शक्ति ब्रह्माश्रम

हिंगोली शहर, जि. हिंगोली

दत्तसंप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे श्रीपादवल्लभ, नृसिंह सरस्वती, गोविंद स्वामी, वासुदेवानंद सरस्वती (टेंभे स्वामी) इत्यादी विभूतींना दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. टेंभेस्वामी यांनी विपुल ग्रंथरचना केली. तसेच अनेक उपचार पद्धतींचे संशोधन करून त्या विकसित केल्या. त्यांनी आध्यात्मिक पातळीवर समाजाचा उत्कर्ष साधला. त्यांचे शिष्य सीताराम महाराजांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. सीताराम महाराजांचे शिष्य नारायण महाराज व त्यांचे शिष्य पुरुषोत्तम स्वामी यांचा हिंगोली शहरातील शक्ति ब्रह्माश्रम हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांची समाधी मंदिरे आहेत.

विसाव्या शतकातील हा आश्रम मूलत: उंच डोंगरावर होता. पुढे हेमराज मुंदडा यांच्या मातोश्रीच्या आग्रहावरून व भाविकांच्या सुविधेसाठी नारायण महाराजांनी तो या ठिकाणी आणला. नारायण महाराजांचे भक्त बस्तवार यांनी ही जागा महाराजांना आश्रमासाठी दिली. मूळचे कोकणातील असलेले नारायण महाराज म्हणजेच नारसोपंत वैद्य यांचे वडील यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावी स्थायिक झाले. येथेच नारायण महाराजांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती.

सुरुवातीला त्यांच्यावर तुकडोजी महाराजांचा प्रभाव होता. अनेक वर्षे त्यांनी सोबत राहून तुकडोजी महाराजांची सेवा केली. पुढे त्यांनी सूर्यकिरण उपचार पद्धतीचा स्वीकार करून त्यावर संशोधन केले. गायत्री मंत्राची साधना केली. ते आजारी लोकांना कोवळ्या उन्हात बसून साधना करायला लावत व रोग्यांचे रोग बरे करत. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. सन १९७८ साली नारायण महाराज व पुढे १९८९ साली त्यांचे शिष्य पुरुषोत्तम महाराज याच आश्रमात समाधिस्थ झाले. या गुरु-शिष्यांच्या समाध्या येथे आहेत. आश्रमाचे बरेचसे बांधकाम पुरुषोत्तम महाराजांच्या काळात झालेले आहे.

हिंगोली-अकोला रस्त्यालागत ऐसपैस जागेत विसावालेला हा मठ विस्तीर्ण परिसरात पसरला आहे. मठास दुहेरी तटबंदी व भव्य प्रवेशद्वारे आहेत. बाह्य तटबंदीतील प्रवेशद्वार सुमारे वीस फूट रुंद व तितकेच उंच आहे. या प्रवेशद्वारातील दोन्ही बाजूचे स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत. कमानीवर सज्जा आहे. दुसऱ्या तटबंदीतील प्रवेशद्वाराची रचना साधारणतः अशीच आहे. पहिल्या प्रवेशद्वारापासून दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी जाळ्यांची तटबंदी उभी करण्यात आली आहे. खाजगी वाहनाने थेट मंदिराच्या प्रांगणात जाता येते. प्रशस्त प्रांगणात वाहनतळ, उद्यान, वनराई, गुरुकुल, सेवेकरी व महंतांची निवासस्थाने, भक्त निवास, भोजनशाळा, मठाचे कार्यालय, योगशाळा आदी वास्तू आहेत. प्रांगणात तुलसी वृंदावन, भूमिगत व ऊर्ध्वस्थ जलकुंभ आहेत.

प्रांगणात मधोमध नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज समाधी मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी समाधी मंदिराची रचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपाच्या पुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर स्टेनलेस स्टीलचा कठडा लावून अंतराळाची रचना केलेली आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर व तोरणात पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहात जमिनीवर नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या समाधीचे दोन स्वतंत्र चौथरे आहेत. पाषाणी चौथऱ्यांवर रजतपटलाचे नक्षीदार आच्छादन आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावरील मखरात श्रीदत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूला नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या तसबीरी आहेत. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या पहिल्या थरात गजराज, दुसऱ्या थरात शिखर शिल्पे, तिसऱ्या थरात कुंभ व मयूर, तर चौथ्या थरात नागशिल्प आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आहे. या स्तूपिकेवर कळस व ध्वजपताका आहे.

समाधी मंदिराला लागून यज्ञशाळा आहे. यज्ञशाळेत जमिनीवर यज्ञकुंड आहे. येथे नित्य अग्निहोत्र केले जाते. यज्ञात उंबर, वड, पिंपळ, रुई, बेल, शमी, खैर, हिवर, बिब्बा, डाळिंब, आवळी इत्यादी औषधी वनस्पतींच्या समिधा व तीळ, कापूर, कमळ कट्टा, गुग्गुळ, धूप इत्यादी हवन सामग्री वाहिली जाते. समाधी मंदिराच्या सभामंडपाला लागून ध्यान मंदिर आहे. ध्यान मंदिरात प्रशस्त सभामंडप व पुढे गुरुगादी असलेले गर्भगृह आहे. येथे नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या तसबीरी आहेत. ध्यान मंदिराच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका, तर त्यावर कळस व ध्वजपताका आहे.

गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज समाधी सोहळा हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. उत्सवांच्या वेळी आश्रमात भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी हजारो भाविक आश्रमात गुरुदर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येतात. दर गुरुवारी आश्रमात भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • हिंगोली बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून हिंगोलीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८६२५९०३६६७
Back To Home