सप्तशृंगी माता मंदिर

शिरागड, ता. यावल, जि. जळगाव

आदिमाया भगवतीच्या १०८ शक्तिपीठांपैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहुरची महाकाली (रेणुकादेवी) ही पूर्णपीठे, तर वणीची सप्तशृंगी देवी हे आद्य अर्धपीठ मानले जाते. सप्तशृंगी गडावर स्थित असलेली ही देवी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक स्वरूप असल्याचे मानले जाते. अशी मान्यता आहे की सप्तश्रृंगी गडावर जाण्याआधी देवीचे वास्तव्य हे शिरागड येथील या डोंगरावर होते. त्यामुळे आजही या स्थानाला देवीचे माहेर लहानगड असे संबोधले जाते

पौराणिक आख्यायिकांनुसार, देवी सती राजा दक्ष प्रजापतीची मुलगी आणि महादेवाची पत्नी होय. एकदा राजा दक्षाने यज्ञाचे आयोजन केले महादेव सोडून सर्व देवांना त्यासाठी आमंत्रित केले. सतीला हे समजल्यानंतर तिने वडिलांकडे जाऊन याचा जाब विचारला. त्यावेळी दक्षाने महादेवाची निंदा केली. पतीबद्दलचे ते अपमानकारक उद्‌गार ऐकून सती क्रोधित झाली त्या क्रोधातच तेथे सुरू असलेल्या यज्ञामध्ये तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. शंकरास हे समजल्यावर ते प्रचंड क्रोधीत झाले. यज्ञस्थळी येऊन त्यांनी सतीचे मृत शरीर त्या यज्ञातून बाहेर काढले. ते हातात घेऊन ते शोकसंतापाने इकडेतिकडे भटकू लागले. रुद्रावतार धारण करून शंकराने तांडव नृत्य करू केले. त्यातून पृथ्वीचा नाश होऊ शकतो म्हणून सगळे देव चिंतेत पडले

त्यावेळी भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. सतीच्या देहाचे भाग आणि अंगावरील दागिने ज्या ज्या ठिकाणी पडले ते देवीचे शक्तिपीठ बनले. देवीची अशी ५१ शक्तिपीठे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि तिबेट या देशांमध्ये आहेत. देवीभागवत या ग्रंथांमधील उल्लेखानुसार अशी १०८ शक्तिपिठे आहेत.

शिरागड येथील सप्तश्रृंगी मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी येथून जवळ असलेल्या आडगाव परिसरात ऋषिमुनींकडून विश्वकल्याणासाठी महायज्ञ केला जात होता. त्यात महिषासूर राक्षस विघ्ने आणत होता. त्यावेळी ऋषिमुनींसह अनेक देवतांनी आदिमातेकडे महिषासूराचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन आदिमाता आडगाव येथे प्रगट झाली महिषासुराशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाली. देवीचे महिषासुराशी युद्ध ज्या ठिकाणी झाले ते स्थान म्हणजे शिरागड येथील सध्या मंदिर असलेली टेकडी होय. या युद्धात देवीपुढे महिषासुराचा निभाव लागला नाही. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी महिषासूर या ठिकाणावरून पळून गेला सप्तश्रृंगी गडावर जाऊन लपून पसला. परंतु देवी पाठलाग करत तेथेही पोचली तिने तेथे त्याचा वध केला. ज्या ठिकाणी महिषासूराचा वध झाला त्याच ठिकाणी मग देवीने वास्तव्य केले. सप्तश्रृंगी निवासिनी म्हणून देवीला सप्तश्रृंगी हे नाव पडले. तेव्हापासून सप्तश्रृंगी हा मोठा गड शिरागड येथील देवीचे जागृत स्थान लहानगड म्हणून प्रसिद्ध आहे

शिरागड गावाच्या वेशीवर, तापी नदीच्या काठावर, सप्तश्रृंगी देवीचे हे जागृत स्थान आहे. शिरागड गावापासून नदीपात्रातून होडीने या मंदिरात यावे लागते. नदीच्या तिरावरून सुमारे १५० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रागंणात प्रवेश होतो. लहानशा टेकडीच्या पठारावर हे मंदिर स्थित आहे. येथील मंदिरासमोर होमकुंड मोठा त्रिशुळ आहे. सभामंडप प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस सूर्य चंद्र यांच्या प्रतिमा आहेत. सभामंडपात मध्यभागी देवीचे वाहन असलेल्या वाघाची मूर्ती त्यासमोर पितळी कूर्ममूर्ती आहे. सभामंडाच्या भिंतींवर देवीच्या विविध रूपातील प्रतिमा रेखाटलेल्या आहेत

गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या सोनेरी नक्षीदार मखरात, चार फूट उंचीची, पाषाणात कोरलेली देवीची मूर्ती आहे. सिंहावर आरूढ असलेल्या या देवीचे रूप सौम्य भासते. देवीच्या १८ हातांमध्ये विविध आयुधे आहेत. त्यामुळे या देवीलाअष्टादश देवीअसेही म्हणतात. देवीचा डावा हात कानामागे आणि मान तिरकी आहे. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले, हातांत हिरव्या बांगड्या, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार आहेत. या मूर्तीच्या समोर देवीची छोटी शेंदूरचर्चित व्याघ्रारूढ पाषाणमूर्ती आहे. तर वज्रपिठाच्या समोरच्या बाजूला खाली देवळीत गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे

मंदिराच्या आवारात हनुमानाची मोठी प्राचीन मूर्ती आहे. एका हातात द्रोणागिरी पर्वत दुसऱ्या हातात गदा घेतलेली, अशी ही शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. देवीच्या मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला एका छोट्या मंदिरातही सप्तशृंगीची देवीची मोठी मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, लक्ष्मीपूजन इत्यादी उत्सव साजरे केले जातात. या सोहळ्याच्या वेळी अनेक भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. नवरात्रीत येणाऱ्या हजारो भाविकांमुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप येते

उपयुक्त माहिती

  • यावलपासून २४ किमी, तर जळगाव येथून २० किमी अंतरावर
  • यावल जळगाव येथून एसटीची सुविधा
  • वाहनतळापासून पुढे होडीचा प्रवास आहे
  • खासगी वाहने शिरागड येथील मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home