संत गुणवंत महाराज मंदिर
लाखनवाडी, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात लाखनवाडी येथे संत गुणवंत महाराज यांचे समाधी मंदिर आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी व चंद्रभागा नदीच्या खोऱ्यात वसलेले हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. ‘अमरावती जिल्हा गॅझेटिअर’मधील नोंदींनुसार, नजीकचे अचलपूर (प्राचीन एलिचपूर) ही मध्ययुगीन वऱ्हाड प्रांताची राजधानी होती. याच भौगोलिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर गुणवंत महाराजांचे कार्य उभे राहिले. स्थानिक माहितीनुसार, त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९३३ रोजी लाखनवाडी येथील आजोळच्या घरात झाला. सलग बारा वर्षे अज्ञातवासात कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना वाचासिद्धी लाभली आणि फाल्गुन पौर्णिमेला ते पुन्हा लाखनवाडीत प्रकट झाले.
महाराजांनी समाजातील रंजल्या-गांजल्या घटकांना आध्यात्मिक आधार देत सदाचाराची शिकवण दिली. त्यांनी आपल्या ‘दशांग सूत्रा’द्वारे जात, धर्म आणि पंथ यापलीकडे जाऊन मानवतेचा संदेश दिला.
सत्य, बंधुभाव, मातापित्यांचा सन्मान आणि स्वच्छतेला त्यांनी जीवनात सर्वोच्च प्राधान्य दिले. अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनतेवर कडक प्रहार करताना त्यांनी भक्तांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा उपदेश केला. गरीब आणि श्रीमंत असा कोणताही भेद न करता एकत्र बसून प्रसाद ग्रहण करण्याची ‘भंडारा’ परंपरा त्यांनी रुजवली. याशिवाय स्थानिक गायींच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी गोपालनाचे कार्य हाती घेतले आणि त्यातूनच गोशाळा व खतनिर्मितीसारखे लोकोपयोगी उपक्रम सुरू झाले. त्यांच्या या कार्यामुळे विदर्भासह मध्य प्रदेशातील हजारो भाविक त्यांच्याशी जोडले गेले. २ ऑक्टोबर १९९३ रोजी त्यांनी देहत्याग केला. त्यानंतर अनुयायांनी त्यांच्या मूळ साधनाभूमीवर समाधी मंदिर उभारले.
मंदिराच्या संपूर्ण संकुलाभोवती तटबंदी आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना असलेल्या स्तंभांना महिरपी कमानीने जोडले आहे. या खांबांवरील सज्जाच्या मध्यभागी शिखराची छोटी प्रतिकृती आणि दोन्ही बाजूंस हत्तींची उठावशिल्पे कोरली आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर फरसबंद प्रांगण लागते. प्रांगणात भाविकांच्या रांगांसाठी लोखंडी कठडे आणि तटबंदीलगत निवासासाठी ओवऱ्या बांधल्या आहेत. समाधी मंदिराचे प्रवेशद्वार साध्या चौकटीचे आहे.
येथून पायऱ्यांच्या मार्गाने खाली भुयारी गर्भगृहात जाता येते. गर्भगृहाच्या मध्यभागी महाराजांच्या समाधीचा चौथरा आणि त्याच्या मागे त्यांची मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आणि अंगावर पांढरे उपरणे आहे. छताला चांदीचे छत्र टांगले आहे. गर्भगृहातील भिंतींमध्ये दिवे आणि पूजेच्या साहित्यासाठी देवकोष्टके आहेत.
भुयारी गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या बाजूने स्वतंत्र पायऱ्यांचा मार्ग आहे. मंदिराच्या छतावर आधुनिक वास्तुशैलीतील पाच थरांचे षटकोनी शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरात सहा देवकोष्टके कोरलेली आहेत. शिखराच्या वरच्या गोलाकार घुमटावर दगडी आमलक आणि कळस बसवला आहे. समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला महाराजांचे स्वतंत्र शयनगृह मंदिर आहे. याची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी दुहेरी आहे. बंदिस्त सभामंडपात प्रकाश व हवेसाठी गवाक्षे ठेवली आहेत. गर्भगृहाच्या दाराबाहेर दोन्ही बाजूंच्या चौथऱ्यांवर गुणवंत महाराजांची उठावशिल्पे कोरली आहेत. आतील वज्रपीठावर महाराजांची पितळी मूर्ती आहे. गर्भगृहात डाव्या बाजूला महाराजांचा शयनमंचक आणि उजव्या बाजूला लाकडी पालखी ठेवली आहे.
समाधी मंदिरासमोर एका जुन्या औदुंबर वृक्षाभोवती दगडी पार बांधलेला आहे. या पारावर धातूचा त्रिशूल रोवलेला आहे. औदुंबरालगतच लहान धुनीमंडप आहे. मंदिरापासून काही अंतरावर महाराजांनी प्रज्वलित केलेली अखंड धुनी आहे आणि या धुनीमंदिरात अग्नी सतत तेवत असतो. प्रवेशद्वाराजवळील एका वज्रपीठावर असलेल्या महाराजांच्या मूर्तीच्या मस्तकावर पंचफणी नागाचे शिल्प कोरलेले आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचे पट्टशिष्य प्रल्हाद महाराज यांची मूर्ती आहे. धुनीमंदिराशेजारील सभागृहात महाराजांची मोठी तसबीर लावली आहे. या सभागृहात अंगात वारे खेळण्याची स्थानिक प्रथा पाळली जाते. धुनीमंदिराच्या बाजूला असलेल्या खुशालबाबांच्या स्थानावरील वज्रपीठावर खुशालबाबा, महादेव आणि गुणवंत महाराज यांच्या मूर्ती आहेत. प्रांगणात प्रल्हाद महाराजांचे स्वतंत्र समाधी मंदिर बांधले आहे.
लाखनवाडी गावामध्ये देवस्थानाशी संबंधित आणखी दोन महत्त्वाची स्थाने आहेत. ‘दोन आंब्यांचे शेत’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेत महाराजांचे अनेकदा वास्तव्य असायचे. येथे उभारलेल्या महाराजांच्या कुटीत महाराजांची शयनमुद्रेतील मूर्ती आणि शेजारी शेषनागाचे शिल्प आहे. दुसरे स्थान म्हणजे गावातील महाराजांचे प्रत्यक्ष जन्मस्थान होय. त्यांच्या मामांच्या या मूळ घराचे रूपांतर ‘सुलाई मंदिरात’ केले आहे. तेथे महाराजांच्या मातोश्री सुलाई देवी आणि गुणवंत महाराज यांच्या मूर्ती आहेत. या देवस्थानात समाधीवर वस्तू अर्पण करण्याची एक स्थानिक परंपरा आहे.
भाविक समाधीवर पांढरे धोतर, उपरणे, छत्री, खडावा, लाकडी काठी आणि केर काढण्याचा झाडू अर्पण करतात. काठी व चपला संतांच्या पदभ्रमणाचे स्मरण म्हणून, तर झाडू हा मनातील विकारांच्या उच्चाटनाचे प्रतीक म्हणून वाहिला जातो.
मंदिराचे मुख्य द्वार दररोज पहाटे पाच वाजता उघडते. सकाळी साडेपाच वाजता काकड आरती आणि समाधीपूजा केली जाते. भाविकांसाठी दर्शन सकाळी साडेपाच ते दुपारी बारा आणि दुपारी साडेतीन ते रात्री साडेनऊ या वेळेत खुले असते. दुपारी बारा वाजता माध्यान्ह नैवेद्य व आरती आणि सायंकाळी सात वाजता धूपारती होते. रात्री नऊ वाजता शयन आरती करून साडेनऊ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. मंदिरात होळी पौर्णिमेला गुणवंत महाराजांचा प्रकटदिन उत्साहाने साजरा होतो. आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला विदर्भ आणि मध्य प्रदेशातून भाविकांच्या दिंड्या येतात. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला येथे जत्रा भरते व महाराजांच्या पालखीची गावातून मिरवणूक काढली जाते. १९ सप्टेंबरचा जन्मोत्सव आणि २ ऑक्टोबरचा महासमाधी पुण्यतिथी उत्सव हे येथील सर्वांत मोठे वार्षिक सोहळे आहेत.
उपयुक्त माहिती
- अचलपूर रेल्वे स्थानकापासून २२ किमी अंतरावर
- परतवाडा येथून २० किमी व चांदूरबाजार शहरापासून २९ किमी अंतरावर
- परतवाडा व चांदूरबाजार येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७०३८८८०७४३, ९३५९१९६३४४
