नाशिक हे धार्मिक स्थळांनी गजबजलेले आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेले शहर आहे. त्यामुळेच या भूमीची ओळख प्राचीन काळापासून ‘पुण्यभूमी’ अशीच आहे. याच पुण्यभूमीत त्र्यंबकेश्वर या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिराजवळ ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे. संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात २३ जून १२९७ या दिवशी संजीवन समाधी घेतली.
याबाबत एक आख्यायिका अशी की निवृत्तीनाथ ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करत असताना ते सध्या जेथे मंदिर आहे त्या ठिकाणी आले. त्यावेळी या परिसरात घनदाट जंगल होते. तेथील एका गुहेत गहिनीनाथांचे वास्तव्य होते. तेथे राहून निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून दीक्षा घेतली. तेथेच त्यांना आपल्या अवतारकार्याची निश्चित दिशा सापडली.
निवृत्तीनाथ यांचा जन्म ११ फेब्रुवारी १२७३ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव येथे झाला. मात्र, निवृत्तीनाथांच्या जन्मवर्षाबाबत मतभेद आहेत. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ थोरले. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सोप्या भाषेत सर्वांना समजेल-उमजेल अशा शब्दांत लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली.
निवृत्तीनाथांचे तीनशे ते चारशे अभंग असून ते योगपर, अद्वैतपर व कृष्णभक्तिपर आहेत. मात्र, ज्ञानेश्वरांना मार्गदर्शन करूनही ते यशापासून नावाप्रमाणेच निवृत्त राहिले. ‘निवृत्तीदेवी’, ‘निवृत्तीसार’, ‘उत्तरगीताटीका’ असे त्यांचे तीन ग्रंथ आहेत. मात्र ते उपलब्ध नाहीत. ‘समाधी बोध’ व ‘सटीक भगवद्गीता’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तीनाथांची म्हणून धुळ्यातील श्रीसमर्थ वाग्देव मंदिरात ठेवलेली आहेत. संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव यांनी संजीवन समाधी घेतल्यामुळे मुक्ताबाईंनी अन्न-पाणी सोडले व त्या परलोकवासी झाल्या. त्यानंतर काही दिवसांनी त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांनी वयाच्या २४ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली.
नागरशैली बांधकामातील उंच प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश करताच मोठा सभामंडप लागतो. सभामंडपातून समाधीस्थळाकडे जाता येते. समाधीस्थळाच्या द्वारपट्टीकेवर गणेश प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मागच्या बाजूला श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या काळ्या दगडातील कोरीव मूर्ती दिसतात. त्या चांदीच्या मखरात स्थानापन्न आहेत. त्याखालीच संत निवृत्तीनाथांची चार पायऱ्यांनी बनविलेली समाधीची जागा आहे. ज्यावर निवृत्तीनाथांचा चांदीचा मुखवटा ठेवलेला आहे. ही समाधी चांदीच्या वैशिष्ट्यपूर्ण कोरीव कामाने सजलेली आहे. मंदिरावर सुवर्णकलश आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला ब्रह्मगिरी पर्वताचे दर्शन घडते. मंदिर प्रांगणात संत तुकाराम व हनुमान यांची स्वतंत्र मंदिरे आहेत.
समाधी मंदिरात पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत काकड भजन, काकड आरती, समाधीची नित्यपूजा होते. दुपारी १२ ते १ दरम्यान नैवेद्य अर्पण केला जातो. दुपारी ४ वाजता पोषाख परिधानाची वेळ असते. सायंकाळी ७ वाजता धुपारती होते. रात्री ८.३० ते १० या वेळेत पंचपदी भजन व हरिपाठ होऊन शेवटी शेजारती होते.
वार्षिक उत्सवामध्ये निवृत्तीमहाराजांच्या समाधी घेतलेल्या तिथीऐवजी चैत्र वद्य पंचमी ते चैत्र वद्य द्वादशी यादरम्यान नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. सात दिवस भाविक रोज चंदनाची उटी तयार करतात. ११ व्या दिवशी समाधीला उटी लावून त्याच दिवशी ती भाविकांना वाटली जाते. या उटीमुळे अनेक व्याधी व सांसारिक दुःख नष्ट होऊन सुखाची अनुभूती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या काळात येणाऱ्या भक्तांच्या निवासाची व भोजनाची सोय ठरविलेल्या काही गावांमार्फत पूर्वापार करण्यात येते. काल्याचे कीर्तन व नगरप्रदक्षिणा घालून उत्सवाची सांगता करण्यात येते. याच समाधी स्थळाहून विधिवत शासकीय पूजा होऊन आषाढी वारीसाठी पालखी पंढरपूरला निघते. शेकडो वारकरी या पालखीत सहभागी होतात.