक, रौद्र, ब्रभू, कृष्ण, पिंगल, सौरी अशी नावे देण्यात आली आहेत. शनीचे वाहन घोडा असून, कधीकधी घार आणि कबुतर हेही त्याचे वाहन असल्याचे सांगतात. त्याच्या साडेसातीला सर्व लोक घाबरतात.
साडेसाती ही फलज्योतिषातील संकल्पना आहे. शनी एका राशीत साधारणतः अडीच वर्षे राहतो. एखाद्या व्यक्तीला साडेसाती लागते याचा अर्थ असा की शनी त्या व्यक्तीच्या आधीच्या राशीत अडीच वर्षे, त्या व्यक्तीच्या स्वतःच्या राशीत अडीच वर्षे आणि त्याच्या पुढच्या राशीत अडीच वर्षे अशी साडेसात वर्षे प्रभाव गाजवतो. ती कुंडलीत आली की व्यक्तीची दुर्दशा होण्यास वेळ लागत नाही. याबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की रावणासारख्या बलाढ्य राक्षसराजाला साडेसाती लागल्यामुळेच त्याचा वध झाला. ‘शनी माहात्म्या’त तात्याजी महिपती याने उज्जयिनीच्या राजा विक्रमादित्याची कथा सांगितली आहे. त्याला साडेसाती लागल्यामुळे त्याचे हालहाल झाले होते. ही कथा मूळची गुजरातमधील असल्याचे तात्याजी महिपतीने नमूद केले आहे. शनी माहात्म्यात त्याने ‘गुजराथ भाषेची कथा। नवग्रहांची तत्त्वतां।।’ स्पष्ट म्हटलेले आहे.
अशा या शनिदेवाचे मंदिर नेरूळमध्ये आहे. नेरूळ हे नवी मुंबईचे उपनगर आहे. हे शहर स्थापन करणाऱ्या सिडको या संस्थेने येथे विविध धर्मियांना त्यांच्या मंदिरांसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे नेरूळमध्ये विशिष्ट प्रभागांत विविध प्रांतांतील भक्तमंडळींनी स्थापिलेली विविध देवतांची मंदिरे आहेत. येथील मूळच्या कर्नाटकातील मंगळुरू परिसरातील भक्तांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘श्री शनैश्वर सेवा समिती’च्या मार्फत १९९२ मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली. यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने अष्टबंध ब्रह्मकलशोत्सव पार पडला. त्यावेळी श्री क्षेत्र धर्मस्थळाचे धर्माधिकारी डॉ. डी. वीरेंद्र हेगडे यांच्या हस्ते येथील राजगोपुरचे उद्घाटन करण्यात आले.
शनिश्वराचे हे मंदिर मोठ्या भूखंडावर वसले आहे. मंदिराचे बांधकाम द्रविड स्थापत्यशैलीतील आहे. ओवरी, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपातून प्रदक्षिणा मार्ग आहे. येथील ओवरी समोरच्या बाजूने अर्धखुल्या पद्धतीची आहे. ओवरीस समोरच्या बाजूने स्टीलचे गज असलेल्या खिडक्या व मध्यभागी रुंद असे प्रवेशद्वार आहे. त्यावर आकर्षक नक्षीकाम केलेले गोपूर आहे. याच्या खालच्या आडव्या स्तरावर डावीकडील देवकोष्टकात गणेशाची, तर उजवीकडे हनुमानाची मूर्ती आहे. गोपुराच्या वरच्या बाजूला देवकोष्टकात शनिश्वराची आशीर्वादमुद्रेतील मूर्ती आहे. ही मूर्ती निळ्या रंगातील आहे. उंच आसनावर उजव्या पायाच्या गुडघ्यावर डाव्या पायाचा तळवा ठेवलेला अशा प्रकारे बसलेल्या अवस्थेतील ही मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या एका हातात बाण व दुसऱ्या हातात धनुष्य आहे. येथे देवकोष्टकावर मोठे कीर्तिमुख कोरलेले आहे.
ओवरीमध्ये मोठी समई, तसेच तुळशी वृंदावन आहे. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. समोरच शनीचे गर्भगृह आहे. द्रविड पद्धतीनुसार येथे छोटेखानी (तीन पायऱ्या असलेला) सोपान, लाकडी स्तंभ असलेला मुखमंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. या गर्भगृहात मोठ्या चौथऱ्यावर, सोनेरी मखरामध्ये शनीची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. चौथऱ्याच्या खालच्या बाजूला शनीची धातूची छोटी मूर्तीही आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास बारीक नक्षीकाम केलेला चांदीचा पत्रा लावलेला आहे. या गर्भगृहाच्या बाजूला असलेल्या गर्भगृहांत डावीकडे महागणपतीची आणि उजवीकडे हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे. मंदिराच्या उजवीकडेही मोठी ओवरी आहे. तेथे उंच चबुतऱ्यावर नवग्रहांच्या मूर्ती विराजमान आहेत. येथेच मंदिराचे कार्यालय आहे. त्यालगत काहीसा खालच्या बाजूला भव्य असा मंडप आहे. या ठिकाणी विविध धार्मिक उत्सव, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. शनीच्या मंदिरास राजगोपुरातून प्रवेशद्वार असले, तरी काही खास प्रसंगीच ते खुले ठेवले जाते. त्यामुळे बाजूस असलेल्या या मंडपातूनच मंदिरात प्रवेश केला जातो.
या मंदिरात दर शनिवारी दक्षिण भारतीयांप्रमाणेच नेरूळ परिसरातील मराठी भाविकांची मोठी गर्दी असते. येथे शनी जयंती, तसेच महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. येथे गेल्या सुमारे २५ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात रथोत्सवाचे आयोजन केले जाते. नवी मुंबईतील रथोत्सवांपैकी हा एक मोठा उत्सव मानला जातो. नवी मुंबईतील विविध स्तरांतील हजारो भाविक यावेळी शनीदेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. या प्रसंगी संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सुशोभित केला जातो. पहाटे सहा वाजता कवट उद्घाटन व नवक प्रदान हवन या धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवास प्रारंभ होतो. सकाळी ११ वाजता रथारोहण, महापूजा, अन्नसंतर्पण असे कार्यक्रम होतात. त्यानंतर सायंकाळी बली उत्सव व रात्री अवभृत स्नान, महापूजा आणि अन्नप्रसाद असे कार्यक्रम होतात. मंदिर परिसरात देवाची साग्रसंगीत व दक्षिण भारतीय धार्मिक परंपरेने पालखी काढली जाते. या उत्सवात कर्नाटकातील लोककलांचेही सादरीकरण केले जाते. ते पाहण्यासाठी हजारो नागरिक येथे लोटतात. या मंदिरात येल्लू जीप, अर्चना, कर्पूर आरती, केसर रायस पूजा, अष्टोत्तर पूजा, नवग्रह पूजा आदी विविध पूजाही केल्या जातात. अनेक भाविक आपली नवी दुचाकी वा चारचाकी वाहने येथे पूजा करण्यासाठी घेऊन येतात. मंदिरातील पुजाऱ्यांकडून त्यांची खास पूजा केली जाते. ही पूजा सशुल्क असते.