शनी मंदिर,

उसवाड, ता. चांदवड, जि. नाशिक

उज्जैनचा राजा विक्रमादित्य याच्यावर शनिदेवाची वक्रदृष्टी होऊन त्याला साडेसाती लागली. साडेसातीचा हा कठीण काळ त्याने चांदवडजवळील वरदडी येथील जंगलात काढला. त्यानंतर शनिदेव प्रसन्न झाले व त्याला दर्शन दिले. शनिदेवाने जेथे विक्रमादित्यला दर्शन दिले ती जागा म्हणजे आताचे उसगाव-वरदडी येथील शनी मंदिर असल्याचे सांगितले जाते. या प्राचीन मंदिरात शनिदेवाचे दर्शन घेतल्यास साडेसातीचा कोप कमी होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की थोर सम्राट राजा विक्रमादित्य याच्या दरबारात महापंडितांकडून नवग्रहांवर चर्चा सुरू होती. ज्यावेळी शनिग्रहाचे महत्त्व विशद करण्यात येत होते, तेव्हा विक्रमादित्याने शनिदेवांची थट्टा केली. आकाशमार्गे जाणाऱ्या शनिदेवाने ते ऐकले व क्रोधित होऊन विमानासह ते दरबारात आले. ‘तुला साडेसाती भोगावी लागेल’ असे सांगून ते तेथून निघून गेले. तेव्हापासून विक्रमादित्याची साडेसाती सुरू झाली. या कालावधीत विक्रमादित्य एकदा उज्जैन येथील बाजारात घोडे खरेदीसाठी आला होता. त्यावेळी शनिदेव घोडेविक्रेत्याचे रूप घेऊन त्याच्यासमोर आले. विक्रेत्याकडील घोडा पसंत पडल्याने त्याने मोल विचारले. त्यावेळी विक्रेत्याने आधी घोड्यावर बसून पाहा, मग मोल द्या, असे सांगितले. विक्रमादित्य बसताच घोडा वायुवेगाने तेथून निघाला व त्याने राजाला चांदवडजवळील वरदडीच्या घनदाट जंगलात आणून सोडले व अदृश्य झाला. त्यामुळे त्या भयाण जंगलात विक्रमादित्यला रात्र काढावी लागली. त्यावेळी शनिदेवाचा कोप सुरू झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

घनदाट जंगलातून कसाबसा मार्ग काढत येथील एका गावात आल्यावर विक्रमादित्य एका धनाढ्य वैश्याकडे पोहोचला. तेथेही वैश्य वाण्याच्या मुलीचा रत्नहार चोरल्याचा त्याच्यावर आळ घेण्यात आला. त्यामुळे तेथील राजा चंद्रसेन याने विक्रमादित्याला हात-पाय तोडण्याची शिक्षा दिली. हात-पाय तोडल्यानंतर एका तेल घाण्यावर विक्रमादित्य काम करीत होता. विक्रमादित्य हा संगीतात पारंगत होता. एकदा विक्रमादित्याने दीपराग आळवला आणि गावातील दिवे लागले. त्याचदरम्यान विक्रमादित्याच्या साडेसातीचा काळ संपत आल्याने शनिदेव प्रसन्न झाले व विक्रमादित्याला वर मागायला सांगितले. त्यावेळी विक्रमादित्याने मला जशी पिडा दिली तशी यापुढे कोणाला देऊ नका, असे सांगून भाविकांना आपले दर्शन घेता यावे यासाठी येथेच थांबावे, अशी विनंती केली. शनिदेवानेही राजाचे शरीर पूर्ववत करून त्याचे वैभव त्याला परत केले. विक्रमादित्याची विनंती मान्य करून शनिदेवाने येथे राहण्याचे कबूल केले. तेव्हापासून शनिदेवासह राहू व केतू वरदडी येथे स्थित झाल्याचे सांगितले जाते. कालांतराने या ठिकाणी शनी मंदिर उभारले गेले.

हिरव्या गर्द परिसरात स्थित असलेले हे छोटेखानी शनी मंदिर साधेसे आहे. या मंदिरासमोर नव्याने सभामंडप उभारण्यात आला आहे. मूळ मंदिरात शनिदेवासह राहू व केतू यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या बाजूलाच शेंदूरचर्चित गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर शनिदेवाची शिळा आहे. या शिळेवर भाविक तेल वाहतात. या शिळेच्या मागे राजा विक्रमादित्य यांचा घोड्यावर स्वार असा प्रतिकात्मक पुतळा आहे. असे सांगितले जाते की, ज्या जागेवर घोड्याने राजा विक्रमादित्याला सोडले त्या जागेवर आजही घोड्याच्या टापा पाहायला मिळतात. मंदिर परिसरात मारुती, बालाजी यांची मंदिरे आहेत. मंदिरालगत असलेल्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर नवीन शनी मंदिर पाहायला मिळते.

साडेसातीच्या काळात जे भाविक येथे येऊन शनिदेवाचे दर्शन घेतील त्यांच्या साडेसातीचा प्रकोप कमी होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शनी अमावस्या (ज्यावेळी अमावस्या शनिवारी येते तो दिवस) व दीप अमावस्येला (आषाढी अमावस्या) या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविक येतात. त्यावेळी परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते. शनी अमावस्येला मंदिरात भजन व कीर्तन असे कार्यक्रम असतात. त्यावेळी आलेल्या भाविकांना मंदिर ट्रस्टतर्फे महाप्रसाद देण्यात येतो. याशिवाय दर शनिवारी भाविकांची या मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते.


उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून ७४ किमी, तर चांदवडपासून १२ किमी अंतरावर
  • चांदवडपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवासाची सुविधा नाही
Back To Home