संत तुकाराम महाराज मंदिर

देहू, ता. हवेली, जि. पुणे


दाक्षिणात्य वास्तुशैलीशी मेळ साधणाऱ्या भव्य अशा प्रवेशद्वारातून आपण देहू गावात प्रवेश करतो. काही अंतरावरच दुसरे असेच मोठे प्रवेशद्वार आहे. चौदा टाळकरी प्रवेशद्वार हे त्याचे नाव. या प्रवेशद्वारावर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांच्या मूर्ती बसविण्यात आलेल्या आहेत. या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच संत चोखामेळा यांचे छोटेसे मंदिर आहे. तेथून इंद्रायणी नदीचेही दर्शन होते. या प्रवेशद्वारातून तुकाराम महाराज मंदिराकडे थेट रस्ता जातो.

पुणे शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले देहू हे गाव तुकाराम महाराजांचे जन्मस्थान. इंद्रायणी नदीच्या काठी आणि जेथे बसून तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली, त्या भंडारा डोंगराच्या कुशीत वसलेले हे ऐतिहासिक गाव. याच गावात तुकाराम महाराजांच्या जन्मापासून ते वैकुंठ गमनापर्यंतचे अनेक प्रसंग घडले. आज हे गाव महाराष्ट्राचे एक प्रमुख तीर्थस्थान आहे.

चौदा टाळकरी प्रवेशद्वारातून काही अंतर गेल्यानंतर समोरच दिसते सुबक दगडी चिऱ्यांनी बांधलेले तुकाराम महाराजांच्या मंदिराचे एखाद्या गढीच्या दरवाजासारखे महाद्वार. या महाद्वारावर गरुड विमानावर आरूढ असलेल्या तुकोबांची प्रतिमा आहे. आत जाताच समोरच धार्मिक प्रतीके कोरलेला, दगडी बांधणीचा मोठा सभामंडप व त्यापुढे तुकाराम महाराजांचे मंदिर दिसते. तुकोबांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी १७२३ मध्ये देऊळ घाटावर हे मंदिर उभारले होते. या देवालयाच्या प्रांगणात नमस्कार मुद्रेत उभ्या असलेल्या हनुमंताचे, तसेच राम-लक्ष्मण-सीता आणि विठ्ठल-रखुमाई, गरुड यांची मंदिरे आहेत. याशिवाय येथे हरेश्वर मंदिर, संत बहिणाबाई मंदिर व संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आहे. असे सांगतात की, संत तुकाराम यांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडविण्यात आल्यानंतर ते ज्या शिळेवर १३ दिवस उपोषणास बसले होते, तीच शिळा या मंदिरात आहे.

मंदिराच्या प्रांगणात जुना अश्वत्थ वृक्ष म्हणजेच पिंपळ वृक्ष आहे. पुराणांतील माहितीनुसार, या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू व वरच्या भागात महादेवाचा वास असतो. वृक्षाच्या दक्षिणेकडील फांद्यांवर शूलपाणी; तर पूर्वेकडील फांद्यांवर इंद्रदेवाचे अधिष्ठान असते. अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्षावर देवतांचा वास असतो. त्यामुळेच हा वृक्ष पवित्र समजला जातो.

मंदिराच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आणि त्याच्या बाजूस आवाराच्या भिंतींना लागून संस्थानाच्या खोल्या आहेत. या देवालयाच्या संपूर्ण बांधकामात दगडाचा, त्यातही लाल दगडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. खालीही दगडी फरशा बसविल्या आहेत.

संत तुकाराम महाराजांचे, तसेच येथील विविध देवतांचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एक रस्ता आपल्याला तुकोबांचा जन्म जेथे झाला, त्या वाड्याकडे घेऊन जातो. ओसरीला गजांच्या खिडक्या असलेला हा दुमजली वाडा संपूर्ण लाकडी बांधणीचा आहे. येथील देवघरात संत तुकाराम महाराज व त्यांच्या पत्नी आवली यांच्या पाषाणातील मूर्ती आहेत. मुख्य देवालयाच्या बाहेरून एक रस्ता नदीघाटाकडेही जातो. तेथे तुकोबांचे चिरंजीव नारायणबाबा यांची समाधी आहे.

देवालयात दर्शन घेऊन बाहेर पुन्हा चौदा टाळकरी प्रवेशद्वाराकडे आल्यानंतर तेथून जवळच संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमनस्थान आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की, याच जागेवर संत तुकाराम महाराज यांना वैकुंठास नेण्यासाठी विमान उतरले होते. या मंदिराचा आकारही त्या कथेस साजेसा असा निमुळता आहे.

प्रयाण काळी देवे विमान पाठविले। कलीच्या कालामाजी अद्‌भुत वर्तविले।
मानव देह घेऊनी निजधामी गेले। निळा म्हणे सकळ संत तोषविले॥

संत निळोबाराय यांच्या अभंगातील या ओळी या मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरल्या आहेत. या मंदिरात तुकाराम महाराजांची काळ्या पाषाणातील वीणाधारी सुंदर मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत.

मंदिराच्या प्रांगणात तुकोबांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची उठावचित्रे (म्युरल्स) रेखाटलेली आहेत. तेथेच नांदुरकीचा वृक्ष आहे. सदेह वैकुंठाला जाण्याआधी तुकाराम महाराज याच वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते. फाल्गुन वद्य द्वितीयेला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ते सदेह वैकुंठाला गेले. हाच दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या दिवशी हजारो भाविक नांदुरकीच्या झाडाला प्रदक्षिणा घालून, त्याचे दर्शन घेतात.

चौदा टाळकरी प्रवेशद्वारापासून साधारणतः दोन किमी अंतरावर नव्याने बांधण्यात आलेले भव्य असे गाथा मंदिर आहे. विस्तीर्ण परिसरात ते उभे आहे. मंदिराच्या दुमजली दालनांत संगमरवरी भिंतींवर संपूर्ण गाथा म्हणजेच गाथेतील साडेचार हजार अभंग कोरण्यात आले आहेत. गाथा मंदिराची रचना सभामंडप व त्यापुढे गाभारा अशी आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकाराम महाराज यांची भव्य बैठी मूर्ती; तर वरच्या मजल्यावरील सज्जामध्ये विठोबा-रखुमाईच्या मूर्ती आहेत. काही भक्तांच्या मते, तुकाराम हे सत्ययुगातील भक्त प्रल्हाद, त्रेतायुगातील भक्त अंगद, द्वापारयुगातील भक्त उद्धव व कलियुगातील संत नामदेव या चार युगांतील भक्तश्रेष्ठांचे अवतार आहेत. या श्रद्धेनुसार या मंदिरात तुकोबांचे आधीचे अवतार आणि त्यांच्या इष्ट देवता यांच्या भव्य प्रतिमाही पाहावयास मिळतात. मंदिराच्या आवारातच भक्त निवास आहे आणि तेथे रोज दुपारी महाप्रसाद दिला जातो.

देहूमध्ये संत तुकाराम महाराज मंदिर, जन्मस्थान मंदिर, वैकुंठगमन मंदिर, शिळा मंदिर, तसेच हे गाथा मंदिर यांशिवाय अनेक मंदिरे आहेत. त्यांत तुकोबांचे आठवे पूर्वज विश्वंभरबाबा यांचे मंदिर, तसेच पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज यांच्या मंदिरांचा समावेश आहे. देहूमधील सर्व मंदिरांच्या पूजेअर्चेसाठी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांचे पुत्र शिवाजी महाराज यांनी देहूला अनेक सरकारी वतने दिली होती, अशा नोंदी आहेत.

तुकाराम बीजेच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीयेला देहूमध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. फाल्गुन वद्य द्वितीयेपासून तीन दिवस येथे मोठी जत्रा असते. ज्येष्ठ वद्य अष्टमीला तुकाराम महाराजांची पालखी देहूतून निघून पुणे, सासवड, बारामतीमार्गे आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरला पोचते. आषाढ वद्य एकादशीला ही पालखी देहू येथे परत येते. कोणत्याही महिन्यात, कोणत्याही काळात देहूमध्ये भाविकांची गर्दी असते. सकाळी ६.३० ते रात्री ८.३० या वेळांत मंदिरात जाऊन भाविकांना तुकाराम महाराजांचे दर्शन घेता येते. शनिवारी ही वेळ रात्री ९ वाजेपर्यंत असते.

उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून ३० कि.मी.; तर मुंबईपासून १३५ कि.मी. अंतरावर
  • पुणे व आळंदीपासून पीएमपीएमएलची सेवा
  • जवळचे रेल्वेस्थानक देहू रोड
  • भक्त निवास व प्रसादाची सुविधा
Back To Home