संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर

आळे, ता. जुन्नर, जि. पुणे


पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळे हे गाव ‘धाकटी आळंदी’ म्हणून प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले, त्या रेड्याचे समाधी मंदिर या आळे गावात आहे. स्वतः ज्ञानेश्वरांनी रेड्याला या ठिकाणी मूठमाती दिली. त्यामुळे या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे. ‘म्हसौबा समाधी मंदिर’ म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते.

या मंदिराबाबत आख्यायिका अशी, पैठण येथील धर्मसभेत शुद्धिपत्रकासाठी गेलेल्या निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई या भावंडांचा तेथील धर्ममार्तंडांनी अपमान केला. एका धर्मपंडिताने ज्ञानेश्वरांना सांगितले की, तुझा व प्राणिमात्रांचा आत्मा एकच आहे हे तू सिद्ध करून दाखव. धर्मपंडितांचे हे आव्हान ज्ञानेश्वरांनी स्वीकारले. त्याच वेळी एक कोळी एका रेड्याला घेऊन तेथून जात होता. ज्ञानेश्वरांनी श्रद्धापूर्वक त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून ऋग्वेदातील एक मंत्र म्हटला. त्याचबरोबर रेड्यानेही मुखोद्‌गत असल्याप्रमाणे तो वेदमंत्र म्हणून दाखवला. ज्ञानेश्वर महाराजांच्या या कृतीने सर्व धर्मसभा अवाक झाली. याच रेड्याला आपल्यासोबत घेऊन ज्ञानेश्वर भावंडांसह पैठणहून आळंदीला जात असताना, डोंगरदऱ्यांची अवघड वाट पादाक्रांत करताना, हा रेडा थकला आणि त्याने रस्त्यातच प्राण सोडले. त्यामुळे त्याच ठिकाणी या चारही भावंडांनी रेड्याला मूठमाती दिली. ते ठिकाण म्हणजेच आजचे आळे.

शके १२१२ म्हणजे इ.स. १२९० साली या रेड्याची समाधी बांधण्यात आली. त्यानंतर १७६४ साली स्थानिक रहिवासी आनंदराव भिकाजी शेटे यांनी या मंदिराचे बांधकाम केल्याची नोंद आहे. आनंदराव यांचे वंशज भालचंद्र शेटे यांनी समाधिस्थानाच्या वरच्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तो दिवस होता फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजे २७ फेब्रुवारी १९५५.

२००३ साली राज्य सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर येथे नूतनीकरणाचे काम सुरू झाले. नव्याने बांधण्यात आलेले हे मंदिर प्रशस्त व सुंदर असे आहे. मंदिर परिसराला भव्य तटबंदी आहे आणि तटबंदीच्या चार कोपऱ्यांवर श्री महादेव, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ महाराज व संत सोपान महाराज यांची स्वतंत्र मंदिरे बांधण्यात आली आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरताच भव्य सभामंडप आहे. सभामंडपातील लाकडी खांबांवर कोरीव काम केलेले आहे. मंदिराचे नूतनीकरण करताना समाधिस्थानाचे मूळ स्वरूप आहे तसेच ठेवण्यात आले आहे. गाभाऱ्यात रेड्याची दगडी समाधी आणि त्याच्या वरच्या बाजूला ज्ञानेश्वरांचा मुखवटा आहे.

या ठिकाणी १८६३ सालापासून अखंड वीणावादन सुरू आहे. सकाळी व संध्याकाळी मंदिरात आरती होते. श्री क्षेत्र आळंदीप्रमाणेच येथेही वेद पाठशाळा सुरू करण्यात आली आहे. मंदिर समितीतर्फे भाविकांसाठी येथे भक्त निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रत्येक एकादशी व द्वादशीला तालुक्यातील अनेक भाविक या ठिकाणी अन्नदान करतात. दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला दर्शनासाठी येथे हजारो भाविकांची गर्दी असते. चैत्र महिन्याच्या वद्य एकादशीला येथे तीन दिवस मोठी यात्रा भरते. एकादशीच्या दिवशी अभिषेक, यज्ञयाग, भजन, जागर व भारुडे असे कार्यक्रम असतात. द्वादशीला स्थानिक गावकऱ्यांकडून दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी दिवसभर अन्नदान असते. यात्रेत होणाऱ्या कुस्ती स्पर्धा प्रसिद्ध आहेत. त्यात भाग घेण्यासाठी अनेक नामवंत कुस्तीपटू येथे येतात. तिसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून यात्रेची सांगता होते. या यात्रेत तिन्ही दिवस शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची मोठी उलाढाल होते. त्याशिवाय बांबूच्या शिड्या, टोपल्या व घोंगड्या यांचीही येथे मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते.

उपयुक्त माहिती:

  • जुन्नरपासून ३३ किमी; तर पुण्यापासून ९७ किलोमीटर अंतरावर
  • ठाणे, कल्याण, नगर व पुण्यातून एसटीची सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी व्यवस्था
  • मंदिर परिसरात भक्त निवासाची सुविधा
Back To Home