भक्ती धाम (जलाराम बापा) मंदिर

गुरुछाया कॉलनी, गोपाळ नगर, अमरावती, ता. जि. अमरावती

विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहरातील, गोपाळ नगर परिसरातील, गुरुछाया कॉलनीत जलाराम बापा यांचे भक्ती धाम मंदिर आहे. गुजरातमधील वीरपूर येथील संत जलाराम बापा यांच्या सेवाव्रती परंपरेचा वारसा जपणारे हे एक प्रसिद्ध व महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. सुमारे चार दशकांपासून या मंदिरात अन्नदान, गोसेवा, आरोग्य शिबिरे आणि भजनादी धार्मिक उपक्रमांची अखंड परंपरा सुरू आहे. सर्वसामान्य भाविकांमध्ये या स्थानाविषयी मोठी श्रद्धा आहे.

अमरावती शहराला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची मोठी परंपरा लाभली आहे. ‘अमरावती जिल्हा गॅझेटिअर’ मधील उल्लेखांनुसार प्राचीन काळी या परिसरात औदुंबराची वने असल्याने या भूभागाचे मूळ नाव ‘उदुंबरावती’ पडले आणि पुढे त्याचे अमरावती असे रूपांतर झाले. विसाव्या शतकात शहराचा विस्तार होत असताना बडनेरा रस्त्याकडे नवीन वसाहती निर्माण झाल्या. अमरावती शहरात स्थायिक झालेल्या गुजराती आणि लोहाणा समाजाने आपल्या मूळ परंपरेतील संत जलाराम बापा यांच्या भक्तीचा आणि सदाव्रताचा वारसा या भागात रुजवला.

संत जलाराम बापा यांचा जन्म विक्रम संवत १८५६ मध्ये कार्तिक शुद्ध सप्तमी म्हणजेच १४ नोव्हेंबर १७९९ रोजी गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील वीरपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रधान ठक्कर आणि आईचे नाव राजबाई होते. धार्मिक वृत्तीच्या आईकडून त्यांना सेवा आणि परोपकाराचे संस्कार मिळाले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह वीरबाई यांच्याशी झाला. अठराव्या वर्षी त्यांनी फतेहपूरचे संत भोजलराम यांना गुरू मानून श्रीरामाचा मंत्र घेतला. गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी वीरपूर येथे ‘सदाव्रत’ (अन्नछत्र) सुरू केले.

मौखिक परंपरेनुसार, बाप्पांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले. एका साधूने त्यांना श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्तींसोबत धान्य ठेवण्याचे भांडे दिले. हे भांडे कधीही रिकामे होत नसे, अशी आख्यायिका सांगितली जाते. तसेच, हरजी नावाचा शिंपी आणि एका मुस्लिम व्यापाऱ्याच्या मुलाला बाप्पांच्या आशीर्वादाने आजारातून मुक्ती मिळाली. या परोपकारी कार्यामुळे लोक त्यांना आदराने ‘बाप्पा’ म्हणू लागले. १८ नोव्हेंबर १८७८ रोजी वीरबाईंचे निधन झाल्यानंतरही बाप्पांनी सेवाव्रत सुरूच ठेवले. २३ फेब्रुवारी १८८१ रोजी त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी देह ठेवला.

अमरावतीतील जलाराम सत्संग मंडळाची स्थापना धर्मग्रंथांचे अभ्यासक नानालालभाई पंड्या यांच्या प्रेरणेने इ.स. १९५२ मध्ये झाली. सुरुवातीला दर शनिवारी त्यांच्या निवासस्थानी भक्त एकत्र येऊन भजन करत असत. इ.स. १९६९ मध्ये लोहाणा समाजाचे भवन उपलब्ध झाल्यावर तिथे कार्यक्रम होऊ लागले. अमरावतीत जलाराम बाप्पांचे स्वतंत्र मंदिर असावे, या उद्देशाने इ.स. १९८३ मध्ये संत मोरारीबापू यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले. त्यातून जमा झालेल्या देणगीतून बडनेरा रोडवर दोन एकर जागा खरेदी करून या मंदिराची उभारणी केली गेली. स्थानिक गुजराती समाज व अन्य देणगीदारांच्या सहकार्याने उभारलेल्या या मंदिरात संत हरिबापा यांच्या हस्ते १३ मार्च १९८६ रोजी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. इ.स. १९८८ मध्ये येथे ‘वीरबाई माँ गोशाळे’ची स्थापना करून गोसेवा सुरू केली गेली.

या मंदिराच्या सभोवताली दुहेरी तटबंदी उभारलेली आहे. बाह्य तटबंदीत प्रवेश करण्यासाठी एक महाद्वार बांधलेले आहे. महाद्वाराच्या वरील सज्जावर कळस आहेत. मंदिरासमोरील मोकळ्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसवले आहेत आणि भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. हे मंदिर एका उंच अधिष्ठानावर उभारलेले आहे. मंदिरासमोरील उपमंडपाची रचना गोलाकार स्तंभांवर तोललेली आहे. उपमंडपात जाणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन फूट उंचीची मृगासने आहेत. प्रवेशद्वारावरील तोरणात महिरपी नक्षी आणि झुंबर लावले आहे. उपमंडप ओलांडल्यावर सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एका वज्रपीठावर शिवपिंड आणि नंदीचे शिल्प आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूस भिंतीत काचेची देवकोष्टके आहेत. त्यात गणपती आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात महिलांसाठी दोन स्वतंत्र सज्जे आहेत.

सभामंडपातून अंतराळाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर सोन्याचा मुलामा असलेली नक्षीदार द्वारशाखा आणि ललाटपट्टी आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची रचनाही याच पद्धतीची आहे. गर्भगृहाबाहेर दुर्गामाता आणि गायत्रीमाता यांची देवकोष्टके आहेत. गर्भगृहात चांदीच्या मढवलेल्या रजतपीठावर श्रीराम, लक्ष्मण, जानकी आणि दास हनुमान यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्याच बाजूला जलाराम बापा यांची मूर्ती आहे. मूर्तींच्या वर चांदीचे छत्र टांगलेले आहे. सभामंडपाच्या भिंतींवर जलाराम बापा आणि इतर देवीदेवतांच्या तसबीरी लावल्या आहेत. गर्भगृहाभोवती बंदिस्त प्रदक्षिणामार्ग आहे. सभामंडपावर घुमटाकार शिखर आणि गर्भगृहावर अष्टकोनी, उंच व निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखरांवर आमलक, कळस आणि धर्मध्वज उभारलेला आहे.

दररोज सकाळी साडेपाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. भक्ती धामची ओळख येथील अन्नदानामुळे आहे. मंदिरात दररोज ‘रामरोटी’ आणि दर गुरुवारी महाप्रसाद वाटप केले जाते. सभामंडपातील धान्य भांडार पात्रात भाविक अन्नदानासाठी धान्य दान करतात. मंदिरात दर शनिवारी भजनाचा कार्यक्रम आणि गुरुवारी महिला मंडळाचे भजन आयोजित केले जाते. मंदिराच्या आवारात बालोद्यान आहे. तसेच मंदिरालगतच्या बगीच्यातील योगा केंद्रात परिसरातील नागरिकांसाठी नियमित योगवर्ग चालतात.

कार्तिक शुद्ध सप्तमी हा जलाराम बापा जयंती उत्सव या देवस्थानातील सर्वांत मोठा वार्षिक उत्सव मानला जातो. या दिवशी कथावाचन, प्रवचने होतात आणि हजारो भाविकांना भोजनाच्या स्वरूपात महाप्रसादाचे वाटप केले जाते. याशिवाय मंदिरात रामनवमी, जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, महाशिवरात्र आणि हनुमान जयंती हे सणही उत्साहात साजरे केले जातात. उत्सव काळात भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी सभामंडपाच्या डाव्या आणि उजव्या भिंतींतील अतिरिक्त दरवाजांचा वापर केला जातो.

उपयुक्त माहिती

  • अमरावती रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • अमरावती मध्यवर्ती बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बस व ऑटोरिक्षाची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या प्रांगणापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Back To Home