संत मुक्ताई मंदिर

सोमेश्वर महादेव मंदिर

मेहूण, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

वरी झाला भगवा जाण। अंतरी वश्य नाही मन। त्याला म्हणू नये साधू।किंवाचणे खावे लोखंडाचे। मग ब्रह्मपदी नाचे।।असे परखड विचार मांडणाऱ्या संत मुक्ताबाई यांना महाराष्ट्राच्या संतपरंपरेत मानाचे स्थान आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या त्या धाकट्या भगिनी. त्यांचेच नाव धारण करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यात तापी तीरावर त्यास्वरुपाकारझाल्या. त्या जेथेगुप्त झाल्याते स्थान म्हणजे महत्‌नगर अर्थात मेहूण असे मानले जाते. याच ठिकाणी मुक्ताबाईंचे भव्य समाधी मंदिर आहे

मुक्ताबाईंचे वर्णन अनेकांनी आदिशक्ती, आदिमाया, ब्रह्मचित्कला अशा शब्दांत केले आहे. संत निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांप्रमाणेच मुक्ताबाईंचे दीक्षागुरू होते. चारी भावंडांत त्या सर्वांत लहान असल्या तरी त्यांची परमार्थाची जाण थोर होती. सनातनी धर्ममार्तंडांच्या छळामुळे कष्टी होऊन ज्ञानदेवांनी आळंदीतील सिद्धबेटावरील झोपडीत स्वतःस कोंडून घेतले. त्यावेळी मुक्ताबाईंनी म्हटलेल्याताटीच्या अभंगांतून त्यांची थोर पारमार्थिक उंची स्पष्ट होते. ‘योगी पावन मनाचा। साहे अपराध जनांचा।। विश्व रागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी।। शब्दशस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।। विश्वपट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।अशा शब्दांत त्यांनी ज्ञानेश्वरांची समजूत काढली. ज्ञानेश्वरांनी पुढेज्ञानेश्वरीलिहिली त्यासाठी हेच ताटीचे अभंग प्रेरक ठरले, असे मत संत वाङ्मयाचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे

चांगदेवांसारख्या थोर योगी आणि तत्त्वज्ञान्याच्या गुरू होण्याइतकी उच्च कोटीची त्यांची अध्यात्मिक पातळी होती. संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव तसेच योगी चांगदेव यांनी आपली अवतारसमाप्ती केल्यानंतरफुटलासे मेळा तापसांचाअशी मुक्ताबाईंची भावना झाली. विरागी वृत्तीच्या मुक्ताबाई या घटनांमुळे उदास झाल्या त्यांनाही आता अवतार समाप्तीची ओढ वाटू लागली. चांगदेवांच्या समाधीनंतर त्या संत निवृत्तीनाथांसह वेरूळ येथे घृष्णेश्वराच्या दर्शनास आल्या. तेथून त्या तापी तीरावर आल्या. संत नामदेवांच्या गाथांमध्ये या स्थानाचे वर्णनधन्य महत्‌नगर धन्य सोमेश्वर। धन्य तापीतीर योगियांचे।।अशा शब्दांत करण्यात आले आहे. तो दिवस वैशाख वद्य दशमीचा होता. तापीतीरावर सर्व जण स्नानास गेले. तेथे त्यांनी भजनसंकीर्तन आरंभले. यात माध्यान्ह उलटून गेली. अचानक वातावरणात बदल होऊ लागला. मेघ दाटून आले. वीजांचा कडकडाट सुरू झाला. वादळ उठले. संत नामदेव सांगतात – ‘प्रळयीच्या विजा वर्षती अपार। जाला धुंधकार दाही दिशा।।याच वेळी अचानककडाडली वीज निरंजनीं जेव्हां। मुक्ताई तेव्हां गुप्त जाली।। वैकुंठीं लक्ष घंटा वाजती एकघाई। जाली मुक्ताई स्वरूपाकार।।त्या वादळात वीज कोसळली आणि त्यात मुक्ताबाई अंतर्धान पावल्या. शके १२१९, हेमलंबीनाम, संवत्सर वैशाख वद्य १०, तारीख १९ मे १२९९, दुपारी .१५ वाजता ही दुःखद घटना घडली

हा प्रकार मेहूण येथे झाला असे सांगण्यात येते. याबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे घडली. संत परंपरेचा सामाजिकसांस्कृतिक मागोवा घेणाऱ्यारिंगणया वार्षिकाच्या संत मुक्ताबाई विशेषांकातील माहितीनुसार, नेवासा येथील वारकरी रामभाऊ टोपडे यांच्या साह्याने बंकट स्वामी यांनी मुक्ताबाईंचे अंतर्धान स्थान महत्‌ग्राम म्हणजे मेहूण हेच असल्याचे स्पष्ट केले. संत नामदेवांनी अभंगात वर्णिलेल्या सोमेश्वराचे हेमाडपंती मंदिर, परशुरामाने बाण मारलेली जागा, मार्कंडेय टेकडी अशा सर्व खुणा या स्थळाशी जुळतात

येथे तापी नदीच्या तीरावर मुक्ताबाई जेथे अंतर्धान पावल्या, त्या ठिकाणी छोटे मंदिर बांधण्यात आले होते. मात्र हतनूर धरणामुळे मेहूण गाव हे मंदिर पाण्यात जाणार असल्याने सरकारने येथून दोनतीन किलोमीटर अंतरावरील चिंचोली गावात मंदिरासाठी जागा दिली. परंतु संत नामदेवांच्या अभंगात मुक्ताई तापी तीरावर अंतर्धान पावल्याचे उल्लेख सतत आलेले असल्याने ग्रामस्थांनी काही केल्या तापी तीरावरच मंदिर उभारण्याचा निर्धार केला आणि अखेर १९८० साली तापी तीराच्या वरच्या बाजूला असलेल्या विस्तिर्ण परिसरात नवीन मंदिर बांधण्यात आले. अश्विन शुद्ध प्रतिपदा, शके १९०२ (शुक्रवार, १० ऑक्टोबर १९८०)च्या मुहूर्तावर मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात सर्वत्र पेव्हरब्लॉची फरसबंदी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी झाडांच्या खाली भाविकांच्या सोयीसाठी बाके बसविण्यात आली आहेत. येथे एका बाजूस मुक्ताबाईचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूस सोमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे

काही फूट उंच अधिष्ठानावर मुक्ताबाई मंदिर उभारण्यात आले आहे. पाच पायऱ्या चढून या अधिष्ठानावर प्रवेश होतो. मंदिरास खुल्या स्वरूपाचा भव्य सभामंडप आहे. सभागृहाच्या दर्शनी भागातील स्तंभांवर नक्षीकाम आहे हे स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. समोरच्या भागात मंदिराचे दगडी गर्भगृह आहे. चार पायऱ्या चढून गाभाऱ्यात प्रवेश होतो. आत उंच चौथऱ्यावर मुक्ताबाईची, शक्यतो वारकरी मंदिरांत दिसणारी पांढरी शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. शालूचोळी नेसलेल्या, मस्तकी मुकूट आणि गळ्यात विविध अलंकार ल्यालेल्या मुक्ताईंचा एक हात विठ्ठलाप्रमाणे कमरेवर, तर दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. मुक्ताईंच्या मूर्तीसमोर संगमरवरी पादुका आहेत. मागे संगमरवरी देवकोष्टकांत काळ्या पाषाणातील विठ्ठलरुक्मिणीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यावर मराठा स्थापत्य शैलीतील उंच शिखर आहे. शिखरावर चारही बाजूंनी देवकोष्टके कोरलेली आहेत. त्यावर रूंद आमलक तीन स्तरीय कलश आहे. मंदिरापासून पुढे काही अंतरावर तापीतटाकडे जाणारा मार्ग आहे. येथे असलेल्या भव्य महाद्वारातून तापीच्या पात्रात जाणाऱ्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत

मुक्ताबाई मंदिरापासून काही अंतरावर सोमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती पद्धतीचे भूमीज शैलीतील आहे. काही पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंस दोन प्राचीन अर्धस्तंभ बसवलेले आहेत. सोमेश्वराचे मंदिर उंच जगतीवर बांधलेले आहे. मंदिरास अलीकडच्या काळात बांधलेला खुल्या पद्धतीचा मुखमंडप आहे. येथे नंदीची काळ्या पाषाणातील प्राचीन मूर्ती आहे. गर्भगृहाचे दगडी प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. या द्वारशाखांवर कोरीव नक्षीकाम आहे. द्वारशाखांच्या खालच्या बाजूस प्रतिहारींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या मंडारकावर अर्धचंद्रशीला दोन्ही बाजूस किर्तीमुखे आहेत. मात्र कालौघात ती झिजून गेलेली आहेत. द्वारचौकटीवर ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे, तर उत्तरांगेत शंकराच्या सहा मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहामध्ये प्रवेशद्वाराकडे तोंड असलेली सोमेश्वराची पिंडी त्यामागे एका छोट्या चौथऱ्यावर पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरानजीक गणेशाचे, तसेच हनुमानाचे छोटे मंदिर आहे.

संत मुक्ताबाई या वैशाख वद्य दशमीला तापीतीरी अंतर्धान पावल्या होत्या. दरवर्षी या तिथीला मुक्ताबाईंचा तिरोभूत सोहळा (अंतर्धान दिन सोहळा) येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. वैशाख वद्य प्रतिपदेला बंकटस्वामी यांच्या पुण्यतिथीने या सोहळ्यास प्रारंभ होतो. दशमीला सकाळी दहा ते बारा या वेळेत अंतर्धानाचे कीर्तन होते. द्वादशीला काला होऊन बारा दिवसांच्या या उत्सवाची सांगता होते. यानंतर तीन दिवसांनी, ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला मुक्ताईंच्या पालखीचे प्रस्थान होते. मुक्ताईंच्या पालखीचा रथ छोटेखानी आहे. तो भाविक स्वहस्ते ओढतात. सुमारे ३६ ते ३७ दिवस प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोचते

माघ वद्य एकादशी हा मुक्ताबाईंच्या माघवारीचा मुख्य दिवस असतो. या वारीसाठी येथे भाविकांच्या दिंड्या येतात. माघवारीस आलेल्या दिंड्या माघ वद्य त्रयोदशीस जवळच्या चांगदेवक्षेत्री जातात. हा चांगदेवांच्या समाधीचा दिवस होता. यावेळी येथे भाविकांची मोठी गर्दी जमते

मुक्ताबाईंचे अंतर्धान स्थान नेमके कोणते यावरून वारकरी संप्रदायात मतभेद आहेत. कोथळी येथेच त्या अंतर्धान पावल्या असे काही कीर्तनकारअभ्यासकांचे मत आहे. मात्र ... रामराव महाराज मेहूणकर यांनी ते खोडून काढले आहे. याबाबत त्यांनी लिहिलेल्या ओव्याश्री संत मुक्ताबाई गुप्तस्थान सत्यार्थ प्रकाशया शीर्षकाखाली मुक्ताबाई मंदिरासमोरील महाद्वारात लिहिलेल्या आहेत. त्यातमुक्ताई भक्तांशी नम्र ही विनंती। नामया सांगती तेचि सत्य।।असे आवाहन करून, ‘कोथळीस नाही तापी गंगामाई। सोमेश्वर पाही तोही नाही। नसे मार्कंडेय तपोभूमी थोर। गाव महत्‌नगर तेही नाही।। जेथे परशुरामे मारियेला बाण। त्या पश्चिमेस स्थान तेही नाही। तीरची नाही म्हणूनी योगी नाही। ज्ञानोदयी पाही प्रकाशात ।।असे स्पष्ट लिहिले आहे

उपयुक्त माहिती

  • मुक्ताईनगरपासून १६ किमी, तर जळगावपासून ५९ किमी अंतरावर
  • मुक्ताईनगर जळगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home