गोमंतकाच्या राजदैवताचा मान असलेले सप्तकोटेश्वर हे कदंब राजघराण्याचे कुलदैवत होते. तिसवाडीच्या उत्तरेस मांडवी नदीतील दिवाड या बेटावरील नार्वे हे सप्तकोटेश्वराचे गोव्यातील मूळ स्थान मानले जाते. फातर्पा येथेही सप्तकोटेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. नुकताच त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. जीर्णोद्धारात या मंदिराची रचना कदंबकालीन स्थापत्यशैलीत करण्यात आली आहे. सप्तकोटेश्वर हा मूळचा खंडोबा वा मार्तंड असल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात त्याची पूजा शिवस्वरूपात केली जाते. महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव आहे. त्या दिवशी येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात.
या मंदिराची आख्यायिका सप्तर्षींच्या तपस्येशी जोडलेली आहे. त्या कथेनुसार, सात ऋषींनी येथे भगवान शिवाची सात कोटी वर्षे आराधना केली. त्यांच्या तपामुळे प्रसन्न झालेले भगवान शंकर ऋषींसमोर प्रकट झाले. तुम्हांस हवा तो वर मागा, असे ते म्हणाले. त्यावर ऋषींनी महादेवास अशी विनंती केली की आम्ही जेथे तपश्चर्या केली, त्या ठिकाणी आपण सप्त कोटी वर्षे निवास करावा. शंकराने ती प्रार्थना मान्य केली. त्यामुळे येथील महादेवास ‘सप्तकोटीश्वर’ असे नाव पडले. तर सात ऋषींचा नाथ म्हणून त्यास सप्तनाथ असेही म्हटले जाऊ लागले. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, जरासंधाच्या आक्रमणामुळे भगवान श्रीकृष्णास मथुरेहून स्थलांतर करावे लागले.
त्यावेळी कृष्णाने येथे सप्तकोटेश्वराची पूजा केली व नंतर द्वारका येथे आपले राज्य स्थापन केले.
गोवा गॅझेटियरनुसार, सप्तकोटेश्वर ही देवता महाराष्ट्रातील जेजुरीच्या खंडोबाचे एक रूप आहे. गोव्यामध्ये रवळनाथाच्या स्वरूपातील मार्तंड-भैरव ही देवता प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. गोव्यातील अनेक देवालयांतील परिवार देवतांमध्ये रवळनाथाचा समावेश असल्याचे दिसते. शिवचित्त कदंबाच्या काळापासून (इ.स. ११५५) कदंबांनी याच रवळनाथास सप्तकोटेश्वराच्या स्वरुपात अंगिकार केला असणे शक्य असल्याचे गॅझेटियरमध्ये म्हटले आहे. ‘कल्चरल अँड रिलिजियस ट्रॅडिशन्स इन टेम्पल्स ऑफ गोवा’ (२००४) या गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात कमला माणकेकर यांनी असे म्हटले आहे की गोव्यात खंडोबा हा मार्तंड भैरव वा सौम्य भैरव म्हणून लिंग रुपात पूजला जातो. त्याची मूर्ती घडवतात तेव्हा ती चतुर्भज असते. तिच्या हातात डमरू, त्रिशुल, खड्ग आणि पात्र असते. सप्तकोटेश्वर हे या खंडोबाचे रूप आहे. गोव्यातील ख्यातनाम इतिहासकार पी. पी. शिरोडकर यांनीही ही संकल्पना मांडली आहे.
इ.स. १००० ते १२३७ या कालखंडात गोव्यात सत्ताधीश असलेल्या कदंब राजघराण्याची सप्तकोटेश्वरावर मोठी श्रद्धा होती. कदंब राजा शिवचित्त पेर्मांडीदेव व त्याची पट्टराणी कमलादेवी हे सप्तकोटेश्वराचे भक्त होते. कर्नाटकातील इ.स.११७४च्या डेगांवे शिलालेखात कमलादेवीने सप्तकोटीश्वराच्या पायाशी पवित्र जल अर्पण करून ब्राह्मणांना अग्रहार दिला, असा उल्लेख आहे. पेर्मांडीचा पुतण्या जयकेशी तिसरा हा ११८७मध्ये राज्यारुढ झाला. त्याच्या सुवर्णनाण्यांवर ‘सप्तकोटीश्वरलब्धवरप्रसाद’ म्हणजे ‘सप्तकोटीश्वराचा प्रसाद प्राप्त झालेला’ असे बिरुद कोरलेले होते. इसवी सनाचे बारावे शतक ते तेराव्या शतकाचा पूर्वार्ध या काळातील कदंब राजवंशाचे अन्य काही शिलालेख, ताम्रपट आणि नाणी यांवर सप्तकोटेश्वराचे उल्लेख आढळतात. या राजवंशातील एका राजाने दिवाडी बेटावरील नार्वे येथे सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधले. ते नेमके कधी व कोणी बांधले याची माहिती अनुपलब्ध आहे. मात्र डेगांवेतील शिलालेखावरून तेथील मंदिर इ.स. ११७४मध्ये अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढे दिवाडी बेटास बहमनी सत्तेचा मोठा उपद्रव झाला.
त्यांनी सप्तकोटेश्वराच्या मंदिरास हानी पोहचवली. कोकणाख्यान या ग्रंथात असे म्हटले आहे की म्लेंच्छांकडून सप्तकोटेश्वराची विटंबना होईल या भयाने लोकांनी मंदिरातील शिवलिंग एका भातखेचरात नेऊन गाडून ठेवले. नंतर विजयनगरचा सम्राट हरिहर द्वितीय यांच्या आदेशानुसार त्यांचे मंत्री वीर वसंत माधव उर्फ मलप्पा ओडियार यांनी ‘तुरुश्कांचा संहार करून येथे सप्तनाथाबरोबरच अन्य मंदिरे पुन्हा बांधली’, अशी नोंद आहे. सप्तनाथ म्हणजेच सप्तकोटेश्वर. १३८० ते १३९० या काळात हे मंदिर येथे उभारण्यात आले. पुढे पोर्तुगीज काळात, १५६७च्या सुमारास सप्तकोटेश्वराचे शिवलिंग डिचोली तालुक्यातील सध्याच्या नार्वे येथे नेण्यात आले.
दिवाड बेटावर त्या काळात असलेल्या मंदिरांमध्ये शांतादुर्गा देवीचेही मंदिर होते. बहामनी टोळधाडीच्या वेळी, इ.स. १३६५मध्ये या मंदिरातील देवीची मूर्ती मोरपिपला येथे हलवण्यात आली होती. नंतर इ.स. १५०० मध्ये ती फातर्पा येथे स्थलांतरीत करण्यात आली व येथे देवीचे मंदिर बांधण्यात आले. त्याच वेळी गावकऱ्यांनी दिवाडीतील आपल्या आराध्य दैवताची, म्हणजे सप्तकोटेश्वराची स्मृती जपण्यासाठी शांतादुर्गा देवीच्या मंदिराजवळच सप्तकोटेश्वराचेही मंदिर उभारले.
गोवा मुक्तीनंतर येथे असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार सुरू झाला. त्यांतून १९९२ मध्ये येथील शांतादुर्गा देवीच्या मंदिराची पुनर्बांधणी झाली, तर २००४ मध्ये सप्तकोटेश्वराच्या मंदिराची आखणी करण्यात आली आणि २००५ मध्ये त्याचे भूमिपूजन झाले. सप्तकोटेश्वर हे कदंब राजघराण्याची कुलदेवता असल्याने कदंबांनी बांधलेल्या मंदिराप्रमाणेच हे मंदिर असावे, असे नियोजन करण्यात आले. ही शैली द्रविड आणि नागर शैली यांच्या मधली शैली आहे. स्थानिक गोमंतकीय आणि कर्नाटकीय परंपरांचे मिश्रण असलेल्या या शैलीचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पाषाणी शिल्पे, संतुलित रचना आणि निसर्ग सुसंगत स्थापत्य. गोव्यात कदंब शैलीतील एकमेव मंदिर सध्या उभे आहे. ते म्हणजे तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर. त्या मंदिराच्या स्थापत्याचा संदर्भ या मंदिराच्या उभारणीसाठी घेण्यात आला. ४ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत या नूतनीकरण केलेल्या भव्य मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडला.
फातर्पे येथील शांतादुर्गा मंदिराच्या नजीक, उंच जगतीवर २५० चौरस मीटर क्षेत्रात हे पाषाणी मंदिर उभारलेले आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.
पाच पायऱ्या चढून या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना उंच मेघडंबऱ्या आहेत. प्रांगणात समोरच सुमारे २३.५ फूट उंचीचा ‘आयुधपुरूष स्तंभ’ आहे. शंकराने धारण केलेल्या पंचआयुधांतील शिवतत्त्वाचे द्योतक असलेला हा स्तंभ एकाच शिळेतून कोरलेला आहे. त्याच्या शीर्षस्थानी तांब्याचा त्रिशुल आहे. या पुढे मोठा नंदीमंडप आहे. तर मंदिराच्या भोवती अष्टप्रतिहार (आठ दिशांचे रक्षक) यांच्या छोट्या मेघडंबऱ्या आहेत.
येथून पुढे पाच पायऱ्या चढून मंदिराच्या अर्धखुल्या प्रकारच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या तिन्ही बाजूंनी असे पायरीमार्ग आहेत. सभामंडपास पाषाणाची उतरती छपरे आहेत. छतावर मध्यभागी चौकोनाकार आहे. त्यावर चारही दिशांनी नंदी मूर्ती स्थापित आहेत. एकूण २४ पाषाणी ताशीव स्तंभ असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी प्राचीन पद्धतीनुसार रंगशीला आहे. त्यावरील वितानाचा भाग कमलाकृती आहे. गर्भगृहास मोठे दगडी प्रवेशद्वार आहे. त्यात लाकडी गज बसवलेला लाकडी दरवाजा आहे. कोरीव काम केलेल्या द्वारचौकटीच्या उतरांग भागातही कलात्मक नक्षीकाम केलेले आहे. त्यात मध्यभागी शिवशंकराचे शिल्प व त्यावरील भागात कीर्तिमुख आहे.
गर्भगृहात उंच वज्रपिठावर सप्तकोटेश्वराची चांदीच्या मोठ्या मुखवटास्वरूपातील मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीमागे सुंदर कोरीवकाम केलेली चांदीची प्रभावळ आहे. त्यावर चांदीचे छत्र, पताका व अन्य धर्मचिन्हे लावलेली आहेत. गर्भगृहावर खाली पायऱ्यांसारखा आकार, त्यावर काहीशी चौकोनाकार रचना व त्याच्या वरच्या भागात छोटासा आमलक आणि त्यावर सुवर्णरंगी कलश असे शिखर आहे. शिखरावर चारही बाजूंनी पर्णाकार देवकोष्ठके आहेत.
या मंदिर-संस्थानात ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या दरम्यान वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. यात मिरवणुका, आतषबाजी आणि विविध धार्मिक विधींचा समावेश असतो. प्रत्येक सोमवारी येथे सप्तकोटेश्वराची पालखी निघते. त्यावेळी सप्तकोटेश्वराची सालंकृत पूजा करण्यात येते. मार्च महिन्यात येथे छत्रोत्सव आणि पिंडीकोत्सव साजरे होतात. यात देवतांच्या छत्र्या नाचवल्या जातात. याच प्रमाणे या उत्सवांत नवग्रह होम, वास्तुहोम आणि शिबिकोत्सव यांचा समावेश असतो. येथे महाशिवरात्र हा प्रमुख उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. या वेळी भाविकांच्या गर्दीने येथील परिसर गजबजून जातो.
शांतादुर्गा भूमिपुरूष संस्थानाचा मुख्य भाग असलेल्या या मंदिराच्या परिसरात शांतादुर्गा आणि इतर उपदेवतांची मंदिरे आहेत. संस्थानात महाजन आणि भाविकांसाठी विश्रामगृह, तसेच सभागृह आहे.