
सातपुडा निवासिनी मनुदेवी ही खान्देशवासीयांची कुलदेवता मानण्यात येते. पौराणिक आख्यायिकेनुसार, मनुदेवी ही आदिशक्तीचे तेजोमय रूप आहे. यावल येथील सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या रांगेत मनुदेवीचे प्राचीन मंदिर आहे. अहिरांचा (वा गवळ्यांचा) राजा ईश्वरसेन याने इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात हे मंदिर उभारल्याचे सांगण्यात येते. ही देवी मनातील इच्छा पूर्ण करणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी नेहमी गर्दी असते. या मंदिरानजीक मोठा धबधबा आहे. त्यामुळे हे स्थान पर्यटकांचेही आकर्षण केंद्र बनले आहे.
केळीचे आगार म्हणून ओळखला जाणारा जळगाव जिल्हा हा खान्देशाचा भाग होता. अतिप्राचीन काळी ऋषिकदेश, तर यादवांच्या काळात सेऊणदेश या नावाने खान्देश ओळखला जात असे. त्याच प्रमाणे ‘मार्कंडेय पुराणा’त खान्देशाचा उल्लेख ‘अभीरदेश’ असा करण्यात आला आहे. मराठी ‘विश्वकोशा’तील नोंदीनुसार आभीर वा अहीर ही प्रामुख्याने गोपालक असलेली जमात भारताच्या वायव्येकडून, हेरात आणि कंदाहारच्या बाजूने प्रथम पंजाबात आली असावी. आभीरांनी सध्याच्या सिंध, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र वगैरे प्रदेशांतून वस्त्या करून राजसत्ताही स्थापल्या असाव्यात. काही पुराणांतून दहा आभीर राजांनी ६७ (काहींच्या मते १६७) वर्षे राज्य केले, असे म्हटले आहे. तिसऱ्या–चौथ्या शतकात आभीरांचे उत्तर कोकणात व नाशिक प्रदेशात राज्य होते.
आडगाव येथे मनुदेवीचे मंदिर स्थापन करणाऱ्या ईश्वरसेनास आभीर राजवंशाचा संस्थापक मानण्यात येते. नाशिक येथील शिलालेखांत शिवदत्तपुत्र ईश्वरसेनचा उल्लेख आहे. त्याने २४८–२४९ मध्ये एक संवत स्थापला होता. इतिहासकार वा. वि. मिराशी यांच्या संशोधनानुसार, ईश्वरसेनाने तिसऱ्या
शताब्दीच्या मध्यास आभीर साम्राज्याची स्थापना केली. त्याने येथे मनुदेवीचे मंदिर स्थापन केले याविषयी एक लोककथा सांगण्यात येते ती अशी की ईश्वरसेन या राजाकडे खूप मोठे गोधन होते. त्यामुळे त्यास ‘गवळी राजा’ असे म्हटले जाई. एकदा त्याला देवीने स्वप्नदृष्टान्त दिला व सातपुडा पर्वतावरील या निर्जन क्षेत्री मंदिर बांधण्याचा आदेश दिला. त्यानंतर राजाने मार्कंडेय ऋषींच्या हस्ते येथे देवीची प्रतिष्ठापना केली.
मनुदेवीची आख्यायिका अशी की पृथ्वीवर दहशत माजवणाऱ्या महिषासुराचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश एकांतात बसून विचार करीत असताना तेथे तीव्र प्रकाशाची ज्योत निर्माण झाली. तिच्यातून मनुदेवी अवतरली. देवतांनी जेव्हा तिला महिषासुराच्या त्रासापासून मुक्ती देण्याची विनंती केली, तेव्हा तिने त्याचा वध करण्याचे अभयवचन दिले की ती सप्तशृंगी देवीचे रूप प्राप्त करील आणि महिषासुराशी युद्ध करील. मनुदेवीने जेथे देवतांना अभयवचन दिले त्या स्थानी आज हे मंदिर उभे आहे. या मंदिराचे कालौघात अनेकदा जीर्णोद्धार झाल्याचे दिसते. असे सांगितले जाते की येथे
हेमाडपंती शैलीतील बाराव्या शतकातील मंदिर होते. १९९१मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्गावर चिंचोली–किनगावच्या पश्चिम दिशेला आडगाव फाटा लागतो. मनुदेवी मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी मानापुरी या आदिवासी गावातून यावे लागते. वाटेत हनुमानाचे एक छोटे मंदिर लागते. तेथून पुढे ३ किमी अंतरावर आदिशक्ती मनुदेवीचे मंदिर आहे. सातपुडा पर्वताच्या निसर्गरम्य घनदाट जंगलातून नागमोडी वळणांनी प्रवास करावा लागतो. मंदिरात येण्यासाठी सुमारे शंभर ते सव्वाशे पायऱ्या आहेत. या पायरी मार्गालगत पूजासाहित्य, खेळणी, खाऊ व प्रसादाची अनेक कायमस्वरूपी दुकाने आहेत.
संगमरवरी पाषाणांचा वापर करून बांधण्यात आलेल्या या मंदिराचा सभामंडप ८६ बाय ५० फूट एवढा, तर गर्भगृह २२ बाय १४ फूट आकाराचे आहे. मंदिरात खास करून उत्सवकाळात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सभामंडपाच्या पायऱ्यांपासूनच येथे स्टीलच्या मार्गिका उभारण्यात आल्या आहेत. सभामंडपाच्या आत देवीचे गर्भगृह आहे. गर्भगृहात चांदीचा पत्रा जडवलेले सुंदर महिरपी मखर आहे. त्यात चांदीच्या अधिष्ठानावर देवीच्या दोन मूर्ती आहेत. यातील एक मूर्ती उंच तर दुसरी तिच्याहून लहान आहे. दोन्ही मूर्तींच्या शिरांवर चांदीचे मुकूट व अंगावर विविध दागिने आहेत. मंदिराच्या समोर यज्ञशाळा आहे. मंदिराच्या आवारातील देवळ्यांमध्ये गणेश, महालक्ष्मी, रेणुका माता, तुळजाभवानी आदी देवतांच्या मूर्ती, तसेच महादेवाची पिंडी विराजमान आहे. नजीकच इच्छापूर्ती गणेशाचे स्थान आहे. येथे एका वृक्षाच्या खोडावर गणेशाचा आकार उमटलेला आहे. भाविक त्याची पूजा करतात, तसेच देवास कौल लावतात. मंदिरासमोर सुमारे १५० फूट उंचीचा धबधबा आहे. पायरी मार्गाच्या बाजूने असलेल्या ओढ्यातून त्याचे पाणी वाहात असते. पावसाळ्यात अनेक भाविक तेथे वर्षाविहाराचा आनंद लुटताना दिसतात.
या मंदिरात सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या काळात भाविक दर्शन घेऊ शकतात. येथे दरवर्षी चैत्र व माघ शुद्ध अष्टमीस नवचंडी महायज्ञाचे आयोजन केले जाते. संपूर्ण मार्गशीर्ष महिना व श्रावणातील पिठोरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी मंदिराची यात्रा असते. अश्विन महिन्यात नवरात्रोत्सव तसेच यात्राही भरते. नवरात्रोत्सवात या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे देवीला पुरणपोळीचा नेवेद्य दाखवला जातो.