संत कुर्मदास मंदिर

लऊळ, ता. माढा, जि. सोलापूर

पंढरपूरच्या विठोबाचे अनन्य भक्त असलेले संत कुर्मदास यांचे मंदिर कुर्डुवाडी-पंढरपूर मार्गावर लऊळ या गावात आहे. कुर्मदास अपंग होते. त्यांना घोट्याच्या पुढे पाय नव्हते आणि मनगटापुढे हात नव्हते. पंढरीच्या वाटेवर असताना त्यांनी साद घालताच खुद्द पंढरीनाथ येथे अवतरल्याचे सांगितले जाते. औरंगजेबाने अनेक मंदिरे पाडल्याचा त्या काळचा इतिहास आहे. मात्र कुर्मदास महाराजांच्या भक्तीमुळे प्रभावित झालेल्या औरंगजेबाने या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे आदेश दिले होते. येथील सेवेकऱ्यांमध्ये मुस्लिमांनाही मानाचे स्थान आहे.
भक्तीविजय ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायातील वर्णनानुसार, कुर्मदास हे पैठणचे रहिवासी होते. तळहात आणि तळपाय नसल्याने शरीराला जमिनीवरून खेचत वा गडाबडा लोळत त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागे. मात्र तरीही त्यांच्या तोंडी सदा देवाचेच नाव असे. पैठणमध्ये एकदा भानुदास महाराजांचे हरिकथा निरुपण सुरू होते. भानुदास हे संत एकनाथ यांचे आजोबा. त्यांची कथा ऐकण्यासाठी दूरदूरहून लोक येत असत. कुर्मदास यांना त्याविषयी कळताच तेही कसेबसे त्या स्थळी पोहोचले. भानुदास महाराजांनी त्यावेळी पंढरपुरच्या यात्रेची महती आणि माहिती आपल्या निरुपणातून उपस्थितांना दिली. आषाढी व कार्तिकी वारीचे महत्व त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सांगितले की कुर्मदास यांच्याही मनात पंढरीच्या वारीची इच्छा निर्माण झाली.
त्यावेळी कार्तिकी एकादशीला चार महिने बाकी होते. कुर्मदासांनी निश्चय केला की आपण पंढरपूरला जायचेच. त्याकाळी पंढरपूरपर्यंत चांगले रस्ते नव्हते. त्यामुळे पायी चालणाऱ्यांचाच प्रवास सोपा नव्हता. त्यात चालू न शकणाऱ्या कुर्मदासांसाठी ती वाट अधिकच अवघड ठरणारी होती. परंतु त्यांचा निश्चय पक्का होता. स्वतःच्या शरीराची घसपट करीत, तर कधी गडाबडा लोळत त्यांनी पंढरीच्या दिशेने आपली वाटचाल सुरूच ठेवली. सकाळी लवकर त्यांचा प्रवास सुरू होई. संध्याकाळ होताच लोकवस्ती असो किंवा नसो, आहे तिथेच मुक्काम करण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नसे. त्यांना कधी अन्न मिळे, तर कधी उपाशीच झोपावे लागे. अशा तऱ्हेने सतत चार महिने शरीराचे हाल हाल करीत ते लऊळ नामक गावात पोहोचले. त्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशी होती. पंढरपूर तेथून सात कोस दूर होते. पण तोवरच्या प्रवासामुळे कुर्मदासांच्या शरीरावर खूप जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना असे जाणवले की येथून पुढचा प्रवास करणे काही शक्य होणार नाही. शरीर तोवर तग धरणार नाही. त्यामुळे त्यांनी पंढरीच्या दिशेने निघालेल्या एका वारकऱ्याला थांबवले. त्याच्याकडे विठ्ठलासाठी निरोप दिला. तुझा एक भक्त तुझ्या भेटीसाठी तुझ्या अगदी जवळ पोहोचला आहे. पण त्यापुढे येणे काही त्याला शक्य होत नाही. त्यामुळे त्याच्या भेटीसाठी तूच यावेस, असा तो निरोप होता. आपला निरोप विठ्ठलाला पोहोचताच तो आपल्या भेटीसाठी येईल अशी त्यांची खात्री होती.
दुसऱ्या दिवशी जर्जर शरीरासह कुर्मदास डोळ्यात प्राण आणून विठ्ठलाची वाट पहात होते. देवाचा धावा सुरूच होता. मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तू माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचशील. तुझ्या दर्शनाची आस लागलेल्या भक्ताला दर्शन देशीलच, असे ते सतत म्हणत होते. त्यांनी पाठवलेला निरोप आणि विठ्ठलाचा सततचा पुकारा विठ्ठलापर्यंत पोहोचला असावा. कारण असे सांगितले जाते की खुद्द विठोबानेच ज्ञानदेव, नामदेव आणि सावता माळी यांना कुर्मदास यांच्या भेटीसाठी पाठवले. त्यांच्या भेटीने कुर्मदास धन्य झाले. पण त्यांची नजर पंढरीच्या राजालाच शोधत होती. त्यांच्या भक्तीची आर्तता लक्षात घेऊन अखेर पंढरी सोडून विठोबा आपल्या भक्तासाठी लऊळ येथे आल्याचे सांगितले जाते. समोर आलेल्या विठोबाला ते नजरेत भरून घेत होते. विठ्ठलाच्या पायावरच त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केल्याचेही सांगण्यात येते.
संतमंडळी आणि खुद्द विठ्ठलाबरोबर चंद्रभागाही या भक्तोत्तमाच्या भेटीसाठी येथे अवतरल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीत आषाढी एकादशीच्या काळात भरपूर पाणी असते. दुष्काळ काळात परिसरातील साऱ्या विहिरी आटल्या तरीही चंद्रभागेत पाणी सोडल्यावर या विहीरीतही पाणी येतेच, असा वारकऱ्यांचा दावा आहे. कुर्मदास महाराजांच्या भेटीसाठी साक्षात चंद्रभागाच या विहिरीत अवतरते, असा भक्तांचा विश्वास आहे.
कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्याशेजारीच संत कुर्मदास महाराजांचे मंदिर आहे. मंदिराला चारही बाजूंनी कोटसदृष्य भिंत आहे. त्यात असलेल्या दरवाजातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. पूर्वी हे मंदिर दगडाचा वापर करून बांधण्यात आले होते. नव्या बांधकामात सिमेंट आणि आधुनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला जाणवतो. सभामंडपाच्या बाजूला भक्तांच्या निवासासाठी ओवऱ्या आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. गर्भगृहात वज्रपिठावर विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. त्यासमोरच कुर्मदास यांची समाधी आहे. पंढरी सोडून विठूरायाने लऊळ या गावात कुर्मदास यांची घेतलेली भेट स्मरणात राहावी यासाठी कार्तिकी आणि आषाढी एकादशीला येथे मोठ्या यात्रा असतात. वारीच्या काळात येथे वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. येथील वैशिष्ट्य असे की या मंदिराच्या देखभालीची व्यवस्था मुस्लिम, मराठा आणि ब्राम्हण कुटुंबांकडे आहे.

उपयुक्त माहिती

  • माढा येथून २३ किमी, तर पंढरपूरपासून ४५ किमी अंतरावर
  • माढा, कुर्डुवाडी व पंढरपूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : पुजारी, मो. ९८५०७८९२०२
Back To Home