अडगाव येथील द्वारकेश्वर महादेवाच्या प्राचीन मंदिराजवळ शेगावच्या गजानन महाराजांचे पट्टशिष्य संत भास्कर महाराज यांचे समाधी मंदिर आहे. गजानन महाराजांनीच येथील सतीच्या कट्ट्याजवळ भास्कर महाराज यांना स्वहस्ते समाधी दिल्याचा उल्लेख आढळतो. ‘प्रति आळंदी’ म्हणून गणल्या जाणाऱ्या या क्षेत्री गजानन महाराजांच्या आदेशामुळे तब्बल १२ वर्षे कावळे फिरकले नाहीत, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. संत भास्कर महाराजांच्या समाधीमुळे हे क्षेत्र ‘भास्कर नगरी’ म्हणूनही ओळखले जाते. अनेक कीर्तनकार घडवणारी येथील वारकरी शिक्षण संस्था सुप्रसिद्ध आहे.
भास्कर महाराजांचा इतिहास असा की एका सरदाराच्या घरात इ.स. १८००मध्ये गीता जयंतीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. कर्ताजी पाटील जायले हे त्यांच्या वडिलांचे नाव, तर पार्वतीबाई हे आईचे नाव. कर्ताजी पाटील हे नागपूरच्या रघुजीराजे भोसले (द्वितिय) यांचे सरदार होते. त्यांना रघुजीराजे यांनी अकोट-अंजनगाव मार्गावर असलेल्या अकोली या गावाची जहागिरी दिली होती. पाटील जायले कुटुंबीय वंशपरंपरेने नित्यनेमाने देहू-आळंदी-पंढरपूरची वारी करत. भास्कर महाराजांच्या जन्मानंतर तीन वर्षांनी, १८०३मध्ये दुसरे इंग्रज-मराठे युद्ध झाले. त्यात ब्रिटिश सेनापती लॉर्ड वेलस्ली गावील गडावर चालून जाणार असल्याची खबर लागल्यानंतर भोसले-शिंदेंच्या फौजेने ब्रिटिश सेनेला अडगाव येथे अडवण्याचे ठरवले. २९ नोव्हेंबर १८०३ रोजी या दोन्ही फौजांमध्ये येथे भीषण रणकंदन झाले. त्यात कर्ताजी पाटील यांना वीरगती प्राप्त झाली.
कर्ताजी पाटील यांच्या पश्चात पार्वतीबाईंनी लहानग्या भास्करला वाढवले. त्यांना शस्त्रास्त्रे चालवण्याचे शिक्षण दिले. पुढे त्यांनी गजानन महाराजांचे शिष्यत्व पत्करले. याची सविस्तर हकीकत ‘आधुनिक महाराष्ट्राचे महिपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतकवी दासगणू यांनी इ.स. १९३९मध्ये रचलेल्या ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथात दिली आहे. ती अशी की एकदा ऐन वैशाखाच्या प्रखर उन्हाळ्यात शेगावकरांची नजर चुकवून गजानन महाराज अडगावी जाण्यास निघाले. वाटेत तहानेने त्यांस कंठशोष पडला.
आजुबाजूस कोठेही पाणी दिसेना. तेव्हा अकोलीच्या शिवारात असलेल्या शेतात एक वृद्ध शेतकरी पाणी घालत असल्याचे त्यांना दिसले. ते भास्कर पाटील होते. त्यांच्याकडे गजानन महाराजांनी पाणी मागितले. भास्कर पाटील यांनी शेतावर एका घागरीतून पाणी आणले होते. परंतु दिगंबरावस्थेतील महाराजांना पाहून भास्कर पाटील यांनी त्यांना पाणी देण्याचे नाकारले व हुसकावून दिले. त्या शेतातून जात असताना गजानन महाराजांना एक विहिर दिसली. ते तिकडे चालले असताना भास्कर पाटील त्यांना म्हणाले की ‘वृथा तिकडे कशास जातोस? ती विहिर कोरडी ठणठणीत आहे.’ मात्र गजानन महाराज त्या बारा वर्षांपासून कोरड्या पडलेल्या विहिरीपाशी आले. तेथे त्यांनी देवाची प्रार्थना केली आणि त्याबरोबर त्या विहिरीतून पाण्याचा झरा फुटला. काही क्षणांत ती विहिर पाण्याने भरून गेली. हे पाहून भास्कर पाटील यांना गजाजन महाराज हे थोर योगी असल्याची खात्री पटली. त्यांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि त्यांचे शिष्यत्व पत्करून ते शेगावला गेले.
यानंतर तब्बल २९ वर्षे शेगावी वास्तव्य करत भास्कर महाराजांनी गजानन महाराजांची सेवा केली. त्यादरम्यान गजानन महाराजांनी त्यांची अनेकदा परीक्षा घेतली. त्या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले भास्कर महाराज हे गजानन महाराजांचे पट्टशिष्य बनले. एकदा बालापूर येथे दासनवमीच्या कार्यक्रमास गेले असताना भास्कर महाराजांना पिसाळलेला कुत्रा चावला. त्यावेळी गजानन महाराजांनी त्यांच्या शरीरात भिनलेले विष उतरवले. मात्र, ‘केवळ दोनच महिने तुझे आयुष्य उरले आहे,’ असे ते भास्कर महाराजांना म्हणाले. त्यानंतर गजानन महाराजांनी त्यांना त्र्यंबकेश्वर तीर्थाचे दर्शन घडवले. १९०७ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी गजानन महाराज शिष्यांसह अकोटवरून १० किमी अंतरावरील द्वारकेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी आले. गुरुवार, २ मे, चैत्र कृष्ण पंचमीचा तो दिवस होता. तो भास्कर महाराजांच्या प्रयाणाचा दिवस असल्याचे गजानन महाराजांनी सांगितले. तेथे उपस्थित असलेल्या शेकडो भाविकांना गजानन महाराजांनी ‘विठ्ठल विठ्ठल नारायण’ असा गजर करण्यास सांगितले.
भास्कर महाराज माळबुक्का लावून पद्मासनात बसून ध्यानमग्न झाले. माध्यान्हीच्या समयी ‘हरहर’ असा शब्द उच्चारून त्यांनी, वयाच्या १०७ व्या वर्षी प्राण सोडले. यानंतर द्वारकेश्वर पशुपती मंदिराच्या जवळ भास्कर महाराजांना समाधी देण्यात आली. या सोहळ्यानंतर गजानन महाराजांनी येथे १४ दिवस वास्तव्य केले. या सोहळ्याच्या वेळी परिसरात भास्कर महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदानही झाल्याचा उल्लेख ‘श्री गजानन विजय ग्रंथा’मधील अकराव्या अध्यायात आहे. या अन्नदान सोहळ्याच्या वेळी परिसरात मोठ्या संख्येने आलेल्या कावळ्यांचा उपस्थितांना त्रास होऊ लागला. त्यामुळे लोक कावळ्यांना मारण्यासाठी धावले. मात्र, गजानन महाराजांनी त्यांना तसे करण्यास रोखले आणि कावळ्यांना स्वहस्ते प्रसाद देत या परिसरात बारा वर्षे न येण्याची आज्ञा केली. त्यानंतर हे कावळे तेथून निघून गेले. तेव्हापासून या परिसरात कावळे फिरकत नसल्याची आख्यायिकाही सांगितली जाते.
समाधी सोहळ्यानंतर सलग तीन वर्षे, १९१० पर्यंत गजानन महाराजांनी येथे भास्कर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव केला. पुढे भास्कर महाराजांचे नातू संत वासुदेव महाराज यांनी १९५५ मध्ये असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत येथील समाधीस्थानाचा जीर्णोद्धार केला. त्यासंदर्भातील आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. शेगाव संस्थानात रामचंद्र पाटील यांच्या सांगण्यावरून ‘गजानन महाराज चरित्रा’चे लेखन सुरू असताना तेथे वर्ध्यानजीकच्या सिंधी येथील गौरीशंकर महाराज आले होते. त्यांनी
तेथे बसलेल्या वासुदेव महाराजांना अडगाव येथे जाऊन भास्कर महाराज संजीवन समाधीचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले. त्यावर ‘मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे, त्यामुळे जीर्णोद्धारासाठी लागणारे पैसे माझ्याकडे नाहीत. मी आजवर कोणाकडे काहीही मागितलेले नाही. त्यामुळे एवढे पैसे कसे उभे करायचे,’ असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या वर्गणीतून हा जीर्णोद्धार करण्याचे निर्देश गौरीशंकर महाराजांनी त्यांना दिले. त्यानुसार वासुदेव महाराजांनी लोकवर्गणीतून निधी जमवला आणि अडगाव येथील समाधी स्थानाचा जीर्णोद्धार केला.
अकराशे संत-महंतांच्या तसेच चाळीस हजारांहून अधिक वारकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यादरम्यान सद्गुरु जोग महाराज यांचे शिष्य मामासाहेब दांडेकर यांनी ‘हेचि दान देगा देवा’ या अभंगावर कीर्तन केले, तसेच भास्करनगरी गोर-गरीब श्रद्धावान भक्तांसाठी ‘प्रतिआळंदी’ असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून पंढरपूर, आळंदी वा शेगावला जाणे शक्य नसलेले असंख्य भाविक येथे येऊन वारी पूर्ण करतात.
मंदिर परिसरात वटवृक्षासह अनेक प्राचीन वृक्ष आहेत. येथे असलेल्या द्वारकेश्वर मंदिराबाबत अख्यायिका अशी की रुक्मिणी हरण करून जात असताना श्रीकृष्ण वाटेत अनेक ठिकाणी थांबले. त्यापैकी एक असलेल्या या ठिकाणी हे मंदिर आहे. या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. खुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. काही वर्षांपूर्वी झालल्या जिर्णोद्धारानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. अंतराळात मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची पाषाणी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर भाऊसाहेब महाराज ऊर्फ देवमास्तरांची प्रतिमा आहे. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये द्वारकेश्वर महादेवाची पिंडी आहे.
पंचधातूच्या शाळुंकेवर ‘ॐ’, ‘स्वस्तिक’ आदी मंगलप्रतिके आणि शिवलिंगावरील आवरणावर शंकरांचे मुख कोरलेले आहे. या मंदिरानजीक उंच शिखर असलेले आणखी एक पुरातन शिवालय आहे. त्यात पिंडीसोबत श्रीकृष्णाची मूर्ती आहे. या परिसरात एक पायविहीर होती. ती आता बुजली असून तीच्या केवळ वरच्या भिंती पाहता येतात.
येथून जवळ असलेल्या वटवृक्षाजवळ सतीचा ओटा आहे. त्यावर वृंदावन आहे. येथून काही पावलांवर असलेल्या पार्वतीमातेच्या मंदिरामध्ये देवीची सुंदर मूर्ती आहे. या मंदिरासमोर भास्कर महाराजांचे संजीवन समाधी मंदिर आहे. साधेसे बांधकाम असलेल्या या मंदिराची सभामंडप व गर्भगृह अशी संरचना आहे. सभामंडपात गजानन महाराजांची प्रतिमा व पादुका आहेत. या मंडपात संत ज्ञानेश्वरांचीही प्रतिमा आहे. येथे अखंड विणावादन सुरू असते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस भास्कर महाराजांची प्रतिमा आहे. गर्भगृहात भास्कर महाराजांच्या समाधीस्थानी त्यांची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीवर पितळी मुखवटा व त्यावर फेटा आहे. मूर्तीच्या मागील वज्रपिठावर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत.
श्री क्षेत्र भास्करनगर येथे श्री भास्कर महाराज संस्थान स्थापन करणाऱ्या वासुदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने या परिसरात वारकरी शिक्षण संस्थेची उभारणी केली. या संस्थेने अनेक मोठ-मोठे कीर्तनकार घडवले आहेत. वासुदेव महाराजांनी येथे भाविकांना पाक्षिक एकादशीचा नियमही घालून दिला, तसेच उन्हाळी बालसंस्कार शिबीराचा उपक्रमही सुरू केला. त्यांनी येथे बारस (द्वादशी) पंगतही सुरू केली. आयुष्याच्या उत्तरार्धात, २००१ मध्ये त्यांनी हे संस्थान शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानात विलीन केले. या मंदिरात नित्यनेमाने पूजा-अर्चा केली जाते. भास्कर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, काकडा, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उत्सवादरम्यान शेगाव संस्थानच्या शिस्तबद्ध राजवैभवी थाटात श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होते. त्यात बाहेरगावांहून आलेल्या दिंड्या आणि पालख्यांचा सहभाग असतो.